Tarun Bharat

कणकवलीत बॉक्सेल ब्रिजची भिंत कोसळली

Advertisements

सुदैवाने मोठा अनर्थ टळला, दुचाकीस्वार बालबाल बचावला

हायवे ठेकेदाराविरोधात राणे, पारकर आक्रमक : बॉक्सेल ब्रिज काढून टाकून पिलरवरच ब्रिजची मागणी

ऑडिट होईपर्यंत ब्रिजवरून : वाहतूक करून दाखवाच!

वार्ताहर / कणकवली:

गेले काही महिने वारंवार लक्ष वेधूनही हायवे ठेकेदार कंपनीकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिजच्या अगोदर बांधलेल्या बॉक्सेल ब्रिजच्या भिंतीचा काही भाग सोमवारी दुपारी कोसळला. घटनेनंतर दोन तास घटनास्थळी दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीचे अधिकारी आले नव्हते. दरम्यान, या ठिकाणी आलेल्या आमदार नीतेश राणे, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी शहरातील हायवेचे सर्वच काम बंद करा, अशी मागणी प्रांताधिकाऱयांकडे करत आक्रमक भूमिका घेतली. क्वालिटी कंट्रोलचे सर्टिफिकेट दाखविल्याशिवाय तुम्ही फ्लाय ओव्हरवरून वाहतूक सुरू करून दाखवाच, असा इशारा राणे यांनी प्रांताधिकाऱयांना दिला.

कणकवलीतील हायवेच्या निकृष्ट कामाच्या मुद्यावरून विविध राजकीय पक्ष व नागरिकांनी आवाज उठविला होता. वारंवार प्रशासन व दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीचे लक्ष वेधले होते. मात्र, केवळ नावापुरतेच समोर हो म्हणत नंतर या कामाच्या दर्जाबाबत काळजी घेतली जात नव्हती. कोणतीच सुधारणा होत नसताना सोमवारी या कामातील निकृष्टपणा पुन्हा एकदा समोर आला.

संरक्षक भिंतीच्या पुढील भाग कोसळला!

शहरातून जाणाऱया फ्लाय ओव्हर ब्रिजच्या सुरुवातीला व शेवटी दोन ठिकाणी बॉक्सेल ब्रिज केले आहेत. आता कोसळलेल्या ब्रिजचा भाग हा जानवली पुलाकडे सुरू होऊन एस. एम. हायस्कूलच्या पुढेपर्यंत येऊन थांबतो. महिन्याभरापूर्वी गांगो मंदिर व एस. एम. हायस्कूल समोर बॉक्सेल ब्रिजचा काही भाग खचला होता.  स्थानिकांनी आवाज उठविल्यानंतर तेथे काँक्रिटची संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, आता कोसळलेल्या भागाच्या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नव्हत्या.

दुचाकीस्वार बालंबाल बचावला!

सोमवारी दुपारी नसताना बॉक्सेल ब्रिज संपतो, तेथील सर्व्हिस रस्त्याच्या बाजूचा वरील भाग कोसळून सर्व्हिस रस्त्यावर आला. याच दरम्यान तेथून जात असलेला एक दुचाकीस्वार बालंबाल बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ज्यावेळी बाक्सेल ब्रिजचा भाग कोसळतो हे तेथील नागरिकांच्या निदर्शनास आले, तेव्हा त्यांनी तेथे धाव घेत तातडीने वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत डंपर भरेल एवढी ब्रिजच्या आतील भागातील माती, खडी व बॉक्सेल ब्रिजचे ब्लॉक सर्व्हिस रस्त्यावर आले. नंतर सुरू झालेल्या पावसाने अधून-मधून माती रस्त्यावर येत होती. मात्र, तातडीने सर्व्हिस रस्ता बंद करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष समीर नलावडे, शिवसेना नेते संदेश पारकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

