Tarun Bharat

कठोर कार्यवाहीसाठी आता मंत्र्यांवर जबाबदारी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

प्रतिनिधी/ पणजी

कोरोनाचा फैलाव वाढत चालल्याने आता मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेताना प्रत्येक तालुक्यातील कोरोना मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी मंत्र्यांवर जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज सोमवार 6 जुलैपासून होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबतची माहिती दिली.

सरकार यानंतर मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर कोरोनाविरोधी लढय़ाची जबाबदारी सोपविणार आहे. अजूनही लोक कोरोनाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. मास्क न वापरता किंवा सामाजिक दूरी न पाळता लोक वावरत आहेत. त्यामुळे मार्गदर्शक तत्वांचे योग्य प्रकारे पालन होत नाही. यानंतर तालुक्याची जबाबदारी सोपविलेल्या मंत्र्यांने ज्येष्ठ शासकीय अधिकाऱयांची बैठक घेऊन काटेकोर अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सर्व मंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. त्यामुळे आज सोमवारपासून राज्यात कोरानासंदर्भातील मार्गदर्शक तत्वांची कडकपणे अंमलबजावणी होणार आहे.

‘इम्युनिटी बुस्टर’चे वाटप राज्यभर करणार

राज्यात कोरोनामुळे सात जणांना मृत्यू आला तरीही लोक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करतात. मास्क वापरले जात नाहीत. सामाजिक दूरी पाळली जात नाही. लोकांनी अशा पद्धतीनश कोरोना विषयाकडे दुर्लक्ष करू नये. सरकार राज्यातील सर्व लोकांना इम्युनिटी बुस्टरचे वाटप करणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोविड लढय़ात मंत्र्यांचा सक्रीय सहभाग लाभणार

शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अन्य मंत्र्यांसोबत बैठक घेतली. मंत्रीही आता कोविड लढय़ात सक्रीय होणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक उपजिल्हाधिकारी, मामलेदार, आरोग्य अधीक्षक यांच्यासोबत बैठक घेणार व कडक अंमलबजावणीसाठी चर्चा करणार आहेत. कायद्याचीही कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये इम्युनिटी बुस्टर अर्सेनिकचे वितरण केले जाणार आहे.

लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या काळजीकडेही लक्ष

सोमवारपासून आमदार, सरपंच यांच्यामार्फत या आयुर्वेदिक औषधाचे वितरण केले जाणार आहे. कोविड केंद्रातील कोरोना सदृष्य लक्षणे नसलेल्या रुग्णांची काळजी कशी घेतली जाते यावर लक्ष दिले जाणार आहे. मंत्री भेट देऊन पाहणार आहेत.

मांगोरहिलबाबत आज सचिवालयात विशेष बैठ

पहिलाच कंटेनमेंट झोन असलेल्या मांगोरहिल येथे अजूनही रुग्ण सापडत आहेत. लोकांमध्येही असंतोष आहे. मांगोरहिलच्या बाबतील पूर्ण भाग सॅनिटाईज करण्यात आला आहे. नगरपालिका कर्मचाऱयांनी साफसफाई केली. रेशनचे धान्य मोफतपणे वितरित केले जाणार आहे. तसेच मांगोरहिलबाबत विशेष बैठक सोमवार 6 रोजी 11.30 वाजता पर्वरी सचिवालयात बोलाविली आहे. यावेळी मुरगाव तालुक्याचे चारही आमदार उपस्थिती लावतील. तसेच अधिकारी, मुख्यसचिव उपस्थित राहतील. मांगोरहिलबाबत पुढील निर्णय घेण्यावर चर्चा होणार आहे.

