Tarun Bharat

कंग्राळी खुर्द-बेळगाव रस्ताकाम अर्धवट स्थितीत

वार्ताहर / कंग्राळी खुर्द

कंग्राळी खुर्द ते बेळगाव या मुख्य रस्त्यावरील शिवमूर्ती ते एपीएमसी संरक्षक भिंतीपर्यंतचे रस्त्याचे काम अर्धवट करून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याच्या पूर्वेकडील अर्धा भाग सीसी रस्ता करण्यात आला आहे. पश्चिमेकडील रस्ता करण्याकडे संबंधित ठेकेदाराने साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील रहदारीमुळे रस्ता पूर्णपणे खड्डय़ांनी व्यापला आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱयांच्या बेजबाबदारपणामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बेळगाव-कंग्राळी खुर्द या रस्त्याच्या बाजार समिती प्रवेशद्वारासमोरून सार्वजनिक बांधकाम खात्याची हद्द सुरू होते. या खात्याने गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या देखभालीकडे साफ दुर्लक्ष केले होते. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडले होते. या रस्त्यावरून रहदारी करणारे वाहनचालक वैतागले होते. त्यामुळे हा रस्ता करण्यासंदर्भात कंग्राळी खुर्द ग्राम पंचायत आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने संबंधितांना अनेकदा निवेदन देण्यात आले होते. याकडेसुद्धा अधिकारीवर्गाने साफ दुर्लक्ष केले होते. त्यामुळे रास्तारोको करण्यात आला. नागरिकांच्या आंदोलनाची दखल घेत हा रस्ता सुंदर शहर अंतर्गत करण्यासाठी निविदा काढून रस्त्याच्या कामाला वर्षभरापूर्वी सुरुवात करण्यात आली. मात्र रस्ता ठेकेदारांचा बेजबाबदारपणा रस्ताकामाच्या सुरुवातीपासून नागरिकांना आला. कारण रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने चालू करण्यात आले. रस्ता करण्यासाठी ठेकेदाराने एक बाजूचा रस्ता पूर्णपणे खोदला. त्यावर भरती टाकून रस्त्याचे काम थांबविण्यात आले. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे पुन्हा रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. आणि अर्धा रस्ता सीसी करण्यात आला आणि महिन्याभरापासून काम अर्धवट करून ठेकेदाराने पोबारा केला आहे. त्यामुळे या रस्त्याची इतकी दुरवस्था झाली आहे की रस्त्याचा अर्धा भाग पूर्णपणे खड्डय़ांनी व्यापला आहे. बऱयाच ठिकाणी दोन-तीन फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. त्यातच पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्डय़ांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक वाहने नादुरुस्त होत आहेत. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुचाकी घसरण्याच्या प्रकारात वाढ झाली. यामधून छोटे-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे वाहनचालक व ग्रामस्थ वैतागले आहेत.

रस्ता अनेक गावांशी संपर्कात

कंग्राळी खुर्द ते बेळगाव हा रस्ता अनेक गावांच्या संपर्कात येतो. कंग्राळी खुर्द, अलतगा, जाफरवाडी, कडोली, चलवेनहट्टी, बंबरगा, केदनूर, गुंजेनहट्टी, हंदिगनूर, अगसगा आदी गावांशी या रस्त्याचा संबंध येतो. याशिवाय रस्ता बेळगाव-कंग्राळी खुर्द, अलतगा, हंदिगनूरमार्गे महाराष्ट्र हद्दीशी जोडला गेला आहे. बेळगाव-कंग्राळी खुर्द, कडोलीमार्गे हा रस्ता पुणे-बेंगळूर या राष्ट्रीय महामार्गाला मिळाला आहे. यावरून या रस्त्याचे महत्त्व लक्षात येते. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. त्यासाठी या रस्त्याचे काम संबंधित अधिकाऱयांनी ठेकेदाराला लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सूचना करावी, अशी मागणी होत आहे.

पुढील रस्तासुद्धा अर्धवट

बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेशद्वारापासून ते ज्योतीनगर क्रॉसपर्यंतच्या रस्त्याच्या कामालासुद्धा महिन्याभरापूर्वी सुरुवात करण्यात आली. यासाठी रस्त्याच्या पूर्वेकडचा भाग खोदण्यात आला आहे. चार दिवस खोदण्याचे काम झाले. पुन्हा या रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आले आहे. अर्धवट रस्त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या भागातील नागरिकांना कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. 

Related Stories

अज्ञात वाहनाच्या धडकेत आंबेवाडीचा युवक जागीच ठार

Amit Kulkarni

अवमान याचिकाप्रकरणी अधिकाऱ्यांना नोटीस

Amit Kulkarni

महाराष्ट्रातील तिसऱया शहराला मिळणार विमानसेवा

Patil_p

दसरा जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेला प्रारंभ

Amit Kulkarni

बेळगावमध्ये पेट्रोल दर नव्वदी पार

Amit Kulkarni

कूपनलिका दुरुस्तीकडे कानाडोळा

Amit Kulkarni