Tarun Bharat

ऑक्सिजनविना 24 रुग्णांचा मृत्यू

चामराजनगर जिल्हा रुग्णालयातील दुर्दैवी घटना : मृतांमध्ये कोरोनाबाधितांचाही समावेश

प्रतिनिधी / बेंगळूर

राज्यातील चामराजनगर जिल्हा रुग्णालयात चोवीस तासात ऑक्सिजनअभावी 24 जणांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कोरोनाबाधित रुग्णांचाही बळी गेल्याची पुष्टी आरोग्य अधिकाऱयांनी दिली आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेला जिल्हा पालकमंत्री सुरेशकुमार आणि जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रविवारी रात्री 18 आणि सोमवारी सकाळी 6 जणांचा बळी गेला आहे. गेल्या आठवडय़ापासून याठिकाणी ऑक्सिजनची कमतरता असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

रविवारी रात्री अचानक ऑक्सिजन अभावी रुग्ण विव्हळत होते. योग्यवेळेत ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृतांमध्ये कोरोनाबाधित आणि बाधित नसलेल्या रुग्णांचाही समावेश आहे. या जिल्हा रुग्णालयात 50 व्हेंटिलेटर, 50 ऑक्सिजन बेड्स आहेत. ऑक्सिजन संपल्यानंतर कोरोना नसलेल्या रुग्णांना पेपर, टॉवेलच्या मदतीने वारा घालण्याचा प्रयत्न संबंधितांनी केला. पण त्यांना मृत्यूपासून रोखण्यात शक्य झाले नाही. अद्याप ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने 50 पेक्षा अधिक कोरोनाबाधितांची स्थिती चिंताजनक आहे.

राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून समर्पकरित्या ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने भीती निर्माण झाली आहे. राज्यात ऑक्सिजनची कमतरता नाही, असे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी अनेकवेळा स्पष्ट केले आहे. तरीही चामराजनगर जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन अभावी झालेल्या घटनेमुळे  जिल्हय़ात भीती निर्माण झाली आहे. गरीब रुग्ण उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, रुग्णालयातच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने याकडे जिल्हा पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. ऑक्सिजन अभावी 24 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच संबंधितांनी घटनास्थळी एकच संताप व्यक्त केला.

ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यावर जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा पालकमंत्र्यांनी पर्यायी व्यवस्था न केल्याने 24 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूला संबंधित जबाबदार आहेत, असा आरोप कुटुंबीयांनी केला. जिल्हाधिकाऱयांशी संपर्क साधून मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सविस्तर माहिती घेतली. तसेच ऑक्सिजन कमतरतेबाबत त्यांना धारेवर धरले. मृत रुग्णांची संपूर्ण माहिती देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली असून या घटनेची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही त्यांनी जिल्हाधिकाऱयांना केला.

राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश

24 जणांचा मृत्यू झालेल्या या घटनेसंबंधी सविस्तर चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. तसेच यासाठी आयएएस अधिकारी तथा रस्ता वाहतूक निगमचे व्यवस्थापकीय सचिव शिवयोगी कळसद यांची चौकशी अधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे. याचबरोबर तीन दिवसात सरकारला अहवाल देण्याची सूचना सरकारने केली आहे.

रुग्णांच्या मृत्यूबाबत जिल्हा पालकमंत्र्यांची सारवासारव

ऑक्सिजन अभावी 24 रुग्णांचा मृत्यू झालेला नाही, असे चामराजनगरचे जिल्हा पालकमंत्री एस. सुरेश यांनी स्पष्ट केले आहे. रुग्णालयातील 24 रुग्णांचा मृत्यू कशामुळे झाला आहे, याचा अहवाल देण्याची सूचना डॉक्टरांना केली आहे. अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. ऑक्सिजन कमतरतेची माहिती मिळताच तात्काळ 80 ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर 6 हजार लिटरची लिक्वीड टँक आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या

चामराजनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री येडियुराप्पा, आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची विद्यमान उच्च न्यायाधिशांद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी केली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भाजप सत्तेसाठी आणखी किती जणांचा बळी घेणार आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Related Stories

कर्नाटक : लसीकरणानंतर ५ डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

कर्नाटक : शाळकरी मुलांना दुपारच्या जेवणात अंड्याला पर्याय चिक्की

Abhijeet Khandekar

कर्नाटकात दुसरी ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल

Archana Banage

राज्यात एकाचदिवशी 34 हजारांवर नवे रुग्ण

Amit Kulkarni

यंदा 25 लाख घरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा

Amit Kulkarni

वीरशैव-लिंगायत विकास निगमसाठी 500 कोटी

Omkar B