Tarun Bharat

ओव्हलवर दुमदुमली विराट विजयाची ललकारी!

Advertisements

चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा 157 धावांनी धडाकेबाज विजय

लंडन / वृत्तसंस्था

उमेश यादव (3-60), शार्दुल (2-22), जसप्रित बुमराह (2-27) व रविंद्र जडेजाच्या (2-50) भेदक माऱयासमोर दाणादाण उडालेल्या इंग्लिश संघाचा भारताने चौथ्या कसोटीत तब्बल 157 धावांनी एकतर्फी धुव्वा उडवला आणि 5 कसोटी सामन्यांच्या या मालिकेत 2-1 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. इशांत-शमीसारखे दोन अव्वल गोलंदाज संघात नसताना देखील इंग्लंडचा दुसरा डाव 92.2 षटकात 210 धावांत गारद करण्याचा पराक्रम संघाने गाजवला. इंग्लंडसमोर दुसऱया डावात सर्वबाद 368 धावांचे लक्ष्य होते.

इंग्लंडने सोमवारी सामन्याच्या पाचव्या व शेवटच्या दिवशी बिनबाद 77 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात केली. मात्र, रोरी बर्न्स व मलान अवघ्या 20 धावांच्या अंतरात बाद झाले आणि तेथून पडझडीला सुरुवात झाली. मलान धावचीत झाला, तो या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.

पुढे, बुमराह व जडेजा यांच्या भेदक माऱयासमोर इंग्लंडची चहापानापर्यंत 8 बाद 193 अशी दाणादाण उडाली आणि त्यानंतर भारताचा विजय ही निव्वळ औपचारिकता होती. अँडरसनला उमेश यादवने शेवटच्या गडय़ाच्या रुपाने बाद केले आणि येथेच भारताच्या दणकेबाज विजयावर शिक्कामोर्तब झाले.

रुट ठरला शार्दुलचे सावज

या पूर्ण मालिकेत उत्तम बहरात असलेल्या इंग्लिश कर्णधार जो रुटने (36) येथेही मोठी धावसंख्या रचण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली होती. पण, आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याने शार्दुलचा बाहेर जाणारा चेंडू यष्टीवर ओढवून घेतला होता. रुट बाद झाला, तेथेच इंग्लिश प्रतिकार जवळपास संपुष्टात आल्याचे पहिले संकेत मिळाले.

अश्विनच्या पाठीराख्यांकडून जडेजाच्या निवडीला विरोध केला जात असल्याचे एकंदरीत चित्र राहिले. मात्र, या जडेजानेच सर्व टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देताना हसीब हमीदला पायचीत करत मोठा अडथळा दूर सारला. 63 धावा जमवणाऱया हसीबला अति बचावात्मक फटका खेळण्याची मोठी किंमत मोजावी लागली.

उजव्या हाताने फलंदाजी करणाऱया फलंदाजासाठी लेग स्टम्पच्या आऊटसाईडला काही तडे गेले होते. त्याचा जडेजाने उत्तम विनियोग करुन घेत हसीबला चुकीचा फटका खेळण्यास भाग पाडले. जडेजाचा हा चेंडू बॅटला चकवा देत ऑफ स्टम्प उद्ध्वस्त करुन गेला.

बुमराहचा भेदक मारा

त्यानंतर बुमराहच्या शार्प इनस्विंगर्सची जादू सुरु झाली. त्याने ओलि पोप (2) व जॉनी बेअरस्टो (0) यांना भेदक यॉर्कर्सवर त्रिफळाचीत करत आपली उपयुक्तता नव्याने सिद्ध केली. पोपला बाद करत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये आपला 100 वा बळीही घेतला. पोपला बुमराहने टाकलेला हा यॉर्कर अगदी वकार युनूससारख्या दिग्गजाला देखील अभिमानास्पद वाटावा, इतका अप्रतिम होता.

हवेतच किंचीत वळलेला हा चेंडू अगदी योग्य वेळी बेअरस्टोच्या तळपायाचा वेध घेणारा होता. बेअरस्टोला वेळीच बॅट खाली घेता येण्याचीही स्थिती नव्हती आणि यष्टी उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याची निराशा होणे स्वाभाविक होते. बुमराहने याच षटकात रुटला असाच भेदक यॉर्कर टाकला होता. पण, त्यावेळी रुट बचाव करण्यात सुदैवी ठरला. लिजेंडरी शेन वॉर्नने बुमराहचा हा स्पेल इंग्लिश हंगामातील सर्वोत्तम असल्याची पोचपावती दिली. बुमराहने एका स्पेलमध्ये 6 षटके, 3 निर्धाव, 6 धावात 2 बळी, असे धडाकेबाज पृथक्करण नोंदवले.

इतकी पडझड कमी असेल म्हणून की काय, मोईन अली जडेजासाठी ‘वॉकिंग विकेट’ ठरला. जडेजाच्या डावखुऱया फलंदाजासाठी ऑफ स्टम्पवरील रफवर चेंडू टाकण्याचा प्लॅन मोईन अलीला सहज बाद करुन गेला. चेंडू अधिक उसळल्यानंतर बॅटीच्या ब्लेडला स्पर्शला आणि चेतेश्वर पुजाराऐवजी शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करणाऱया बदली खेळाडू सुर्यकुमार यादवने सहज झेल पूर्ण केला. यामुळे अवघ्या 6 षटकातच इंग्लंडची 2 बाद 141 वरुन 6 बाद 147 अशी पडझड झाली. इंग्लंडने उपाहारानंतर 14 षटकात 19 धावांमध्येच 4 फलंदाज गमावले.

