Tarun Bharat

ऑनलाईन शिक्षणासाठी ग्रामीण मुलांची ‘वणवण’

सिंधुदुर्गातील मोबाईल सेवा बेभरवशी

ग्रामीण भागात विद्यार्थी फिरतात नेटवर्कच्या शोधात : अभ्यासासाठी डोंगरभागात, वस्तीपासून जावे लागते दूर

मोबाईल कंपन्यांचा सोयीस्कर दुर्लक्ष : ऑनलाईन शिक्षणापासून ग्रामीण मुले राहतायेत वंचित

प्रतिनिधी / कुडाळ:

सिंधुदुर्गातील मोबाईल सेवा बेभरवशी असल्याने ग्रामीण भागातील शाळकरी मुलांना आपला ऑनलाईन अभ्यास पूर्ण करण्यासाठी डोंगरभागात तसेच वस्तीपासून दूर असलेल्या भागात नेटवर्क शोधत फिरावे लागत आहे. मात्र, याकडे मोबाईल कंपन्या सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामीण भागातील शालेय मुलांना ऑनलाईन शिक्षणापासून मुकावे लागत आहे.

कोरोनामुळे सुरुवातीला लॉकडाऊन व त्यानंतर सर्वच भागातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, ज्युनिअर व सिनिअर कॉलेजसह सर्वच शैक्षणिक आस्थापने कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी बंद ठेवण्यात आली. मुलांचा अभ्यास थेट ऑनलाईन सुरू झाला. सिंधुदुर्गात बी.एस.एन.एल., जिओ, आयडिया, एअरटेल, व्होडा आदी मोबाईल कंपन्यांची सेवा आहे. मात्र, या सेवा बेभरवशी असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासासाठी रोजच डोंगरातील उंच भागावर किंवा नेटवर्क मिळेल, अशा वस्तीपासून दूरवरील ठिकाणी जावे लागत आहे.

सिंधुदुर्गातील बालवाडी, अंगणवाडीपासून ते कॉलेजपर्यंतचे सर्वच शिक्षण तसेच विविध कार्यालयीन कामे ऑनलाईन होत असल्याने नेटचा स्पीड कमी होतो. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण मात्र ग्रामीण भागातील मुलांना दुरापास्त झाले आहे. जिल्हय़ात सेवा देणाऱया मोबाईल कंपन्या मात्र यात कोणतीही सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत नाहीत, राजकीय नेते मंडळीही या मोबाईल कंपन्यांच्या दुर्लक्षाकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

                   बीएसएनएल कोलमडली

दहा वर्षांपूर्वी सरकारी बी.एस.एन.एल. कंपनीने सिंधुदुर्ग जिल्हय़ातील बहुतांशी गावात मोबाईल सेवा देण्याच्यादृष्टीने नियोजन केले. अनेक ठिकाणी टॉवर उभारले. लँडलाईन व मोबाईल सेवेचे चांगल्याप्रकारे जाळे शहराबरोबर ग्रामीण भागातही पसरविले. त्यामुळे बहुतांशी सिंधुदुर्गवासियांकडे बी. एस. एन. एल. मोबाईल व नेट सुविधा होती. बी.एस.एन.एल. बरोबर इतर कंपन्यांनी फक्त शहरी भागात आपली सेवा सुरू केली. गेल्या पाच वर्षांपूर्वी काही भाग अपवाद वगळता जिल्हय़ात महत्वाचे गाव, बाजारपेठांमध्ये नेट मिळू लागले. त्यानंतरही बी.एस.एन.एल.ने टॉवर मंजुरी व उभारणीचे काम हाती घेतले. मात्र, दूरसंचार खात्याचे खासगीकरणाचे वारे सुरू झाले आणि मोठय़ा जोमाने सुरू असलेली कामे रेंगाळू लागली.

                   अनेक टॉवर रखडले

सिंधुदुर्गातील अनेक गावांमध्ये टॉवरना मंजुरी देण्यात आली. काही ठिकाणी पायाही बांधण्यात आला. मात्र, दूरसंचारच्या खासगीकरणाच्या धोरणामुळे कामे रखडली. अनेक ठिकाणी वीज कनेक्नश, बॅटरी तसेच टॉवर सिस्टिमचे प्रश्न निर्माण झाले. ते तसेच प्रलंबित आहेत.

         पन्नास वर्षांवरील अधिकारी-कर्मचाऱयांना सेवानिवृत्ती

केंद्र सरकार व दूरसंचारच्या धोरणानुसार सिंधुदुर्गातील पन्नास वर्षांवरील अधिकारी-कर्मचाऱयांना सक्तीने सेवानिवृत्ती देण्यात आली. त्यामुळे कर्मचारी-अधिकाऱयांमुळे तग धरुन असलेली बी. एस. एन. एल. ची सेवा पूर्णपणे कोलमडून पडली. त्यामुळे आता जिल्हय़ात बी. एस. एन. एल. चे टॉवर असूनही इंटरनेट सुविधा मिळत नाही. कारण देखभाल-दुरुस्तीसाठी कर्मचारीच नाहीत. खासगी ठेकेदाराने नेमलेल्या कामगारांचे पगार अनेक महिने दिले नसल्याने तेही काम करीत नाहीत. त्यामुळे इंटरनेट सुविधा कोलमडली आहे.

