Tarun Bharat

कच्चे तेल झाले स्वस्त, ग्राहकांना दिलासा शक्य

ग्राहक अन् कंपन्यांना होणार लाभ ः आंतरराष्ट्रीय स्तरावर आश्वासक चित्र ः कंपन्यांची भूमिका महत्त्वाची

नवी दिल्ली

 कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत जवळपास 14 रुपयांनी कपात होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची (ब्रेंट) किंमत जानेवारीपासून नीचांकी पातळीवर आहे. याचे दर आता 81 डॉलरपर्यंत खाली आले आहेत. यूएस क्रूड प्रति बॅरल सुमारे 74 डॉलर आहे. 

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठय़ा घसरणीमुळे, भारतीय रिफायनरीजसाठी (भारतीय बास्केट) कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 82 डॉलर इतकी कमी झाली आहे. मार्चमध्ये 112.8 डॉलर इतकी किंमत होती. त्यानुसार, रिफायनिंग कंपन्यांसाठी कच्च्या तेलाच्या किमती 8 महिन्यात 31 डॉलरने (27 टक्के) कमी झाल्या आहेत.

एसएमसी ग्लोबल यांच्या मते, देशातील तेल कंपन्या कच्च्या तेलात 1 डॉलरची घसरण झाल्यावर शुद्धीकरणावर प्रति लिटर 45 पैसे वाचवतात. त्यानुसार पेट्रोल-डिझेलचे दर 14 रु. प्रति लिटर कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तथापि, तज्ञांच्या मते, संपूर्ण कपात एकाच वेळी होणार नसल्याचीही माहिती आहे. 

दरवाढीमागील 3 कारणे

1. तेल कंपन्यांना प्रति बॅरल 245 रुपये बचत

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या सध्याच्या किमतींनुसार कच्च्या तेलाची भारतीय बास्केट प्रति बॅरल 85 डॉलर इतकी असायला हवी होती, पण ती 82 डॉलरच्या आसपास आली आहे. या किंमतीनुसार, तेल विपणन कंपन्या रिफायनिंगवर सुमारे 245 रुपये प्रति बॅरल (159 लिटर) वाचवतील.

2. तेल कंपन्यांचा तोटा आता संपला  

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले होते की, सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या विक्रीवर नफा कमावण्यास सुरुवात केली आहे, परंतु डिझेलला अद्याप 4 रुपये प्रति लिटर तोटा सहन करावा लागत आहे. त्यांच्या या विधानानंतर ब्रेंट क्रूड सुमारे 10टक्के स्वस्त झाले आहे. अशा स्थितीत डिझेल विक्रीवरही कंपन्या नफ्यात आल्या आहेत.

3. कच्चे तेल दर 70 डॉलर्सच्या दिशेने …

पेट्रोलियम तज्ञ नरेंद्र तनेजा यांनी सांगितले की, ब्रेंट वेगाने 70 डॉलरच्या दिशेने जात आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर नक्कीच कमी होतील, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल. तेल आयातीपासून शुद्धीकरणापर्यंतचा हा प्रवास पूर्ण होण्यास साधारण 30 दिवसांचा कालावधी लागतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती कमी होण्याच्या घटनेनंतर एक महिन्यानंतर त्याचा परिणाम दिसून येत आहे.

Related Stories

पहिल्या रोलेबल टीव्हीची विक्री सुरू

Patil_p

भारतात मोबाईलचे पीक

Omkar B

गरुड एअरोस्पेसकडून रोजगाराच्या संधी

Patil_p

देवयानी इंटरनॅशनलचा समभाग घसरला

Patil_p

‘डीएचएफएल’च्या अधिग्रहणाचे काम पूर्ण

Patil_p

मायकल क्लार्क झाले हिरोचे सीओओ

Patil_p