उपाहारानंतरच भारतीय संघ या लढतीत ड्रायव्हिंग सीटवर राहिला. पहिल्या डावात निष्प्रभ ठरलेल्या शार्दुलने येथे 41 व्या षटकात संघाला पहिले यश मिळवून दिले. शार्दुलचा फुल्लर चेंडू बर्न्सला यष्टीमागे पंतकडे झेल देण्यास भाग पाडला. डेव्हिड मलानला (5) धावचीत होत परतावे लागले. मधली फळी परतल्यानंतर मात्र भारताचा विजय ही निव्वळ औपचारिकता होती.

धावफलक

भारत पहिला डाव ः सर्वबाद 191.

इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद 290.

भारत दुसरा डाव ः सर्वबाद 466.

इंग्लंड दुसरा डाव ः रोरी बर्न्स झे. पंत, गो. ठाकुर 50 (125 चेंडूत 5 चौकार), हसीब हमीद त्रि. गो. जडेजा 63 (193 चेंडूत 6 चौकार), डेव्हिड मलान धावचीत (बदली खेळाडू-मयांक/पंत) 5 (33 चेंडू), जो रुट त्रि. गो. शार्दुल 36 (78 चेंडूत 3 चौकार), ओलि पोप त्रि. गो. बुमराह 2 (11 चेंडू), जॉनी बेअरस्टो त्रि. गो. बुमराह 0 (4 चेंडू), मोईन अली झे. बदली खेळाडू-सुर्यकुमार, गो. जडेजा 0 (4 चेंडू), ख्रिस वोक्स झे. राहुल, गो. यादव 18 (47 चेंडूत 1 चौकार), क्रेग ओव्हर्टन त्रि. गो. यादव 10 (29 चेंडूत 1 चौकार), ओलि रॉबिन्सन नाबाद 10 (32 चेंडूत 2 चौकार), जेम्स अँडरसन झे. पंत, गो. यादव 2 (5 चेंडू). अवांतर 14 (बाईज 2, लेगबाईज 5, नोबॉल 7). एकूण 92.2 षटकात सर्वबाद 210.

गडी बाद होण्याचा क्रम

1-100 (रोरी बर्न्स, 40.4), 2-120 (मलान, 53.1), 3-141 (हसीब, 61.3), 4-146 (पोप, 64.5), 5-146 (बेअरस्टो, 66.3), 6-147 (मोईन, 67.2), 7-182 (रुट, 80.1), 8-193 (वोक्स, 84.1), 9-202 (ओव्हर्टन, 88.5), 10-210 (अँडरसन, 92.2).

गोलंदाजी

उमेश यादव 18.2-2-60-3, जसप्रित बुमराह 22-9-27-2, रविंद्र जडेजा 30-11-50-2, मोहम्मद सिराज 14-0-44-0, शार्दुल ठाकुर 8-1-22-2.

बॉक्स

जसप्रितने मोडला कपिलचा विक्रम

आघाडीचा स्पीडस्टार जसप्रित बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 बळी घेणारा पहिला भारतीय जलद गोलंदाज ठरला. त्याने ऑलि पोपला बाद करत हा माईलस्टोन सर केला. बुमराहने आपल्या 24 व्या कसोटी सामन्यात विक्रमाला गवसणी घातली. कपिलने 100 बळी घेण्यासाठी 25 सामने खेळले होते.

माजी भारतीय गोलंदाज इरफान पठाण या यादीत 28 सामन्यांसह तिसऱया स्थानी तर मोहम्मद शमी चौथ्या स्थानी आहे. जलद, फिरकी अशा सर्व गोलंदाजांमध्ये सर्वाधिक 100 बळी घेण्याचा भारतीय विक्रम अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या खात्यावर आहे. त्याने अवघ्या 18 सामन्यातच हा विक्रम सर केला. 2013 मध्ये विंडीज दौऱयात त्याने या विक्रमावर आपली मोहोर उमटवली होती.

ब्लर्ब

उभय संघातील पाचवी व शेवटची कसोटी शुक्रवारपासून मँचेस्टरमध्ये खेळवली जाईल.

बॉक्स

भारताचे इंग्लिश भूमीतील मोठय़ा फरकाने विजय

वर्ष / कर्णधार / ठिकाण / फरक

2021 / विराट कोहली / ओव्हल / 157 धावा

2021 / विराट कोहली / लॉर्ड्स / 151 धावा

2018 / विराट कोहली / नॉटिंगहम / 203 धावा

2014 / एमएस धोनी / लॉर्ड्स / 95 धावा

2007 / राहुल द्रविड / नॉटिंगहम / 7 गडय़ांनी

2002 / सौरभ गांगुली / लीड्स / डाव व 46 धावा

1986 / कपिल देव /लीड्स / 279 धावा

1986 / कपिलदेव / लॉर्ड्स / 5 गडय़ांनी

1971 / अजित वाडेकर / ओव्हल / 4 गडय़ांनी

Related Stories

फ्रान्स महिला फुटबॉल संघाकडून बेल्जियम पराभूत

Patil_p

5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर साकारले टिटमसचे स्वप्न!

Patil_p

#TokyoOlympics: पी.व्ही. सिंधूकडून हाँगकाँगच्या चेंग गँनचा पराभव करत नॉकआऊट’मध्ये प्रवेश

Archana Banage

ऑस्ट्रेलियाची वनडे मालिकेत विजयी आघाडी

Patil_p

भारतीय महिला संघाचा एकतर्फी विजय

Patil_p

फुटबॉल सम्राट पेलेच्या विश्वविक्रमाशी छेत्रीची बरोबरी

Patil_p
error: Content is protected !!