                     कोरोनाचे संकट

अशातच संपूर्ण जगाबरोबरच आपल्या देशावरही कोरोनाचे संकट आले. सिंधुदुर्गातीलही शाळा-महाविद्यालये व शैक्षणिक दालने बंद ठेवण्यात आली. गेल्या शैक्षणिक वर्षाचा काही अपवाद वगळता उर्वरित अंतिम परीक्षा रद्द करण्यात आल्या. हे कोरोना संकट ओढवण्यापूर्वी सिंधुदुर्गातील ग्रामीण भागात पोहोचलेल्या बी.एस.एन.एल.च्या सेवेला मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण व गाव-शहरातील रस्त्यांच्या कामामुळे झालेल्या खोदाईमुळे तुटलेल्या केबलने घरघर लागली आणि आता तर ही सेवा पूर्णपणे मृत्यूशय्येवर आहे.

        ऑनलाईन शिक्षण सुरूवातीपासूनच अडचणीत

2020-21 या नवीन शैक्षणिक वर्षापासून शाळा-महाविद्यालये बंद असल्याने चक्क बालवाडी, अंगणवाडीच्या मुलांपासून ते प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांपासून पदवीपर्यंतच्या सर्वच मुलांचा अभ्यास ऑनलाईन पद्धतीने सुरू झाला. शहरी भागात काही प्रमाणात मुलांपर्यंत हे ऑनलाईन शिक्षण पोहोचते. मात्र, शहरातील काही भागात इंटरनेट सुविधा मिळत नसल्याने मुले व पालकांना शहरातील उंच भागात जाऊन अभ्यास पूर्ण करावा लागत आहे.

         ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण पूर्णपणे अडचणीचे

ग्रामीण भागातील बी. एस. एन. एल. सेवा बहुतांशी भागात कोलमडली, तर अन्य कंपन्यांनी आपली सेवा सुरू केली नाही. ज्या भागात किनाऱयावर पर्यटक येतील, तिथेच सेवा मिळेल, अशा पद्धतीने टॉवर उभारले आहेत. त्यामुळे वस्तीमध्ये इंटरनेट सुविधा मिळत नाही. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांना घेऊन डोंगरभाग तसेच वस्तीपासूनच्या दूरवरच्या भागात जावे लागते. शिक्षकांनी दिलेला अभ्यास डाऊनलोड करून पुन्हा तो अभ्यास पूर्ण करून पाठविण्यासाठी दूरवर नेट शोधत फिरावे लागत आहे. पावसाच्या दिवसांत तर हे दिव्य पार करताना अनेक अडचणींना ग्रामीण भागातील मुलांना तोंड द्यावे लागत आहे. बहुतांशी ग्रामीण व दुर्गम भागातील मुलांकडे मोबाईल नसल्याने व मोबाईल असला, तर इंटरनेट सुविधा नसल्याने हे ऑनलाईन शिक्षण पोहोचलेले नाही.

           या अधिकाऱयांना रोखणार कोण?

कार्यालयात बसून ऑनलाईन शिक्षणाबाबत रोज नवनवीन आदेश काढणाऱया अधिकाऱयांना मात्र ग्रामीण मुलांच्या समस्यांची जाणीव नाही. त्या अधिकाऱयांना रोखणार कोण?, असा पालकांचा प्रश्न आहे. लोकप्रतिनिधीही या सर्व समस्येबाबत गप्पच आहेत.

          ग्रामीण भागात मोबाईल सेवा सक्षम करा

ग्रामीण भागातील मुलांपर्यंत ऑनलाईन शिक्षण प्रकिया पोहचवायची असेल, तर प्रथम ग्रामीण भागातील वस्तीपर्यंत मोबाईल इंटरनेट सुविधा पोहचविण्यासाठी शासन पातळीवरुन प्रयत्न होणे आवश्यक आहे.

Related Stories

आगामी निवडणुकाही काँग्रेस स्वबळावर लढणार

Patil_p

शल्य चिकित्सक अपुरी, चुकीची माहिती देतात!

NIKHIL_N

श्री देव मलेश्वर देवस्थानचा पूनःप्रतिष्ठापनेचा वर्धापनदिन ०१ फेब्रुवारीला

Anuja Kudatarkar

पणदुरात ‘एक गाव-एक वाण’ उपक्रम

NIKHIL_N

माजी जि. प. सदस्य चंदु मळीक यांना पितृशोक

NIKHIL_N

रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील वन्यजीवांसाठी रुग्णवाहिका!

Patil_p