Tarun Bharat

ऑस्ट्रेलियाकडून पाकला 351 धावांचे आव्हान

वृत्तसंस्था/लाहोर

तिसऱया आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीत गुरूवारी खेळाच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने यजमान पाकला विजयासाठी 351 धावांचे आव्हान दिले असून पाकने दिवसअखेर दुसऱया डावात बिनबाद 73 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱया डावात उस्मान ख्वाजाने नाबाद शतक (104) तर वॉर्नरने अर्धशतक (51) झळकविले.

तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत पहिले दोन सामने अनिर्णित राहिले असून या शेवटच्या कसोटीत  शुक्रवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी निकाल अपेक्षित आहे. पण पाकच्या कामगिरीवरच या कसोटीचे भवितव्य अवलंबून राहील. या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 391 धावा जमविल्यानंतर पाकने पहिल्या डावात 268 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पाकवर पहिल्या डावात 123 धावांची आघाडी मिळविली. ऑस्ट्रेलियाने बिनबाद 11 या धावसंख्येवरून खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांनी आपला दुसरा डाव 60 षटकांत 3 बाद 227 धावांवर घोषित केला.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱया डावात उस्मान ख्वाजा आणि वॉर्नर यांनी सलामीच्या गडय़ासाठी 96 धावांची भागिदारी केली. वॉर्नर 51 धावांवर बाद झाला. शाहीन आफ्रिदीने त्याचा त्रिफळा उडविला. वॉर्नरने 91 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकार नोंदविले. वॉर्नर बाद झाल्यानंतर उस्मान ख्वाजा आणि लाबुशाने यांनी दुसऱया गडय़ासाठी 65 धावांची भर घातली. नौमन अलीने लाबुशानेला झेलबाद केले. त्याने 58 चेंडूत 6 चौकारांसह 36 धावा जमविल्या. स्टीव्ह स्मिथ नसीम शहाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 1 चौकारांसह 17 धावा जमविताना ख्वाजासमवेत तिसऱया गडय़ासाठी 55 धावांची भागिदारी केली. उस्मान ख्वाजाने 178 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 104 तर हेडने 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 11 धावा जमविल्या. पाकतर्फे शाहीन आफ्रिदी, नसीम शहा आणि नौमन अली यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

पाकने दुसऱया डावाला सावध प्रारंभ करताना 27 षटकांत बिनबाद 73 धावा जमविल्या. अब्दुल्ला शफीक 69 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 27 तर इमाम उल हक 93 चेंडूत 4 चौकारांसह 42 धावांवर खेळत आहे. शुक्रवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी पाकला विजयासाठी 278 धावांची जरूरी असून त्यांचे सर्व गडी खेळावयाचे आहेत.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया प. डाव-391, पाक प.डाव-268, ऑस्ट्रेलिया दु. डाव- 60 षटकांत 3 बाद 227 (उस्मान ख्वाजा नाबाद 104, वॉर्नर 51, लाबुशाने 36, स्टीव्ह स्मिथ 17, हेड नाबाद 11, शाहीन आफ्रिदी 1-45, नसीम शहा 1-23, नौमन अली 1-55), पाक दु.डाव -27 षटकांत बिनबाद 73 (अब्दुल्ला शफीक खेळत आहे 27, इमाम उल हक खेळत आहे 42).

Related Stories

शेल्बी रॉजर्स दुसऱया फेरीत

Patil_p

विजयपथावर परतण्याची राजस्थानची महत्त्वाकांक्षा

Patil_p

क्रिस्टल पॅलेसच्या व्यवस्थापकपदी व्हिएरा

Patil_p

राधाचे 5 बळी, तरीही ट्रेलब्लेझर्स अजिंक्य!

Patil_p

आयपीएल लिलावात या खेळाडूंवरही फोकस!

Patil_p

पीएसजीला चॅम्पियन्स लीग मिळवून देणे मुख्य लक्ष्य

Patil_p