Tarun Bharat

कचऱयाचा पुनर्वापर

सर्व कचरा हानिकारक नसतो. कचऱयाचे अनेक प्रकार असतात. त्यातील मुख्य दोन प्रकार म्हणजे सेंद्रिय आणि असेंद्रिय. असेंद्रिय कचरा अनेक पद्धतीने पुन्हा वापरला जाऊ शकतो. सेंद्रिय कचरा प्रत्येक माणसाला उपयोगात आणणे सहज शक्मय आहे.  यासाठी इच्छाशक्ती अत्यावशक आहे. कचऱयाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलायला हवा. कचरा ही समस्या म्हणून न पाहता त्याकडे एक संधी म्हणून पाहायला हवे.

घनकचरा समस्येला सामोरे जाण्यास जरी आपला कायदा सुयोग्य असला तरी खरी अडचण अंमलबजावणीची आहे. कचरा समस्येला आपणही तितकेच जबाबदार आहोत हे लक्षात घ्यायला हवे. आपला परिसर स्वच्छ ठेवावा, चॉकलेट खाऊन  कागद तिथेच फेकू नये. पाणी पिऊन झाल्यावर बाटली गाडीच्या खिडकीतून भिरकाऊ नये. या बाबी आपण लक्षात ठेवत नाही. तसे वळण आणि शिस्त मुलांना लावत नाही. आपण निष्काळजीपणे वस्तू टाकून देतो आणि विसरून जातो. आपला परिसर म्हणजे कचरा टाकण्याचे ठिकाण आहे असंच आपण समजतो.

एका बाजूला आपण निर्माण करत असलेल्या कचऱयाची नीट विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आपण घेत नाही. तर दुसऱया बाजूला आपला वस्तूंकडे बघण्याचा दुष्टिकोनच बदलतो आहे. आज बाजारात अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. त्या विकत घेण्याची आपली क्षमताही वाढली आहे. पण त्यासोबत जबाबदारी येते हे आपण लक्षात घेतलेले नाही. एखादी वस्तू विकत घेताना आपल्याला त्याचा नक्की उपयोग आहे की नाही हे न पाहता आपण वस्तू घेत राहतो.

वाढती लोकसंख्या व आर्थिक परिस्थिती त्याच बरोबर रोजगार, वैयक्तीक मिळकत, पुन्हा उपयोगात आणण्यासाठी प्रक्रिया करता येण्यासारख्या वस्तूंचे महत्त्व, व्यवस्थापन यंत्रणेची किंमत अशा अनेक गोष्टी घनकचरा निर्मितीवर परिणाम करतात. आपली जीवनशैली व गोष्टी उपभोगण्याची पद्धतच घनकचऱयाचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरते. आजच्या उपभोक्तावादी समाजात प्रति व्यक्ती प्रति दिन कचरा वाढीचे प्रमाण लोकसंख्या वाढीच्या प्रमाणापेक्षा अधिक गतीने वाढत आहे. आणि तो आणखी वाढेल अशी चिन्हे आहेत.

घनकचरा समस्या ही दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. हा घनकचरा साफ करणे म्हणजे एक आव्हान आहे. असक्षम व्यवस्थापनामुळे आधीच प्रदूषित झालेल्या पाणी आणि मातीमध्ये सुधारणा करणे अशक्मयप्राय गोष्ट आहे. असक्षम व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनाबद्दल असलेल्या बेफिकीर दृष्टिकोनाचा परिणाम पर्यावरणाच्या दर्जावर व सार्वजनिक स्वास्थ्यावर होतो आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान, खालावलेले पर्यावरण व सार्वजनिक स्वास्थ्याचा आजचा दर्जा धोकादायक परिस्थितीच्या वरचा आहे.

कचरा हा दुसऱया कोणाची तरी समस्या आहे असे म्हणून चालणार नाही. आपण निर्माण करणाऱया कचऱयाचे व्यवस्थापन करण्यासाठी सामाजिक जागृती, राजकीय इच्छाशक्ती व प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.

प्रत्येकाने स्वत:च्या परिसरात निर्माण होणाऱया घनकचऱयाचे प्रमाण कमीत कमी करण्याचे प्रयत्न करायलाच हवेत. नागरिकांनी कचऱयाचे वर्गीकरण चार प्रकारात करावे. रिसाइकलेबल (पुन्हा प्रक्रिया करता येण्यासारखा), रियुसेबल (आहे त्याच स्वरूपातील टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरता येण्यासारखा), बायोडिग्रेडेबल (विघटन होणारा) आणि प्रक्रिया न करता येण्याजोगा कचरा.  विघटन होणाऱया कचऱयावर प्रक्रीया करून त्याचा खत म्हणून वापर करण्याची जबाबदारीही आता नागरिकांचीच आहे.

