Tarun Bharat

ऑस्ट्रेलियाचा साडेतीन दिवसातच एकतर्फी विजय

पाहुण्या इंग्लंड संघावर 9 गडी राखून मात, लियॉनचा भेदक मारा

ब्रिस्बेन / वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाने अवघ्या साडेतीन दिवसातच इंग्लंडचा 9 गडी राखून विजय संपादन करत ऍशेस मालिकेत विजयी सलामी दिली. नॅथन लियॉनचा भेदक मारा लक्षवेधी ठरला. त्याने या लढतीदरम्यान 400 कसोटी बळींचा टप्पा सर केला.

इंग्लंडने 2 बाद 220 या धावसंख्येवरुन चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली आणि लियॉनने चौथ्याच षटकात त्यांना पहिला धक्का दिला. पहिल्या टप्प्यातच इंग्लंडचे उर्वरित 8 फलंदाज 77 धावांमध्ये गारद झाले आणि यानंतर ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी चौथ्या डावात अवघ्या 20 धावांची आवश्यकता होती. त्यांनी 5.1 षटकात एका गडय़ाच्या बदल्यात हे लक्ष्य साधले. ऍलेक्स कॅरे (9) लवकर बाद झाला. मात्र, मार्कस हॅरिसने चौकार फटकावत विजय साजरा केला.

डावाच्या प्रारंभी लियॉनने इंग्लंडच्या फलंदाजी लाईनअपला मोठा सुरुंग लावला. त्याने डेव्हिड मलानला बाद करत तिसऱया गडय़ासाठी 162 धावांची भागीदारी संपुष्टात आणली. या बळीसह त्याने निवृत्त लेगस्पिनर शेन वॉर्न (708), माजी जलदगती गोलंदाज ग्लेन मॅकग्रा (563) या कसोटीत 400 बळींचा टप्पा सर करणाऱया गोलंदाजांमध्ये स्थान मिळवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा पराक्रम गाजवणारा तो एकूण 17 वा गोलंदाज आहे. कसोटीमध्ये सर्वाधिक बळींचा विक्रम लंकन फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या खात्यावर आहे. त्याने 1992 ते 2010 या कालावधीत 800 बळी टिपले आहेत.

लियॉनने यादरम्यान डावात 91 धावात 4 बळी घेतले. वॉर्नर दुखापतग्रस्त असल्याने फलंदाजीत बढतीवर येत असलेल्या कॅरेने आपले कसोटी पदार्पण यष्टीमागे सर्वाधिक झेल टिपत साजरे केले.

या सामन्यात पहिल्या डावात अवघ्या 147 धावा नोंदवणाऱया इंग्लंडने 278 धावांची पिछाडी असताना मलान व रुट यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे संघर्षमय सुरुवात केली. पण, चौथ्या दिवशी मलानने लियॉनच्या गोलंदाजीवर लाबुशानेकडे बॅट-पॅड झेल दिल्यानंतर ही जोडी फुटली. जानेवारीत 399 वा बळी घेणाऱया लियॉनला 400 वा बळी टिपण्यासाठी तब्बल 11 महिने प्रतीक्षा करावी लागली. ऑस्ट्रेलियाने या कालावधीत एकही कसोटी खेळलेली नाही.

रुटला आपल्या मागील धावसंख्येत शनिवारी केवळ तीन धावांची भर घालता आली. ही त्याची ऑस्ट्रेलियन भूमीत ऍशेसमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याची 165 धावांची खेळी अष्टपैलू कॅमेरुन ग्रीनच्या षटकात यष्टीमागे झेल दिल्याने संपुष्टात आली. लियॉनने नंतर पोपला स्लीपमधील स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद केले आणि इंग्लंडची 2 बाद 222 वरुन 5 बाद 234 अशी पडझड झाली.

ऑस्ट्रेलियाने नवा चेंडू घेतल्यानंतर इंग्लंडची आणखी दाणादाण उडाली. बेन स्टोक्सने (14) पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर गलीवर तैनात ग्रीनकडे झेल दिला तर जोस बटलर हॅझलवूडच्या गोलंदाजीवर यष्टीमागे झेल देत तंबूत परतला. यावेळी इंग्लंडची स्थिती 7 बाद 268 अशी होती आणि ऑस्ट्रेलियाने पुन्हा फलंदाजी करण्यासाठी त्यांना आणखी 10 धावांची आवश्यकता होती.

लियॉनने नंतर ऑलि रॉबिन्सनला (8) पॉईंटकरवी झेलबाद केले तर मार्क वूडला (6) त्रिफळाचीत केले. ग्रीनने ख्रिस वोक्सला यष्टीमागे झेल देण्यास भाग पाडत इंग्लंडचा दुसरा डाव संपुष्टात आणला. या निकालामुळे इंग्लंडचा विजयाचा दुष्काळ पुन्हा एकदा कायम राहिला. 5 सामन्यांच्या मालिकेतील पुढील लढत ऍडलेड येथे गुरुवारपासून दिवस-रात्र खेळवली जाणार आहे.

धावफलक

इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद 147.

ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः सर्वबाद 425.

