Tarun Bharat

कतार फिफा फुटबॉल वर्ल्डकपसाठी अर्जेन्टिनाचे तिकीट निश्चित

लायोनेल मेस्सीला विश्व करंडक जिंकून देण्यासाठी कारकिर्दीतील कदाचित शेवटची संधी

साओ पावलो / वृत्तसंस्था

ब्राझीलविरुद्धची लढत गोलशून्य बरोबरीत राखत अर्जेन्टिनाने पुढील वर्षी कतारमध्ये होणाऱया फिफा फुटबॉल वर्ल्डकपसाठी आपले स्थान निश्चित केले. मेस्सीला यामुळे आपल्या कारकिर्दीत पाचव्यांदा वर्ल्डकप जिंकून देण्यासाठी अनुभव पणाला लावता येईल. आजवर मेस्सीला केवळ वर्ल्डकप जेतेपदानेच सातत्याने हुलकावणी दिली आहे. विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची मेस्सीसाठी ही कदाचित शेवटची वेळ असणार आहे.

गुणतालिकेत दुसऱया स्थानी असलेल्या अर्जेन्टिनाचे स्थान चिलीच्या पराभवानंतर निश्चित झाले. चिलीला तिसऱया स्थानावरील इक्युडोरविरुद्ध मायदेशात 0-2 असा पराभव पत्करावा लागला. अर्जेन्टिना संघाच्या खात्यावर अद्याप 29 गुण असून त्यांचे अद्याप 4 सामने बाकी आहेत. उर्वरित फेऱयांमध्ये अर्जेन्टिनाला दोनपेक्षा अधिक प्रतिस्पर्धी पिछाडीवर टाकू शकणार नाहीत, हे निश्चित आहे.

गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या ब्राझीलने दक्षिण अमेरिकेतर्फे 4 डायरेक्ट एन्ट्रीमधील पहिले स्थान यापूर्वीच निश्चित केले असून पाचवा संघ इंटरकॉन्टिनेन्टल प्ले-ऑफमध्ये खेळणार आहे. ब्राझीलच्या खात्यावर 35 गुण असून ते अर्जेन्टिनाच्या तुलनेत 6 गुणांनी आघाडीवर आहेत. ब्राझील व अर्जेन्टिना या दोन्ही संघांनी प्रत्येकी 13 सामने खेळले आहेत. इक्युडोरच्या खात्यावर 23 गुण असून ते तिसऱया स्थानी विराजमान आहेत. शेवटच्या स्थानावरील व्हेनेझुएलाचा अपवाद वगळता अन्य सर्व संघांमध्ये कतार वर्ल्डकपमधील आपले स्थान निश्चित करण्यासाठी रस्सीखेच असेल.

कोलंबिया व पेरुच्या खात्यावर प्रत्येकी 17 गुण आहेत तर चिलीचा संघ 16 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. चिली गोल डिफरन्सच्या निकषावर उरुग्वेपेक्षा किंचीत पुढे आहे. बोलिव्हियाचा संघ आश्चर्यकारकरित्या 15 गुणांसह 8 व्या स्थानी असून 13 गुणांवर असलेल्या पराग्वेला देखील अद्याप संधी बाकी आहे.

अर्जेन्टिना-ब्राझील बरोबरी

मेस्सी सध्या फारसा बहरात नसल्याने आणि नेमार दुखापतीमुळे बाहेर असल्याने अर्जेन्टिना व ब्राझील यांच्यातील द्वंद किती रंगणार, याची उत्सुकता होती. मात्र, प्रत्यक्ष लढतीत गोलशून्य बरोबरी कायम राहिली. दोन्ही संघांचे गोलरक्षक इमिलियानो मार्टिनेझ व ऍलिसन सामन्यातील बहुतांशी वेळ आक्रमणे होत नसल्याने निर्धास्त होते.

गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेला मेस्सी या लढतीत पूर्ण वेळ खेळला. मागील आठवडय़ात अर्जेन्टिनाने उरुग्वेला 1-0 असे नमवले, त्यावेळी तो केवळ 15 मिनिटे मैदानावर थांबला. ब्राझीलविरुद्ध लढतीत मेस्सीला बॉक्सजवळ आक्रमणाची एकदाच संधी मिळाली आणि त्याचा फटका गोलरक्षक ऍलिसनने सहज परतावून लावला होता. या लढतीत 35 व्या मिनिटाला रॅफिन्हाला निकोलसचे ढोपर लागल्यानंतर रक्तस्राव सुरु झाला आणि नंतर त्याला 5 टाके घालून घ्यावे लागले. ही घटना रेफ्रींच्या नजरेतून सुटल्याने ब्राझिलियन प्रशिक्षक टिटे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

बोलिव्हियाचा उरुग्वेवर 3-0 फरकाने एकतर्फी विजय

बुधवारी झालेल्या अन्य एका लढतीत बोलिव्हियाने उरुग्वेचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. 10 संघांच्या या राऊंडरॉबिन फेरीत उरुग्वेचा संघ सातव्या स्थानी राहील, हे देखील जवळपास निश्चित झाले. उरुग्वेचे अद्याप 4 सामने बाकी आहेत.

बोलिव्हियाने अर्ध्या तासाच्या अंतराने आपले खाते उघडले. यावेळी प्रतिस्पर्धी गोलरक्षक फर्नांडो मुस्लेरा हा जुआनचा क्रॉस फटका थोपवू शकला नाही. जुआनने 30 व्या मिनिटाला पहिला तर 79 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. मार्सेलाने 45 व्या मिनिटाला गोलजाळय़ाचा यशस्वी वेध घेत बोलिव्हियाची आघाडी भक्कम केली. आणखी एका लढतीत पेरुने व्हेनेझुएलावर 2-1 असा विजय मिळवत उरुग्वेला पिछाडीवर टाकले. त्यापूर्वी कोलंबिया-पराग्वे लढत गोलशून्य बरोबरीत राहिली.

Related Stories

राष्ट्रीय बॅडमिंटन सराव शिबीर रद्द

Patil_p

लंकन संघाला एक लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर

Patil_p

इरफान पठाणलाही बाधा

Patil_p

शाहू स्टेडियमवर ‘जय शिवाजी’..!

Archana Banage

वनडे मालिकाविजयासाठी भारत महत्त्वाकांक्षी

Patil_p

भारत-इराण महिला लढत आज

Patil_p