Tarun Bharat

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावात खुर्दा

Advertisements

मेलबर्नमधील दुसरी कसोटी, पहिला दिवस : बुमराहचे 4 तर अश्विनचे 3 बळी, भारत दिवसअखेर 1 बाद 36

मेलबर्न / वृत्तसंस्था

जसप्रित बुमराह (4-56) व रविचंद्रन अश्विनच्या (3-35) भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने येथील दुसऱया कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात अवघ्या 195 धावांमध्येच गुंडाळत उत्तम वर्चस्व प्राप्त केले. दिवसअखेरीस भारताने 11 षटकात 1 बाद 36 अशी सुरुवात केली. युवा सलामीवीर शुभमन गिल 38 चेंडूत 28 तर कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारा 23 चेंडूत 7 धावांवर नाबाद राहिले. हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेने दाखवलेली नेतृत्वाची चुणूक विशेष लक्षवेधी ठरली.

4 कसोटी सामन्यांच्या या मालिकेत 1-0 फरकाने आघाडीवर असलेल्या यजमान ऑस्ट्रेलियाने येथे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, हा निर्णय त्यांच्यावरच उलटल्याचे नंतर सुस्पष्ट झाले. तिसऱया स्थानावरील मार्नस लाबुशानेने 132 चेंडूत 48 धावांचे सर्वाधिक योगदान दिले. त्याच्याशिवाय, ट्रव्हिस हेडने 38 तर मॅथ्यू वेडने 30 धावा जमवल्या. या त्रिकुटाचा अपवाद वगळता त्यांचे अन्य फलंदाज मात्र ठरावीक अंतराने बाद होत राहिले आणि पाहता पाहता ऑस्ट्रेलियाचा डाव 72.3 षटकात गडगडला.

बुमराह, अश्विन दिवसभरातील स्टार ठरले. अर्थात, पदार्पणवीर मोहम्मद सिराजने (15 षटकात 2-40) मार्नस लाबुशाने (48) व कॅमेरुन ग्रीन (12) हे महत्त्वाचे फलंदाज जुन्या चेंडूवर बाद करत विशेष लक्षवेधी यश प्राप्त केले.

स्टीव्ह स्मिथविरुद्ध पुन्हा अश्विनचा जलवा

या मालिकेत विशेष लक्षवेधी मारा करत आलेल्या अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने स्टीव्ह स्मिथला शून्यावरच बाद करत धवल यश संपादन केले. एमसीजीच्या ट्रकवर फिरकी व बाऊन्सवर त्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांना सातत्याने पेचात टाकले. ऑस्ट्रेलियन सलामीवीर जो बर्न्स यष्टीमागे पंतकडे झेल देत परतल्यानंतर रहाणेने पहिल्या तासाभराच्या खेळातच अश्विनकडे चेंडू सोपवला आणि ही चाल चांगलीच फळली.

पुढे सरसावून उत्तूंग फटका मारण्याच्या प्रयत्नात मॅथ्यू वेड त्याचा पहिला बळी     ठरला. रविंद्र जडेजाने यावेळी मागे धावत अप्रतिम झेल टिपला होता. त्यानंतर अश्विनने स्टीव्ह स्मिथला एका सरळ चेंडूवर लेग गलीवरील पुजाराकरवी झेलबाद करत सर्वात मोठा धक्का दिला. आश्चर्य म्हणजे रहाणेने पदार्पणवीर सिराजला उपाहारापूर्वी एकही षटक दिले नाही. किंचीत जुन्या आणि पूर्ण जुन्या चेंडूवर सिराज उत्तम गोलंदाजी करु शकतो, याची कल्पना असल्याने रहाणेने ही खेळी खेळली आणि ती यशस्वीही ठरली.

सिराजने उत्तम जम बसलेल्या लाबुशानेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरील गिलकडे झेल देत कसोटी क्रिकेटमधील आपला पहिला बळी नोंदवला. नंतर त्याने ग्रीनला पायचीत करत आणखी एक धक्का दिला. ऍडलेडप्रमाणे येथे कर्णधार टीम पेन (13) संघाला अडचणीतून बाहेर काढू शकला नाही. त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर हनुमा विहारीकडे सोपा झेल दिला. नंतर बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांना सहज नामोहरम केले आणि रविंद्र जडेजाने देखील 15 धावात 1 बळी घेतला.

शुभमनची चुणूक

ऑस्ट्रेलियाचा डाव 195 धावांमध्ये आटोपल्यानंतर खराब फॉर्ममधील मयांक अगरवाल खाते उघडण्यापूर्वीच बाद झाल्याने भारताची देखील खराब सुरुवात झाली. पण, त्यानंतर पुढील दशकातील आपण सर्वोत्तम फलंदाज ठरु शकतो, याची छोटीशी चुणूक जणू ताज्या दमाच्या शुभमन गिलने दाखवली. त्याने सकारात्मक खेळावर भर देत काही लक्षवेधी फटके लगावले आणि तंत्रशुद्ध खेळाची उत्तम प्रचिती दिली. दिवसअखेर गिल 38 चेंडूत 28 तर चेतेश्वर पुजारा 23 चेंडूत 7 धावांवर खेळत होते.

