आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे आयोजन : गेल्या 7 दिवसांपासून तब्बल दोन लाख कुटुंबीयांनी घातले सूर्यनमस्कार
संग्राम काटकर / कोल्हापूर
आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या श्री श्री योगा शाखेने गेल्या 15 ते 21 जून या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सूर्यनमस्कार चॅलेंज सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहात देशभरातील तब्बल दोन लाखांवर कुटुंबीयांनी सहभागी होऊन सूर्यनमस्कार घालत तंदुरुस्ती ठेवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले. सूर्यनमस्कार घालण्याचे अधित्तम फायदे काय असतात हे ही जाणून घेतले. यु-ट्युबवर आर्ट ऑफ लिव्हिंग योगा चॅलेंज या चॅनेलवर सूर्यनमस्कार वर्गाचे सकाळी 7 ते 8 या वेळेत आयोजन केले जात होते. यामध्ये श्री श्री स्कूल ऑफ योगाचे प्रशिक्षक मयुर कार्तिक हे स्वतः सूर्यनमस्काराचे फायदे सांगत नागरिकांकडून सूर्यनमस्काराची प्रात्याक्षिक करवून घेतली.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे नागरिकांमध्ये ताणतणाव वाढत आहे. यातून सुटका करुन घेण्यासाठी योगा, प्राणायम करणे सूर्यनमस्कार घालणे हा एक रामबाण उपाय आहे हे सर्वज्ञात आहे. अनेकांना योगा करायचा आहे. सूर्यनमस्कार घालायचे आहेत. पण हा योगा करायचा कसा याची नेमकी माहिती नाही. सध्या कोरोनामुळे योगाचे वर्गही बंद असल्याने इच्छा असूनही नागरिकांना योगा शिकता येत नाही, हे लक्षात घेऊन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या श्री श्री योगा शाखेने सोमवारी 21 रोजी संपन्न होणाऱया आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त ऑनलाईन पद्धतीने सूर्यनमस्कार चॅलेंज सप्ताहाचे आयोजन 15 जूनपासून होणार असल्याचे सोशल मिडीयाद्वारे जाहीर केले.
त्यानुसार ऑर्ट ऑफ लिव्हिंगच्या बेंगळूर आश्रममधून यु-ट्यूबवर आर्ट ऑफ लिव्हिंग योगा चॅलेंज या चॅनेलवर सूर्यनमस्कार वर्गाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी 54 हजार कुटुंबीय या वर्गात सहभागी झाले. सोशल मिडीयावर जशी या वर्गाची चर्चा होऊ लागली तसे नागरिकांचे वर्गात सहभागी होण्याचे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे गेल्या 7 दिवसात दोन लाखांवर कुटुंबीय या वर्गात सहभागी झाले हेते. प्रशिक्षक मयुर कार्तिक हे सूर्यनमस्कार कसे घालावेत, त्याची पद्धत कशी आहे, श्वास कुठे घ्यावा आणि कुठे सोडावा याबाबतच्या टिप्स देत सर्वांकडून प्रात्याक्षिके करवून घेत होते. रोज 30 ते 40 मिनिटे व्यायाम करा, सूर्यनमस्कार घाला आणि शरीर तंदुरुस्त आणि तणावमुक्त ठेवा संदेशही त्यांनी सर्वांना दिला.
सूर्यनमस्काराचे फायदे असे
मनाची एकाग्रता वाढते, शरीर लवचिक होते, त्वचा उजळते, हाडे मजबूत होतात, पचनशक्ती वाढते, ताणतणाव दुर होतात, रोगप्रतिकारशक्ती वाढते, शरीराचे संतुलन वाढते, रक्ताभिसरण सुधारते, ओटी पोटाचे स्नायू मजबूत होतात, श्वसनक्रीया सुधारते, शारीरिक व मानसिक स्वास्थ लाभते.
ध्यानधारणेतही देशवासिय मोठ्या संख्येने सहभागी…
सूर्यनमस्कार चॅलेंज सप्ताहाअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने पतंजली योग सुत्राचेही आयोजन करण्यात आले. सायंकाळी 7 ते रात्री सव्वा आठ या वेळेत आयोजित झालेल्या पतंजली योग सुत्रात आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी योगसाधनेचे महत्व सांगत 3 लाखांहून अधिक देशवासियांकडून रोज ध्यानधारणा करवून घेतली. तसेच त्यांनी ध्यान केल्याने मनशांती, आत्मशक्ती, चांगले आरोग्य लाभते, असे सांगत सर्वांना कायमस्वरुपी योगा आणि धानधारणा करण्याचा संदेश दिला असल्याचे ऑर्ट ऑफ लिव्हिंगचे कोल्हापुरातील योगा प्रशिक्षक मंदिर चव्हाण यांनी सांगितले.

