Tarun Bharat

कंग्राळी खुर्दचा रस्ता,वाहनचालकांच्या खस्ता!

Advertisements

ठिकठिकाणी रस्ताकाम अर्धवट : दोन वर्षांपासून जीव मुठीत घेऊन प्रवास : अधिकारी-ठेकेदारांचे अक्षम्य दुर्लक्ष : निर्णायक लढय़ाच्या पवित्र्यात जनता

वार्ताहर /कंग्राळी खुर्द

येथील शिवमूर्तीपासून ते वेंगुर्ला रोडपर्यंतचा रस्ता म्हणजे मृत्युचा सापळा बनला आहे. बऱयाच ठिकाणी रस्ता बांधकामाचे साहित्य, ठिकठिकाणी काम अर्धवट ठेवलेले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पावसाळय़ात पाण्याचा आणि सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारींसाठी खोदण्यात आलेल्या चरी, त्याच्या बाजूला अर्धवट बनविण्यात आलेले पदपथ, रस्त्याशेजारी लावलेली व्यावसायिकांची वाहने, त्यातच रस्त्यावर अनेक व्यावसायिकांनी थाटलेली दुकाने, 20 ते 25 गावांची ये-जा करणारी शेकडो वाहने अशा अनेक समस्यांना सामोरे जात वाहनचालक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. या रस्त्याची दुरवस्था होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. प्रत्येक प्रवाशाला या रस्त्यावरून जाताना खस्ता खाव्या लागत आहेत. या रस्त्यासंबंधीत कोणी वाली आहे की नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

अनेक गावांशी जोडलेला रस्ता

हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यालगतच कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. शिवाय बेळगाव-कंग्राळी-कडोलीमार्गे हा रस्ता पुणे-बेंगळूर रस्त्याला जोडतो. तसेच कंग्राळी खुर्द – अगसगा, हंदिगनूरमार्गे महाराष्ट्र हद्दीशी हा रस्ता जोडला गेला आहे. यावरून या रस्त्याचे महत्त्व लक्षात येते. रस्त्याचा काही भाग महानगरपालिका हद्दीत येतो तर उर्वरित भाग बांधकाम खात्याच्या अंतर्गत येतो.

आंदोलनानंतर रस्ता बांधणीला सुरुवात

या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते आणि महानगरपालिकेने साफ दुर्लक्ष केले होते. त्यामुळे रस्ता खड्डेमय झाला होता. याबाबत या भागातील वाहनचालकांनी कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीमार्फत संबंधितांना अनेकवेळा निवेदने दिली होती. शिवाय रस्त्यावरील खड्डय़ांमध्ये वृक्षारोपण, रास्ता रोको अशा अनेक आंदोलनानंतर दोन वर्षापूर्वी सुंदर शहरांतर्गत निधी मंजूर झाला होता. तरीपण कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले.

ठेकेदाराचा निष्काळजीपणा आणि अधिकाऱयांचा बेजबाबदारपणा

प्रारंभीपासूनच ठेकेदाराने कामाला संथगतीने सुरुवात केली. रस्ता बांधणीसाठी अर्धा रस्ता उखडण्यात आला. उर्वरित रस्त्याचे काम झाल्यानंतर पुन्हा काम थांबविले. दोन्ही बाजुंच्या गटारी करणे गरजेचे असताना रस्ता कामाला तुकडा पद्धतीने सुरुवात करण्यात आली होती. काम अर्धवट असताना दोन्ही बाजूला गटारी खोदाई केली, पण गटारीतील मातीची लवकर उचल केली नाही. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ता बांधकामाचे साहित्य, अर्धवट केलेला रस्ता त्यामुळे वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

गटारीही अर्धवट

कंग्राळी खुर्द शिवमूर्तीपासून ज्योतीनगर क्रॉसपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटारी अर्धवट आहेत. पाच ते सात फूट खोलीच्या गटारी काढण्यात आल्या आहेत. त्या गटारींचे काम अद्याप अपूर्ण आहेत. परिसरातील अनेक घरमालकांनी घरातील सांडपाणी त्या गटारीमध्ये सोडले आहे. त्यामुळे या अर्धवट गटारींमुळे सांडपाणी निचरा होण्यास अडचणी निर्माण होऊन ठिकठिकाणी सांडपाण्याची डबकी निर्माण झाली आहेत. डासांची वाढ झाली होती. सर्वत्र दुर्गंधीचा फैलाव झाल्यामुळे लोकांना अनेक साथीच्या रोगांशी सामना करावा लागत आहे.

