नवी दिल्ली \ऑनलाईन टीम
ज्युनियर पैलवान सागर धनखडच्या हत्ये प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार विरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे. माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागर धनखडच्या मृत्यू प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप सुशील कुमारवर आहे. त्याच्या शोधासाठी दिल्ली पोलिसांची पथकं रवाना झाली आहे. परंतु तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. सुशील कुमार परदेशात पसार झाला असावा असा संशय पोलिसांना आहे. देशाच्या सर्व विमानतळांवर ही माहिती देण्यात आली.
पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, चौकशीसाठी सुशील कुमार व इतर कुस्तीपटूना घराकडे कायदेशीर नोटीस पाठवल्या गेल्या आहेत. तपासणी दरम्यान मंगळवारी घटनेच्या दिवशी मॉडेल टाऊनमधील सुशील गट आणि सागरच्या गटामध्ये भांडण झाल्याचे समोर आले आहे.
दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये 4 मे रोजी पैलवानांमध्ये झालेल्या हाणामारीत माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागर धनखडचा मृत्यू झाला . त्याच्या हत्येमध्ये सुशील कुमारचा सहभाग असल्याचा आरोप आहे. सागरच्या हत्येनंतर सुशील कुमार आपल्या साथीदारांसह उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये पळून गेल्याचं म्हटलं जात होतं. त्याचं अखेरचं मोबाईल लोकेशन हरिद्वारमध्ये सापडलं आहे. त्यानंतर मात्र त्याचा फोन बंद येत आहे. तो नेपाळमध्ये पळाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे नेपाळच्या सीमेवरही बंदोबस्त आणि चौकशी वाढवली आहे.

