Tarun Bharat

ऑस्ट्रेलियन महिला संघाचा एकतर्फी विजय

पाकिस्तानला 7 गडी राखून नमवले, ऍलिसा हिलीचे दमदार अर्धशतक

माऊंट माऊंगनुई / वृत्तसंस्था

सलामीवीर ऍलिसा हिलीचे दमदार अर्धशतक आणि गोलंदाजांच्या सांघिक, भेदक माऱयाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने आयसीसी महिला वनडे विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात पाकिस्तानचा 7 गडी राखून धुव्वा उडवला. प्रारंभी, पाकिस्तानला निर्धारित 50 षटकात 6 बाद 190 धावांवर समाधान मानावे लागले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन महिला संघाने 34.4 षटकात 3 बाद 193 धावांसह सहज, एकतर्फी विजय संपादन केला. ऑस्ट्रेलियन महिला संघाचा हा या स्पर्धेतील दुसरा विजय आहे.

विजयासाठी 191 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यष्टीरक्षक-फलंदाज ऍलिसा हिलीने 79 चेंडूत 7 चौकारांसह 72 धावांची शानदार खेळी साकारली आणि तिच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 15.2 षटकांचा खेळ बाकी राखत सहज विजय संपादन केला.

या स्पर्धेतील पहिल्या लढतीत इंग्लंडचा धुव्वा उडवणाऱया ऑस्ट्रेलियाने येथे पाकिस्तानविरुद्ध लढतीत देखील विजयी घोडदौड कायम राखली. येथील विजयासह ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान झाला तर पाकिस्तानचा संघ तळाच्या स्थानी फेकला गेला. पाकिस्तानला यापूर्वी आपल्या सलामी लढतीत भारताकडून पराभव पत्करावा लागला.

मंगळवारी झालेल्या लढतीत हिली व रॅशेल हेन्स (34) यांनी 60 धावांची भागीदारी साकारत संघाला उत्तम सुरुवात करुन दिली. पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकांनी दोन-एक जीवदाने दिली, याचाही ऑस्ट्रेलियन महिला संघाने पुरेपूर लाभ घेतला. यापूर्वी, इंग्लंडविरुद्ध सलामी लढतीत शानदार शतक झळकावणाऱया हेन्सने येथे चेंडूमागे एक धाव या समीकरणाने फलंदाजी करत 34 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले. अंतिमतः तिची खेळी फिरकीपटू नश्रा संधूने (1-30) संपुष्टात आणली.

हिली व लॅनिंग (35) यांनी त्यानंतर आणखी आक्रमणावर भर देत पाकिस्तानच्या गोलंदाजांची जोरदार पिटाई केली. हिलीने अवघ्या 55 चेंडूत आपले 14 वे अर्धशतक साजरे केले. तिच्या खेळीत 7 चौकारांचा समावेश राहिला. पाकिस्तानची फिरकीपटू ओमिमा सोहेलने (2-39) ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगला 22 व्या व हिलीला 28 व्या षटकात बाद करत धक्के दिले. पण, तोवर ऑस्ट्रेलियाचा विजय सुनिश्चित झाला होता. एलिसा पेरी (नाबाद 26) व बेथ मुनी (नाबाद 23) यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.

पाकिस्तानची फलंदाजीत हाराकिरी

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर पाकिस्तानची आघाडी फळी कोसळत राहिली आणि यातून त्यांना कित्येक प्रयत्नानंतरही सावरता आले नाही. एकवेळ 13 षटकात 4 बाद 44 अशी पडझड झाल्यानंतर कर्णधार बिस्माह मारुफ (नाबाद 78) व अष्टपैलू रियाझ (53) यांनी पाचव्या गडय़ासाठी 99 धावांची भागीदारी साकारली. 45 व्या षटकात रियाझला पायचीत करत कॅरेने ही जोडी फोडली. पाकिस्तानतर्फे आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील ही सर्वोच्च भागीदारी ठरली. अपत्यप्राप्तीनंतर 7 महिन्यातच पुनरागमन करणाऱया मारुफने जोरदार फलंदाजी केली. मात्र, तिचे हे प्रयत्न खूपच कमी पडले.

मारुफने 122 चेंडूंचा सामना करत 8 चौकारांसह नाबाद 78 धावांची खेळी साकारली. अर्धशतक साजरे करताच तिने गॅलरीत असलेल्या आपल्या 7 महिन्यांच्या कन्येकडे बॅटने निर्देश करत आनंद साजरा केला. ऑस्ट्रेलियन अनुभवी सीमर्स मेगन स्कट (1-43), एलिसा पेरी (1-27), निकोला कॅरे (1-36) यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. याशिवाय, फिरकी गोलंदाज ऍलाना किंग (2-24) व ऍमान्दा (1-25) यांनीही समयोचित मारा केला.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान महिला संघ ः 50 षटकात 6 बाद 190 (बिस्माह मारुफ 122 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 78, अलिया रियाझ 109 चेंडूत 4 चौकारांसह 53, फातिमा साना 15 चेंडूत 14, ओमिमा सोहेल 12. अवांतर 10. ऍलाना किंग 2-24, मेगन स्कट, एलिसी पेरी, ऍमान्दा वेलिंग्टन, निकोला कॅरे प्रत्येकी 1 बळी).

ऑस्ट्रेलिया महिला संघ ः 34.4 षटकात 3 बाद 193. (ऍलिसा हिली 79 चेंडूत 7 चौकारांसह 72, रॅशेल हेन्स 34 चेंडूत 34, मेग लॅनिंग 37 चेंडूत 6 चौकारांसह 35, एलिसा पेरी नाबाद 26, बेथ मुनी नाबाद 26. अवांतर 3. ओमिमा सोहेल 2-39, नश्रा संधू 1-30).

कोट्स

फलंदाजी करताना मला किरकोळ वेदना जाणवल्या. पण, त्याबाबत चिंतेचे काही कारण नाही. या सामन्यातील विजयामुळे द. आफ्रिका व विंडीजविरुद्ध पुढील लढतीत आमचे मनोबल आणखी उंचावलेले असेल.

-ऑस्ट्रेलियाची कर्णधार ऍलिसा हिली

आमचे आघाडीचे फलंदाज अगदीच अपयशी ठरले. क्षेत्ररक्षणात काही झेल सोडले नसते तर आम्ही सामन्यात परतू शकलो असतो. आघाडीतील किमान एका फलंदाजाने खोलवर फलंदाजी करणे गरजेचे आहे.

-पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारुफ

Related Stories

कमिल मिशाराला मायदेशी येण्याचा आदेश

Patil_p

माद्रीद टेनिस स्पर्धेत साबालेन्का विजेती

Patil_p

लॉक डाऊनच्या काळात धोनी, अश्विनकडून ऑनलाईन प्रशिक्षण

prashant_c

विंडीज क्रिकेट निवड सदस्यपदी बुचर

Patil_p

स्कॉटिश महिला फुटबॉल स्पर्धेत बालादेवीचा गोल

Patil_p

ऑलिंपिकसाठी भारतीय मुष्टीयोद्ध्यांची संख्या वाढण्याची शक्यता कमी

Patil_p