शिरोलीतील एकविरा कबड्डी ऍपॅडमीकडून आयोजन
राज्यभरातून 27 राज्य व राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग
संग्राम काटकर / कोल्हापूर
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने खेळांच्या मैदानांसह ऍपॅडमीही बंद केल्या. त्यामुळे विविध खेळांच्या खेळाडूंसमोर सराव करायचा तरी कुठे अशी परिस्थिती निर्माण झाली. अनेक खेळाडूंनी खेळासाठी लागणाऱ्या क्षमतेवर परिणाम होऊ नये म्हणून घरातच वर्कआऊट करायला सुरुवात केली. काहींनी तर गावातील माळांवर जाऊन खेळांचा सराव सुरू ठेवला. शिरोलीतील कबड्डी प्रशिक्षक दीपक पाटील यांनी मात्र कोरोनाच्या काळातही कबड्डीचा सराव थांबू नये, स्कीलवर परिणाम होऊन म्हणून अनोखी शक्कल लढवत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. त्यासाठी एकविरा कबड्डी ऍपॅडमी या नावाने व्हॉटस् ग्रुप बनवला. या ग्रुपच्या माध्यमातून ते व्हिडीओसह लाईव्ह टिप्स देत महाराष्ट्रातील 27 राज्य व राष्ट्रीय खेळाडूंकडून ऑलिंपिक व प्रो-कबड्डीच्या धर्तीवर सराव करवून घेत आहेत.
शिरोली येथील एकविरा ऍपॅडमीच्या कार्यालयातून हा ऑनलाईन प्रशिक्षणाचा वर्ग गेल्या 7 महिन्यांपासून सुरु आहे. रोज सायंकाळी 6 ते साडे 7 यावेळेत प्रशिक्षण वर्ग सुरु असतो. जमेची बाजू म्हणजे हा वर्ग पुर्णपणे मोफत आहे. या वर्गात सहभागी होणारे कबड्डीपटू कोल्हापूरसह शिरोली, इचलकरंजी, आजरा, राधानगरी, कोवाड (ता. चंदगड) रत्नागिरी, पुणे, मुंबई उपनगर, नांदेड, परभणी, खानापूर (बेळगाव) येथील आहेत. हे सर्वजण एकविरा ऍपॅडमीच्याच माध्यमातून राज्यस्तरीय स्पर्धेसह खेलो इंडिया व शिवाजी विद्यापीठाच्या संघातून आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धा खेळले आहेत.


त्यांच्यात कबड्डीसाठी लागणारी लवचित निर्माण करण्यासाठी प्रशिक्षक पाटील हे आधुनिक पद्धतीचा एक्झरसाईज करवून घेत आहेत. याचबरोबर ऑलिंपिक व प्रो-कबड्डीच्या धर्तीवर फिजीकल फिटनेटसह सामन्यात विरुद्ध संघावर चढाई कशी करावी आणि विरुद्ध संघाकडून आपला बचाव कसा करावा याचाही प्रात्याक्षिकांसह सराव करवून घेत आहेत. ही सर्व प्रात्याक्षिके कबड्डीपटू सुरज कुसाळे, निशांत नेवगे, प्रथमेश पाटील या तिघांच्या मदतीने करून दाखवली जातात. सरावानंतर कबड्डीपटूंना दैनंदिन आहार कोणता घ्यावा याची माहितीसुद्धा पाटील यांच्याकडून दिली जाते. जोपर्यंत जिल्हा प्रशासन सरावासाठी मैदाने खुली करण्याचे निर्देश देणार नाही, तोपर्यंत ऑनलाईन प्रशिक्षण सुरू राहणार असल्याचे प्रशिक्षक पाटील यांनी सांगितले.
इच्छूकांना ऑनलाईन प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी…
16 वर्षावरील व 60 किलो वजनावरील खेळाडूंना प्राधान्य.
खेळाडूची उंचीही 6 फुटांपर्यत असावी.
खेळाडूंकडे कबड्डीचे किट असणे आवश्यक.
9420456159 या मो. क्रमांक फोन करुन ऍपॅडमीच्या व्हॉटस् ग्रुपमध्ये ऍड करण्यास सांगावे.
ऑलिंपिकच्या धर्तीवर प्रशिक्षण..
कबड्डी हा बॉडी कॉन्टॅक्ट येणारा खेळ आहे. त्यामुळे एकविरा ऍपॅडमीचे संस्थापक, प्रशिक्षक दीपक पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग चालवितानाच ऑलिंपिकच्या धर्तीवरही त्याचे नियोजन केले आहे. व्हिडीओच्या माध्यमातून ते आम्हा खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण देत आहेत. काळानुसार बदललेल्या कबड्डीतील चढाई व बचावाच्या कौशल्याची माहितीसुद्धा ते सांगत असतात. त्यामुळे खेळाडूंना प्रो-कबड्डीच्या संघांसह आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठीचा राजमार्ग सापडला आहे.