अतिरिक्त बेडची व्यवस्था

प्लाझ्मा थेरपी सुरू करण्याची तयारी सुरू आहे. वेगवेगळय़ा ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केली आहेत. विविध ठिकाणी कोविड केअर डॉक्टर टीम व स्टाफ कार्यरत आहे. यानंतर मंत्रीही आढावा घेणार आहेत. कोविड इस्पितळात 250 बेड व केअर सेंटरमध्ये 1000 बेड उपलब्ध आहेत. अतिरिक्त 500 बेडची तयारी केली जाणार आहे. पावसाळय़ात रुग्ण वाढण्याच्या शक्यतेने तयारी केली आहे. आपल्या कुटुंबातील रुग्णाला जर स्वतः जेवण पुरवायचे असेल तर तशी सुविधाही दिली जाईल. जेवण व्यवस्थित मिळाले नाही तर इम्युनिटी कमी होते. त्यामुळे जेवणाचे टिफीन बाहेर गेटवर सोपविता येईल. अतिरिक्त डॉक्टर, नर्स, स्टाफ कंत्राटी पद्धतीवर घेण्यात येणार आहे.

पोलिसांना घरी पाठवणार नाही

राज्यात विविध ठिकाणी पोलिसच कोरोनाबाधित आढळून येत असल्याने सेवा बजावणाऱया पोलिसांनाही आता घरी पाठविले जाणार नाही. त्यांच्या राहण्याजेवणाची सोय केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

वैशाली कवठणकर यांचे आभार

दुबई येथे असलेल्या गोमंतकीय वैशाली कवठणकर यांनी गोमंतकीयांना गोव्यात आणण्यासाठी खूप मदत केली. भारतीय राजदुतावासाकडे संपर्क करून त्यांनी  मदत केली. त्यांचेही आपण आभार मानतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पास्कॉल डिसोझांच्या निधनाबद्दल दुःख

मुरगाव पालिकेचे नगरसेवक व माजी मंत्री जुझे फिलीप डिसोझा यांचे बंधू पास्कॉल डिसोझा यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केले. आपण जुझे फिलीप डिसोझा यांचेही फोन करून सात्वंन केले. पास्कॉल हे नगरसेवक व ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक होते. त्यांच्या निधनाबद्दल वाईट वाटले. ते कोविड इस्पितळात होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अशी असेल मंत्र्यांवर प्रत्येक तालुक्याची जबाबदारी

मुरगाव तालुक्यात मंत्री माविन गुदिन्हो व मंत्री मिलिंद नाईक हे दोघेही आवश्यक ती काळजी घेतील. काणकोण तालुक्यात उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर जबाबदारी घेतील, तर सालसेतमध्ये उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर व मंत्री फिलीप नेरी जबाबदारी घेतील. सत्तरी तालुक्यात आरोग्यमंत्री विश्वजित राणे बैठका घेतील फेंडा तालुक्यात मंत्री विश्वजित राणे व मंत्री गोविंद गावडे जबाबदारी घेतील. पेडणे तालुक्यात उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर व आरोग्यमंत्री विश्वजित राणे बैठका घेतील. बार्देश तालुक्यात मंत्री मायकल लोबो बैठका घेतील. केपे व सांगे तालुक्यात मंत्री नीलेश काब्राल तर धारबांदोडा तालुक्यात मंत्री दीपक पाऊसकर बैठका घेतील. डिचोली तालुक्यात सोमवार 6 रोजी आपण स्वतः व सभापती राजेश पाटणेकर बैठक घेणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related Stories

बिबटय़ाचा बंदोबस्त न केल्यास अभयारण्य विभागावर मोर्चा

Amit Kulkarni

सरकारच्या भ्रष्टाचारामुळे गोव्यात कोविडचा हाहाकार

Amit Kulkarni

वाळपई प्रभाग 9 मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई

Amit Kulkarni

पणजीत 15 रोजीपासून सेरेंडिपिटी कला महोत्सवाचे आयोजन

Patil_p

मेळावलीवासीयांचे ऐका, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका: राहुल म्हांबरे

Omkar B

कुमेरीच्या सनदा 30 दिवसांत न दिल्यास न्यायालयात जाऊ

Amit Kulkarni