प्रक्रिया करून पुन्हा वापरता येईल असा किंवा पुन्हा तसाच वापरता येईल असा कचरा उचलणारे आणि तो संबंधित यंत्रणेकडे पाठवून तो परत एकदा वापरात आणणारे अनेक उद्योग आज आपल्याकडे आहेत. कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत, स्वच्छ सारख्या संस्था मोलाची कामगिरी बजावतात. बाजारातील प्रत्येक वस्तूतून जे काही वाचवण्याजोगे आहे ते पुन्हा उपयोगात आणण्याचे काम या संस्था करतात. अशा उद्योगांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आणि कचरा वर्गीकरणापासून ते त्यावर प्रक्रिया करणाऱया उद्योगांपर्यंतच्या विविध संस्था-उद्योगांची साखळी ठिकठिकाणी निर्माण होईल अशा संस्था-उद्योगांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

कचरा कमी करण्याचे मार्ग

 टाकाऊ गोष्टींचा जास्तीत जास्त वापर आणि त्यावर पुनरप्रक्रिया करायला हवी.

घरातील आपापल्या कचऱयाचा बंदोबस्त कसा केला पाहिजे याबद्दल लोकांना माहिती उपलब्ध करुन लोकांचा सहभाग वाढवायला हवा.

प्रत्येक घराला कचरा व्यवस्थापनेच्या रचनेशी जोडायला हवे.

कचरा व्यवस्थापन कर्मचाऱयांना सुरक्षित व आरोग्याला हितकारक अशा सुविधा पुरवायला हव्यात.

कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा स्वीकार करायला हवा.

महत्वाच्या कल्पना

कचऱयातून वीजनिर्मिती, खतनिर्मिती उद्योगांना चालना. ग्राहकांनी वापरून परत केलेल्या वस्तूंची पुनरप्रक्रिया करण्यासाठी त्या त्या उत्पादन कंपन्यांची स्वतःची व्यवस्था.

घनकचरा जिथे तयार होतो तिथेच त्याचे वर्गीकरण झाले पाहिजे. प्रत्येक घर, उद्योग, संस्था (शाळा, महाविद्यालय, देऊळ, तीर्थक्षेत्र, उपहारगृहे) या प्रत्येकाने जैविक कचऱयाची विल्हेवाट आपापली लावली पाहिजे. व कचऱयाच्या वर्गीकरणाची जबाबदारीही घेतली पाहिजे.

शालेय संस्था आणि संघटनांच्या मदतीने घनकचऱयाच्या वर्गीकरणाबद्दलची जागरुकता निर्माण करण्यासाठी उपक्रम राबवले जावेत. कचऱयातील फरक सांगणारी पत्रके वाटली जावीत. जैविक कचरा सोडून इतर वर्गीकरण केलेला कचरा योग्यरित्या विल्हेवाटीसाठी गोळा केला जावा.

विकेंद्रीत घन कचरा व्यवस्थापन

संपूर्ण शहराचा किंवा गावाचा घनकचरा एकत्र गोळा करण्यापेक्षा त्याची अनेक छोटय़ा-छोटय़ा केंद्रांवर विल्हेवाट लावणं उपयुक्त ठरेल. एखाद्या वॉर्डमध्ये जमा होणारा अजैविक कचरा शहराबाहेर टाकण्यापेक्षा त्याची त्याच वॉर्डमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून विल्हेवाट लावावी. जैविक कचरा त्याच वॉर्डमधल्या एखाद्या सार्वजनिक बागेत त्याचे कंपोस्ट करून वापरता येईल. त्यातून तयार झालेले खत विकताही येईल. वॉर्डमधली भाजी मंडई, उपहारगृहे इत्यादींचा जैविक कचरा खासगी कंत्राटाद्वारे उपयोगात आणण्यात येईल. यामुळे अनेक स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच काही हानिकारक कचरा गोळा करण्याची वेगळी सोय केली जाईल. या सर्वांवर लक्ष स्थानिक कचरा व्यवस्थापन विभागाची शाखा ठेवेल.

ज्या भाजी मंडई, उपहारगृहे, हॉटेल्स, कारखाने कचरा नियोजन कंपनीकडे नियमित कचरा देत असतील त्यांना स्वच्छता करामध्ये सूट. हे सर्व काम खासगी कंपन्यांच्या मदतीने केले जाईल.

कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभाग

कचरा व्यवस्थापनामध्ये प्रायोगिक, अभ्यासपूर्ण कार्यक्रम राबविण्यासाठी विशेष शास्त्रज्ञ आणि अभियंता यांची मदत घेतली जाईल. जैविक कचऱयाचे कंपोस्ट करून खत विकण्यात येईल. शहरातील सर्व भाजी मंडई, धान्य बाजार, उपहारगृहे व कचरा व्यवस्थापन करणारी खासगी कंपनी एकत्रितरित्या फायदेशीर कार्यक्रम राबवतील. यातून अनेक कचरा नियोजनाच्या नवीन पद्धती उदयास येतील.

Related Stories

आर्चीचे नवे रूप

Patil_p

प्रयत्न वाळूचे…

tarunbharat

कर्मण्ये वाधिकारस्ते

Patil_p

शेव टोमॅटो नू शाक

Patil_p

मका लागवड लाभदायक

Patil_p

सुरक्षा महत्वाची

Patil_p
error: Content is protected !!