Tarun Bharat

कच्च्या तेलाचे दर कमी होण्याची शक्यता

दुबई / वृत्तसंस्था

पेट्रोल-डिझेलच्या भडकलेल्या किंमतींमुळे हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कच्च्या इंधन तेलाचे (क्रूड ऑईल) उत्पादन वाढविण्यावर तेल उत्पादक देशांचे (ओपेक नेशन्स) एकमत झाले आहे. रविवारी या देशांची बैठक येथे झाली. त्यात उत्पादनवाढीचा निर्णय घेण्यात आला. ऑगस्टपासून उत्पादन वाढविले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील संघर्षामुळे गेले चार महिने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधन तेलाचे दर चढे राहिलेले आहेत. सौदी अरेबिया तेल उत्पादनात वाढ करू इच्छित असताना, संयुक्त अरब अमिरातीने अशा वाढीला विरोध दर्शविला होता. या देशांचे उत्पादनासंबंधी एकमत होत नसल्याने तेलदरात सातत्याने वाढ होत होती. सध्या कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल 80 हून अधिक आहेत. परिणामी, विकसनशील देशांची आर्थिक हानी होत आहे.

पाच देश उत्पादन वाढवणार

उत्पादनवाढीच्या निर्णयामुळे इराक, कुवेत, रशिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) या पाच देशांना तेल उत्पादनवाढीची मुभा मिळणार आहे. परिणामी, जागतिक बाजारात तेलाचा तुटवडा राहणार नाही. उत्पादन किती प्रमाणात वाढणार यावर तेलाच्या किमती ठरणार आहेत. आपण संघटनेच्या निर्णयाशी बांधील आहोत, असे प्रतिपादन युएई ने केल्याने तिढा सुटण्याच्या बेतात आहे.

समतोल साधला जाणार

गेल्या वर्षी कोरोनाच्या जागतिक उदेकामुळे उद्योगधंदे आणि व्यापार थंडावला होता. परिणामी तेलाचा खपही कमी झाला होता. तेलदर 30 डॉलर्स प्रतिबॅरल पेक्षाही खाली घसरले होते. नंतर कोरोना उद्रेक नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा आर्थिक व्यवहार सुरळीत होत असताना तेलदर मोठय़ा प्रमाणात वाढविण्यात आले. भारतासह अनेक विकसनशील देशांनी तेल उत्पादनात वाढ करण्याची मागणी ओपेक देशांकडे सातत्याने केली होती. अखेर तेल उत्पादन वाढीचा निर्णय या देशांनी घेतल्याने सर्व देशांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Related Stories

ओवैसींच्या सभेत मोदी-मोदीच्या घोषणा, दाखवले काळे झेंडे

datta jadhav

श्रीनगरमधील चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

ब्रिटनच्या विमानांवरील बंदी आणखी वाढू शकते : हरदीपसिंह पुरी

datta jadhav

माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या घराला 1.80 कोटी

Patil_p

‘बोडोलँड’प्रश्नी शांती करार

Patil_p

आमदारांवरील आरोप मागे घ्यावेत!

Omkar B