इंग्लंड दुसरा डाव ः हसीब हमीद झे. कॅरे, गो. स्टार्क 27 (58 चेंडूत 4 चौकार), रोरी बर्न्स झे. कॅरे, गो. कमिन्स 13 (27 चेंडूत 2 चौकार), डेव्हिड मलान झे. लाबुशाने, गो. लियॉन 82 (195 चेंडूत 10 चौकार), जो रुट झे. कॅरे, गो. ग्रीन 89 (165 चेंडूत 10 चौकार), बेन स्टोक्स झे. ग्रीन, गो. कमिन्स 14 (49 चेंडूत 3 चौकार), ऑलि पोप झे. स्मिथ, गो. लियॉन 4 (6 चेंडूत 1 चौकार), जोस बटलर झे. कॅरे, गो. हॅझलवूड 23 (39 चेंडूत 4 चौकार), ख्रिस वोक्स झे. कॅरे, गो. ग्रीन 16 (47 चेंडूत 2 चौकार), ऑलि रॉािबन्सन झे. हेड, गो. लियॉन 8 (17 चेंडू), मार्क वूड त्रि. गो. लियॉन 6 (13 चेंडूत 1 चौकार), जॅक लीच नाबाद 0 (2 चेंडू). अवांतर 15. एकूण 103 षटकात सर्वबाद 297.

गडी बाद होण्याचा क्रम

1-23 (बर्न्स, 8.6), 2-61 (हमीद, 20.6), 3-223 (मलान, 73.4), 4-229 (रुट, 76.1), 5-234 (ऑलि पोप, 77.3), 6-266 (88.4), 7-268 (बटलर, 91.1), 8-286 (रॉबिन्सन, 97.5), 9-296 (वूड, 101.4), 10-297 (वोक्स, 102.6).

गोलंदाजी

मिशेल स्टार्क 20-3-77-1, हॅझलवूड 14-6-32-1, कमिन्स 20-6-51-2, लियॉन 34-5-91-4, ग्रीन 12-3-23-2, लाबुशाने 3-0-14-0.

ऑस्ट्रेलिया दुसरा डाव ः ऍलेक्स कॅरे झे. बटलर, गो. रॉबिन्सन 9 (23 चेंडू), मार्कस हॅरिस नाबाद 9 (10 चेंडूत 1 चौकार), मार्नस लाबुशाने नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 2. एकूण 5.1 षटकात 1 बाद 20.

गडी बाद होण्याचा क्रम

1-16 (कॅरे, 4.6).

गोलंदाजी

रॉबिन्सन 3-0-13-1, वोक्स 2-0-3-0, मार्क वूड 0.1-0-4-0.

ऍलेक्स कॅरेचा कसोटी पदार्पणात सर्वाधिक झेलचा विक्रम

ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरेने शनिवारी कसोटी पदार्पणात सर्वाधिक झेल घेण्याचा नवा विक्रम नोंदवला. कॅरेने इंग्लंडविरुद्ध पहिल्या ऍशेस कसोटीत एकूण 8 झेल टिपले. या निकषावर त्याने रिषभ पंतचा कसोटी पदार्पणातील 7 झेलांचा विक्रम मागे टाकला. ख्रिस रीड, ब्रायन तेबर, चमारा दनुसिंघे, पीटर नेव्हिल व ऍलन नॉट यांनीही त्यांच्या कसोटी पदार्पणात 7 झेल टिपले आहेत.

नॅथन लियॉनचे कसोटी क्रिकेटमध्ये 400 बळी

ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लियॉनने कसोटी क्रिकेटमध्ये 400 बळींचा टप्पा शनिवारी सर केला. लियॉनने डावातील 74 व्या षटकात डेव्हिड मलानला बाद करत हा टप्पा गाठला. दुसऱया डावादरम्यान त्याने एकूण 4 बळी घेतले. यात मलान, ऑलि पोप, ऑलि रॉबिन्सन व मार्क वूड यांचा समावेश राहिला.

स्लो ओव्हर-रेटमुळे इंग्लंडला 5 गुणांचा दंड

इंग्लंडला या लढतीत स्लो ओव्हर-रेटमुळे 100 टक्के मानधन कपातीचा दंड व  आयसीसी विश्व कसोटी स्पर्धेत 5 गुणांचा दंड ठोठावण्यात आला. निर्धारित वेळेत रुटच्या संघाने 5 षटके कमी टाकल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली. ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रव्हिस हेडला 15 टक्के मानधन कपातीचा स्वतंत्र दंडही ठोठावण्यात आला. हेडने बेन स्टोक्सला उद्देशून अपशब्द वापरल्याने हा निर्णय घेण्यात आला.

Related Stories

ऋषभ पंतची मुक्तता

Patil_p

हॅम्पशायरचा लियॉनबरोबरचा करार रद्द

Patil_p

भारताचा ऑस्ट्रेलियावर तेरा वर्षांनंतर पहिला विजय

Patil_p

सौदी अरेबियाचा भारतावर विजय

Patil_p

आयपीएल जेतेपदासाठी उद्या मुंबई-दिल्ली आमनेसामने

Patil_p

भारताचा चीनवर मोठा विजय

Patil_p