वार्ताहर / कंग्राळी खुर्द
कंग्राळी खुर्द ग्राम पंचायत हद्दीमध्ये कोरोनाच्या दुसऱया लाटेने हाहाकार माजविला आहे. दीड महिन्याच्या कालावधीत एकूण 71 जण बाधित आढळले आहेत. यामध्ये 52 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 9 रुग्ण घरी तर 6 रुग्ण रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे 4 रुग्ण दगावले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे श्रेय आरोग्य विभागाच्या आशा सेविकांचे परिश्रम तर ग्रा. पं. सदस्यांनी गाव बंदचा आदेश, गावात स्वच्छतेवर भर देऊन नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कंबर कसली आहे. त्याला ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे साथ दिली. सर्वांच्या सहकार्याने कंग्राळी खुर्द वासियांनी थोडय़ाफार प्रमाणात कोरोनावर मात केली असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
रविवारी बैठकीचे आयोजन
तालुक्यासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन आरोग्य विभाग व ग्राम पंचायतीच्या सहकार्यातून विविध उपाययोजना आखत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी कंग्राळी खुर्द येथील महात्मा फुले मंगल कार्यालयामध्ये आरोग्य विभाग आणि ग्राम पंचायतीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील होते.
यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी बी. बी. संपगावी, श्रीमती एस. डी. लंबोजी, गायत्री माडीवाळ, अनुपमा शिवनगेकर, सुषमा पाटील, हेमा हावळ, लक्ष्मी सुतार, माया लोहार, निर्मला पाटील यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य रमेश कांबळे, वैजनाथ बेन्नाळकर, धनाजी तुळसकर, राकेश पाटील, विनायक कम्मार आदी उपस्थित होते.
बाधितांसाठी कोरोना सेंटरची व्यवस्था
ज्या कोरोना बाधितांवर घरातच उपचार करण्यात येत आहेत, त्यांच्यासाठी घरामध्ये वेगळय़ा रुमची व्यवस्था करावी लागते. मात्र, ज्या घरामध्ये व्यवस्था करण्यास जागा नसेल अशा बाधितांची देवराज अर्स हॉस्टेल तसेच कंग्राळी खुर्द गावच्या गायरानात असलेल्या कुमारस्वामी ले आऊटमधील शासकीय हॉस्टेलमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे. या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, औषधोपचार, जेवणाचा खर्च प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. याशिवाय शासकीय रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात येणार आहे. रुग्णसेविका वेळेत उपलब्ध नसल्यास ग्राम पंचायतीतर्फे रुग्ण नेण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी, ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, रमेश कांबळे यांनी दिली.
यावेळी आरोग्य अधिकारी बी. बी. संपगावी, ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, सदस्य रमेश कांबळे यांनी आरोग्याविषयी माहिती दिली. डोळे लाल होणे, नाकाला सुज येणे अशी प्राथमिक लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाच्या परिचारिकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.