ओटेन्स यांचे 94 व्या वर्षी निधन
ऍमस्टरडीम
ऑडिओ कॅसेटचे डच जनक लोऊ ओटेन्स यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी पहिली कॅसेट 1963 मध्ये तयार केली होती. जगभरात आतापर्यंत 10 हजार कोटी कॅसेट टेप विकल्या गेल्याचा अनुमान आहे. कॅसेटने लोकांना चालताना-फिरताना संगीत ऐकण्याची सुविधा दिली. ओटेन्स यांनी नेदरलँड येथील डायजल येथे अखेरचा श्वास घेतला आहे. ओटेन्स 1960 मध्ये फिलिप्सच्या प्रॉडक्ट हेड विभागाचे प्रमुख झाले होते. ओटेन्स यांच्या पथकाला भरभक्त रील टेप रिकॉर्डरला पोर्टेबल गॅजेटमध्ये रुपांतरित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. याची परिणती कॅसेटच्या स्वरुपात समोर आली. तेव्हा 37 वर्षांच्या असलेल्या ओटेन्स यांनी 30 ऑगस्ट 1963 रोजी बर्लिनमध्ये ऑडिओ कॅसेट जगासमोर सादर केली होती.


मी जेव्हा कॅसेट पहिल्यांदा जगासमोर सादर केली, तेव्हा ‘खळबळ’ उडाली होती. कॅसेटचा काळ येण्यापूर्वी रिकॉर्डिंगसाठी रील-टू-रील उपकरणाचा वापर व्हायचा. पण हा वापर करणे अत्यंत अवघड होते आणि याकरता प्रशिक्षण आणि प्राविण्याची गरज भासायची असे 2013 साली दिलेल्या मुलाखतीत ओटेन्स यांनी म्हटले होते. फिलिप्स आणि सोनीसोबत व्यवहारानंतर ओटेन याच्या कॅसेट मॉडेलला पेटंट मिळाले. पण कॅसेट 1979 मध्ये सोनीने वॉकमॅन सादर केल्यावर लोकप्रिय झाली. वॉकमॅन एक पोर्टेबल कॅसेट प्लेयर होता. या उत्पादनाने जगात खळबळ उडवून दिली होती. ओटेन्स स्वतःच्या या शोधासाठी सोनीच्या वॉकमॅनला सर्वात उपयुक्त माध्यम मानायचे. पण त्यांनी कॅसेटचा शोध खऱया अर्थाने फिलिप्ससाठी लावला होता.