गटारींची खोली, रुंदी जास्त असल्याने जनावरांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महिला, वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांना याचा मोठा त्रास होत आहे. लहान मुलांचे अंगणात खेळणे, बागडणेही दुरापास्त झाले आहे.

वाहन अडकण्याच्या प्रकारांत वाढ

रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारींसाठी खोदाई केली आहे. यामध्ये सांडपाणी, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी वेगवेगळय़ा पाईप्स घातल्या आहेत. ते काम निकृष्ट दर्जाचे केले आहे. कारण पाईप घातल्यानंतर त्या व्यवस्थित बुजविणे गरजेचे होते. या मुख्य रस्त्यावरून ज्योतीनगर, रामनगर परिसर, रामदेव गल्ली, वैंकुठ रोड आदी दोन्ही बाजूला चार ते पाच ठिकाणी प्रवेशद्वार आहेत. त्याठिकाणी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे अवजड वाहने चिखलात अडकून बसण्याच्या घटना घडत आहेत.

काही विपरीत घडल्यास अधिकारी जबाबदार

सदर रस्त्यासाठी अनेक वर्षापासून झगडावे लागत आहे. रस्ता लवकर पूर्ण करावा, दर्जा राखावा यासाठी ग्रामस्थांच्या पुढाकारातून अनेकदा आंदोलने केली. तरी प्रशासनाला जाग येत नाही. तरी अधिकारी वर्गाने कंग्राळी खुर्दवासियांचा अंत पाहू नये, काहीतरी विपरीत घडल्यास याला संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा देण्यात आला आहे.

– जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील

निर्णायक लढा देणार

कंग्राळी खुर्द येथील शिवमूर्तीपासूनचा रस्ता करण्याला सुरुवात होऊन जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ गेला आहे. रस्त्यासाठी ग्रा पं.च्या पुढाकाराने जि. पं. सदस्यांच्या सहकार्यातून अनेकवेळा आंदोलने केली. तरी संबंधित अधिकारी वर्गाला जाग येत नाही. यासाठी ग्रा. पं. च्या मासिक बैठकीत रस्ता कामाबाबत ठोस निर्णय घेऊन निर्णायक लढा देणार आहे.

– यल्लाप्पा पाटील, ग्रा. पं. अध्यक्ष 

रस्ता लवकर पूर्ण करावा

रस्त्याच्या आंदोलनामध्ये हिरीरीने भाग घेतला आहे. हा रस्ता सुरू करून अनेक महिने झाले तरी रस्ता अद्याप अर्धवट आहे. याचा त्रास अगसगा, कंग्राळी खुर्द, हंदिगनूर, कडोली, जाफरवाडी आदी गावच्या वाहनचालकांना होत आहे. तरी संबंधितांनी याची दखल घेऊन रस्ता काम लवकरात लवकर पूर्ण करावा.

– मोहन बेळगुंदकर, माजी नगरसेवक

कामाची लवकरच पाहणी करू

स्मार्ट सिटीचे वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकारी प्रवीण बागेवाडी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी आठ दिवसांपूर्वी याठिकाणी कार्यभार सांभाळला आहे. लवकरच या कामाची पाहणी करणार असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

– स्मार्ट सिटीचे वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकारी प्रवीण बागेवाडी

Related Stories

शिवशक्तीचे 15 लाख गाळप उद्दिष्ट

Patil_p

सांबरा एअरमन टेनिंग स्कूलला मानवेंद्रसिंग यांची भेट

Amit Kulkarni

इटनाळ जवळ 22 किलो चंदन जप्त

Tousif Mujawar

संकेश्वरमधील आठ जण ‘निगेटिव्ह’

Tousif Mujawar

तानाजी गल्ली रेल्वेगेटजवळील ‘त्या’ गटारीवर काँक्रिट घाला

Amit Kulkarni

अँटी रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम

mithun mane
error: Content is protected !!