ठेकेदाराच्या विरोधात रोष व्यक्त

याबाबत प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना माहिती मिळताच त्यांनीही लगेचच घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दिलीप बिल्डकॉनचे अधिकारी व हायवेच्या कामाच्या दर्जाबाबत तपासणी करणाऱया आरटी फॅक्ट कंपनीच्या अधिकाऱयांना संपर्क साधत घटनास्थळी बोलावले. यावेळी पारकर यांनी आतापर्यंत हायवेच्या निकृष्ट कामाबाबत वारंवार लक्ष वेधूनही ठेकेदार कंपनीचा निष्काळजीपणा या घटनेला कारणीभूत ठरला. कंपनीच्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे, या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालू नये, अशी भूमिका घेतली. न. पं.ने केलेल्या सूचना ठेकेदार कंपनीने गांभिर्याने घेतल्या नाहीत, असा आरोप नलावडे व नगरसेवक अबिद नाईक यांनी केला.

बॉक्सेल ब्रिजला काहीच होणार नाही!

हा पूर्ण बॉक्सेल पूल पाडत नाहीत, तोपर्यंत एस. एम. हायस्कूलकडील सर्व्हिस रस्त्यावरून वाहतूक सुरू करू नका, अगोदरच या बॉक्सेल ब्रिजचे काम निकृष्ट आहे म्हणून आम्ही आवाज उठवतो आहोत, तरी त्यावरच काम सुरू करण्यात येते हा निष्काळजीपणा आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांनी करत काम बंद करण्याची मागणी केली. केवळ येथे चर्चा करून प्रश्न सुटणार नाहीत, त्यासाठी हायवे व ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱयांना बोलावून घ्या, अशी मागणी कन्हैया पारकर यांनी केली. नगरसेवक सुशांत नाईक यांनी खासदार विनायक राऊत यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत त्यांचे याकडे लक्ष वेधले. आरटी फॅक्ट कंपनीचे अधिकारी एन. पी. सिंग यांनी काही दिवसांपूर्वी शहरात आमच्या सोबत हायवेची पाहणी केली, तेव्हा बॉक्सेल ब्रिजला काहीही होणार नसल्याचे सांगितले होते, असे प्रांताधिकाऱयांनी सांगितले.

नीतेश राणेंची आक्रमक भूमिका!

दरम्यान आमदार नीतेश राणे यांनी घटनास्थळी दाखल होत प्रांताधिकाऱयांवर प्रश्नांची सरबत्ती केली. तुम्ही अधिकारी गप्प बसता म्हणून असे प्रकार घडतात. तुमच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे. तरीही असे प्रकार घडतातच कसे? आम्ही या निकृष्ट कामाविरोधात आंदोलने केली, की आमच्यावर गुन्हे दाखल होतात. अधिकारी आपल्या बदल्या करून घेऊन येथून निघून जातात, येथील लोकांनी असेच मरायचे काय? असा सवाल केला. जिल्हय़ातील लोकांची काळजी तुमच्यासारख्या अधिकाऱयांवर असते. या घटनेला तुम्ही व जिल्हाधिकारी जबाबदार आहात, तुम्ही जर प्रामाणिक काम केले असते, तर अशाप्रकारे घटनाच घडल्या नसत्या, असे सांगत राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली.

तुम्हाला गतवर्षी सारखी आंदोलनेच अपेक्षित आहेत का!

गेल्यावर्षी आम्ही जनतेला होणाऱया त्रासाबाबत असाच आवाज उठविला, तेव्हा आमच्यावर 353 सारखे गुन्हे दाखल केले जातात. जनतेच्या समस्यांसाठी माझ्या सोबत नगराध्यक्ष नलावडे व आमचे कार्यकर्ते सात दिवस जेलमध्ये राहून आलो. त्यानंतरही ठेकेदाराच्या कामात सुधारणा होत नसेल व तुमचे दुर्लक्ष होत असेल, तर तुम्हाला आमच्याकडून गतवर्षीसारखी आंदोलने अपेक्षित आहेत का? असा प्रश्न राणे यांनी प्रांताधिकाऱयांना केला. ठेकेदार कंपनीवर वेळीच कारवाई केली असती तर आज ही वेळच आली नसती. जनतेच्या जीवाशी खेळणाऱया या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी राणे व पारकर यांनी केली.