धावफलक

ऑस्ट्रेलिया पहिला डाव : जो बर्न्स झे. पंत, गो. बुमराह 0 (10 चेंडू), मॅथ्यू वेड झे. जडेजा, गो. अश्विन 30 (39 चेंडूत 3 चौकार), मार्नस लाबुशाने झे. शुभमन, गो. सिराज 48 (132 चेंडूत 4 चौकार), स्टीव्ह स्मिथ झे. पुजारा, गो. अश्विन 0 (8 चेंडू), ट्रव्हिस हेड झे. रहाणे, गो. बुमराह 38 (92 चेंडूत 4 चौकार), कॅमेरुन ग्रीन पायचीत गो. सिराज 12 (60 चेंडू), टीम पेन झे. विहारी, गो. अश्विन 13 (38 चेंडूत 2 चौकार), पॅट कमिन्स झे. सिराज, गो. जडेजा 9 (33 चेंडूत 1 चौकार), मिशेल स्टार्क झे. सिराज, गो. बुमराह 7 (8 चेंडूत 1 चौकार), नॅथन लियॉन पायचीत गो. बुमराह 20 (17 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), जोश हॅझलवूड नाबाद 4 (1 चेंडू, 1 चौकार). अवांतर 14. एकूण 72.3 षटकात सर्वबाद 195.

गडी बाद होण्याचा क्रम

1-10 (बर्न्स, 4.2), 2-35 (मॅथ्यू वेड, 12.5), 3-38 (स्टीव्ह स्मिथ, 14.3), 4-124 (हेड, 41.5), 5-134 (लाबुशाने, 49.3), 6-155 (ग्रीन, 61.4), 7-155 (टीम पेन, 62.6), 8-164 (स्टार्क, 67.1), 9-191 (लियॉन, 71.5), 10-195 (कमिन्स, 72.3).

गोलंदाजी

जसप्रित बुमराह 16-4-56-4, उमेश यादव 12-2-39-0, रविचंद्रन अश्विन 24-7-35-3, रविंद्र जडेजा 5.3-1-15-1, मोहम्मद सिराज 15-4-40-2.

भारत पहिला डाव : मयांक अगरवाल पायचीत गो. स्टार्क 0 (6 चेंडू), शुभमन गिल खेळत आहे 28 (38 चेंडूत 5 चौकार), चेतेश्वर पुजारा नाबाद 7 (23 चेंडूत 1 चौकार). अवांतर 1. एकूण 11 षटकात 1 बाद 36.

गडी बाद होण्याचा क्रम

1-0 (मयांक, 0.6).

गोलंदाजी

मिशेल स्टार्क 4-2-14-1, पॅट कमिन्स 4-1-14-0, जोश हॅझलवूड 2-0-2-0, नॅथन लियॉन 1-0-6-0.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वशैलीवर स्तुतिसुमने

विराट कोहली पितृत्वाच्या रजेवर मायदेशी परतल्यानंतर हंगामी सूत्रे स्वीकारलेल्या अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्वाची पहिल्या दिवशी उत्तम चुणूक दाखवून दिली आणि अनेक आजी-माजी खेळाडूंनी त्याच्या नेतृत्वाची विशेष प्रशंसा केली. रहाणेचे गोलंदाजीतील कल्पक बदल आणि उत्तम क्षेत्ररक्षण तैनात करणे महत्त्वाचे ठरले. अश्विनला लवकर गोलंदाजीला पाचारण करणे आणि सिराजला चेंडू जुना होईपर्यंत राखून ठेवणे, हे त्याचे बदल विशेष लक्षवेधी होते. रिकी पाँटिंग, शेन वॉर्न, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी रहाणेची प्रशंसा केली. सुनील गावसकर यांनी मात्र रहाणेची प्रशंसा केली तर आपण मुंबईकराची पाठराखण केली, असा अर्थ काढला जाईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Related Stories

सात्विक-चिराग शेट्टी दुसऱया फेरीत

Patil_p

प्रो कबड्डी लीग : पुणेरी पलटण, युपी योद्धा संघांचे शानदार विजय

Amit Kulkarni

टी-20 विश्वचषकासाठी हेडन पाक संघाचा मेंटर

Patil_p

वॉशिंग्टनच्या जागी शाहबाज अहमदला संधी

Patil_p

लंका प्रीमियर लीगला प्रारंभापूर्वीच धक्का

Patil_p

इंग्लंडच्या विजयात बटलरचे तडाखेबंद शतक

Patil_p
error: Content is protected !!