Tarun Bharat

ऑस्ट्रेलियाची ऍश्ले बार्टी विम्बल्डनची सम्राज्ञी

Advertisements

महिला एकेरीच्या अंतिम लढतीत प्लिस्कोव्हावर मात

लंडन / वृत्तसंस्था

ऑल इंग्लंड क्लबवर ऍश्ले बार्टी हिने तब्बल 41 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला विम्बल्डन महिला एकेरीचे जेतेपद संपादन करुन देण्याचा पराक्रम रचला. शनिवारी सायंकाळी सेंटर कोर्टच्या हिरवळीवर रंगलेल्या अंतिम लढतीत तिने झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाला 6-3, 6-7, 6-3 अशा फरकाने विजय प्राप्त केला. ऍश्लेसाठी हे कारकिर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले.

योगायोगाने महिला एकेरीत सध्या ऍश्ले बार्टी हीच अव्वलस्थानी विराजमान असून तिने या जेतेपदासह आपले अव्वल मानांकन आणखी भक्कम केले. अँजेलिका केर्बरला उपांत्य फेरीत पराभूत करत अंतिम फेरीत पोहोचलेल्या बार्टीने आपली विजयी घोडदौड येथील निर्णायक लढतीत देखील कायम राखली.

बिग-सर्व्हिंग प्लिस्कोव्हाने दुसरा सेट 7-6 फरकाने जिंकत या लढतीत आपले अस्तित्व कायम राखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, नंतर निर्णायक तिसऱया सेटमध्ये बार्टीने पुन्हा एकदा 6-3 अशी बाजी मारत विजयश्री खेचून आणली.

 पुरुष एकेरीत ज्योकोव्हिच अंतिम फेरीत

सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोव्हॅक ज्योकोव्हिचने ग्रँडस्लॅम स्पर्धांमधील आपली घोडदौड कायम राखत अंतिम फेरीत धडक मारली. त्याने सेंटर कोर्टवर रंगलेल्या उपांत्य लढतीत 10 व्या मानांकित डेनिस शापोव्हालोव्हला 7-6 (3), 7-5, 7-5 अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला. ज्योकोव्हिचसाठी हा विम्बल्डनमधील सलग 20 वा विजय ठरला. ऑल इंग्लंड क्लबवर आज मॅटेओ बेरेटिनीविरुद्ध तो अंतिम लढतीत उभा ठाकणार आहे.

ज्योकोव्हिचसमोर उपांत्य फेरीत तुलनेने बराच अननुभवी डेनिस होता आणि ज्योकोव्हिचला सरळ सेट्समध्ये विजय संपादन करण्यासाठी फारसे प्रयास करावे लागले नाहीत. ज्योकोव्हिचने दुसऱया सेटमध्ये 5 पैकी 5 ब्रेक पॉईंट वाचवत आपली हुकूमत अधोरेखित केली. ज्योकोव्हिच आता आपल्या कारकिर्दीतील 6 व्या विम्बल्डन जेतेपदासाठी निर्धाराने प्रयत्न करेल. एखाद्या बडय़ा स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारण्याची त्याची ही कारकिर्दीतील 30 वी वेळ आहे.

Related Stories

थाळीफेकपटू सीमा पुनिया ऑलिम्पिकसाठी पात्र

Patil_p

ब्राझील, चिलीची विजयी सलामी

Patil_p

माँटेरी टेनिस स्पर्धेत फर्नांडिझ विजेती

Patil_p

गुजरातचे पदकविजेते होणार मालामाल!

Patil_p

झिदान्सेक पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

न्यूझीलंडला विजयाची संधी

Patil_p
error: Content is protected !!