मुंबई / ऑनलाईन टीम
वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असलेली बॉलिवू़ड अभिनेत्री कंगना राणावत कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. तिनेच इन्स्टाग्रामवर याबद्दल माहिती दिली होती. कोरोना हा एका छोटासा फ्लू असून, तो माझ्या शरीरात पार्टी करतोय, असे तिने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले होते. यामुळे इन्स्टाग्रामने तिची ही पोस्ट डिलिट करत तिला दणका दिला आहे. ट्वीटर पाठोपाट कंगानाला इन्स्टाने चांगलाच दणका दिला आहे. यावर गप्प बसेल ती कंगना कसली, तिने यावर पुन्हा एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. यामुळे सोशल मीडियावर पुन्हा ती चर्चेत आली आहे.
कोरोनाने देशात थैमान घातले असताना कंगनाने कोरोनाबातीत केलेल्या पोस्टवर सोशल मीडियावर मोठी टीका झाली होती. अनेकांनी तिला याचा जाब विचारला होता. अखेर कंगनाची ती पोस्ट इन्स्टाग्रामने डिलिट केली आहे. यानंतर पुन्हा कंगनाने इन्स्टाग्रामवर एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. यात तिने म्हटले आहे की, इन्स्टाग्रामने माझी पोस्ट डिलिट केली आहे. मी त्यात कोरोनाला नष्ट करण्याविषयी बोलले होते. यातून काही जणांच्या भावना दुखावल्या गेल्या. ट्विटरवर दहशतवादी आणि कम्युनिस्टांचे पाठीराखे असतात हे माहिती होते परंतु, कोरोना फॅन क्लब. हे खूपच भारी आहे. मी दोन दिवस झाले इन्स्टावर आले आहे. परंतु, येथे मी आठवडाभरापेक्षा जास्त काही काळ टिकण्याची शक्यता कमी असल्याचे तिने म्हटले आहे.
काही दिवसापूर्वीच कंगनाचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले आहे. याला कारण म्हणजे कंगनाने पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल आक्षेपार्ह ट्विट केली होती. कंगनाचे वर्तन द्वेष पररवणारे आणि इतरांना दूषणे देणारे आहे, असे ट्विटरने म्हटले होते. या कारवाईनंतर कंगनाने म्हटले होते की, माझा आवाज उठवण्यासाठी माझ्याकडे अनेक प्लॅटफॉर्म आहेत.

