Tarun Bharat

ऑस्ट्रेलियाचे पाकला 506 धावांचे कठीण आव्हान

पाकच्या दुसऱया डावात बाबर आझमचे नाबाद शतक

वृत्तसंस्था/ कराची

दुसऱया क्रिकेट कसोटीतील मंगळवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करीत असून यजमान पाकने दुसऱया डावात चिवट फलंदाजी करत हा सामना अनिर्णित राखण्याचा प्रयत्न करीत आहे. पाकने दुसऱया डावात 2 बाद 192 धावा जमविल्या असून त्यांना अद्याप 314 धावांची गरज आहे. कर्णधार बाबर आझमने नाबाद शतक तर शफीकने नाबाद अर्धशतक झळकविले. या कसोटीतील खेळाचा शेवटचा दिवस बाकी असून ऑस्ट्रेलियाचा संघ बुधवारी विजयासाठी प्रयत्नशील राहील. ऑस्ट्रेलियाने पाकला निर्णायक विजयासाठी 506 धावांचे कठीण आव्हान दिले आहे.

तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत पहिली कसोटी अनिर्णित राहिली होती. कराचीच्या दुसऱया कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसापासूनच आपले वर्चस्व ठेवले. ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 9 बाद 556 धावांवर घोषित केल्यानंतर पाकला पहिल्या डावात 148 धावांत गुंडाळले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 408 धावाची आघाडी घेतली असतानाही पाकला फॉलोऑन दिला नाही.

ऑस्ट्रेलियाने 1 बाद 81 या धावसंख्येवरून मंगळवारी चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांनी आपला दुसरा डाव 2 बाद 97 धावांवर घोषित करत पाकला 506 धावांचे कठीण आव्हान दिले. लाबुशाने शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 1 षटकार आणि 5 चौकारांसह 44 धावा जमविल्या. लाबुशाने बाद झाल्यानंतर कर्णधार कमिन्सने डावाची घोषणा केली. उस्मान ख्वाजा 4 चौकारांसह 44 धावांवर नाबाद राहिला. पाकतर्फे शाहीन आफ्रिदी आणि हसन अली यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

पाकच्या दुसऱया डावाला चांगली सुरूवात झाली नाही. 6 व्या षटकांत लियॉनने इमाम उल हकला केवळ एका धावेवर पायचीत केले. त्यानंतर ग्रीनने अझहर अलीला 6 धावांवर पायचीत केल्याने पाक संघावर अधिक दडपण आले. पण सलामीचा शफीक व कर्णधार बाबर आझम या जोडीने तिसऱया गडय़ासाठी अभेद्य 171 धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरला. शफीक 226 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 71 तर कर्णधार बाबर आझम 197 चेंडूत 12 चौकारांसह 102 धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियातर्फे लियॉन आणि ग्रीन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी बुधवारी पाकचे आठ गडी बाद करावे लागतील.

संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया प. डाव 9 बाद 556 डाव घोषित, पाक प. डाव 53 षटकांत सर्वबाद 148, ऑस्ट्रेलिया दु. डाव 22.3 षटकांत 2 बाद 97 डाव घोषित (उस्मान ख्वाजा नाबाद 44, वॉर्नर 7, लाबुशाने 44, हसन अली 1-23, शाहीन आफ्रिदी 1-21), पाक दु. डाव 82 षटकांत 2 बाद 192 (बाबर आझम खेळत आहे 102, शफीक खेळत आहे 71, इमाम उल हक 1, अझहर अली 6, लियॉन 1-50, ग्रीन 1-15).

Related Stories

ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांच्या खोडसाळपणामुळे गोंधळ

Patil_p

यजमान ऑस्ट्रेलिया 152 धावांनी आघाडीवर

Patil_p

एकतर्फी विजयासह दिल्ली पुन्हा ‘टॉप’वर

Patil_p

ऑलिम्पिक रद्द करा, पुरस्कर्त्यांची मागणी

Patil_p

पी.गुणेश्वरन दुसऱया फेरीत

Patil_p

सिनेर, व्हेरेव्ह उपांत्य फेरीत

Patil_p