नागरिकांची पिलरचीच मागणी होती!

ठेकेदार कंपनी आपले काम संपवून हरियाणाला जाईल, तेव्हा जनतेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल राणे यांनी केला. मुळातच या फ्लाय ओव्हर ब्रिजला बॉक्सेल भिंती मंजूर नव्हत्याच. या ठिकाणी नागरिकांची पिलरची मागणी होती मात्र ठेकेदार कंपनीने मनमानी करत या बॉक्सेलच्या भिंती बांधल्याचा आरोप पारकर यांनी केला. 

ब्रिजवरून वाहने सुरू करून दाखवाच!

आता तुम्ही फ्लाय ओव्हर ब्रिजवरून वाहतूक सुरू करून दाखवाच, जोपर्यंत  शहरातील हायवेचे काम व फ्लाय ओव्हर ब्रिजचे ऑडिट होत नाही, तोपर्यंत ब्रिजवरून वाहने जाता नयेत. दिलीप बिल्डकॉनचा मॅनेजर गौतम यांना येथे घेऊन या, अधिकारी म्हणून आम्ही तुमचा सन्मान ठेवतो पण हे असले प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशारा राणे यांनी दिला.

दरम्यान, डीवायएसपी डॉ. नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, हवालदार अभिजीत तावडे, मंगेश बावदने व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जानवली नदी पुलावरून येणारी वाहतूक टेंबवाडी रस्त्यावरून वळविण्यात आली. कणकवलीहून जानवलीच्या दिशेने जाणारी वाहतूक हॉटेल मंजुनाथ समोरील सर्व्हिस रस्त्याने वळविण्यात आली होती. यावेळी काही काळ शहरात वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी या वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणले.

राणे पारकर यांचे एकमत!

या कामाच्या ठेकेदाराला येथे बोलवून दंड करत नाहीत, तोपर्यंत ही स्थिती सुधारणार नसल्याचे राणे यांनी सांगितले. काम निकृष्ट आहे. त्यामुळे आताच काम थांबविण्याचे आदेश द्या, अशी मागणी प्रांताधिकाऱयांकडे करत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या राणे व पारकर यांचे मात्र या मुद्यावर एकमत झाले. कोणत्याही स्थितीत जनतेच्या जीवाशी खेळणाऱया ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी पारकर यांनी केली.

त्या ठेकेदाराला सोडणार नाही!

बॉक्सेल ब्रिज संपूर्ण कोसळले, तर एका घटनेने शहराला त्याचा फटका बसेल. जो पर्यंत दिलीप बिल्डकॉन कंपनीचा ठेकेदार स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट दाखवित नाही, तोपर्यंत त्या ठेकेदाराला सोडणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला.

आमची वचनपूर्ती जनतेसाठी असते!

आमच्यावर आरोप करणाऱयांनी आमची वचनपूर्ती ही जनतेसाठीच असते, असा टोला नीतेश राणे यांनी विरोधकांना लगावला. चिखलफेक आंदोलनाला वर्ष झाल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱयांकडून राणे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. राणे यांच्यावरील चिखलफेकीचा गुन्हा फास्ट ट्रक कोर्टात चालवा, अशी मागणी राणेंच्या विरोधकांकडून करण्यात आली होती.

Related Stories

दिवाळीत कोरोना टेस्ट वाढवाव्यात!

NIKHIL_N

सावंतवाडी लायन्स क्लबची सूत्रे परिमल नाईक यांच्याकडे

NIKHIL_N

मार्गताम्हानेत मध्यरात्री आग लागून कार, दुचाकी खाक

Patil_p

सिंधुदुर्गात आणखी 13 रिपोर्ट निगेटिव्ह

NIKHIL_N

जिल्हय़ात ‘लॉकडाऊन’मध्ये मोठी शिथिलता

NIKHIL_N

तक्रारीची चौकशी तीन वर्षांनंतरही पुढे सरकेना

NIKHIL_N
error: Content is protected !!