Tarun Bharat

कदंबला महिन्याकाठी आठ कोटींचा फटका

प्रतिनिधी / पणजी :

कोरोनाचा जबरदस्त फटका कदंब परिवहन महामंडळाला बसला आहे. महामंडळाच्या 550 पैकी केवळ 150 ते 180 बसेस सध्या कार्यरत आहेत. महामंडळाचे प्रवासी भाडय़ातून मिळणारे उत्पन्न हे महिन्याकाठी दीड कोटी रुपयांवर आलेले आहे. महिन्याला आठ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. महामंडळाने नियमित प्रवास करणाऱया प्रवाशांसाठी काल बुधवार 1 जुलैपासून पास योजना लागू केली आहे. प्रवाशांना 30 टक्के सूट दिली आहे.

कदंब परिवहन महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांच्याशी संपर्क साधला असता, कोरोनाचा जबरदस्त फटका महामंडळाला बसल्याचे ते म्हणाले. आम्ही पाहिजे तेवढय़ा बसेस सुरू करण्यास राजी आहोत. मात्र प्रवासी आपल्या खासगी वाहनानेच कामावर जाणे पसंत करतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळच्या दरम्यानच प्रवासी असतात. दुपारच्या दरम्यान कदंबच्या बसेस रिकाम्याच जातात. त्यातच सरकारने ठराविकच प्रवासी घेण्याची अट घातल्याने जादा प्रवासी घेता येत नाही. त्यातून येणारा महसूल हा घटत चाललेला आहे.

प्रवासी मिळणे बनले कठीण

कदंबच्या बसेस दिवासाकाठी 1 लाख 2 हजार कि. मी. पर्यंत धावत होत्या. सध्या केवळ 30 हजार कि. मी. धावतात. तसेच प्रति कि. मी. उत्पन्न हे रु. 35 होते ते आता बरेच खाली घसरलेले आहे. दु. 1 ते 4 पर्यंत बसेस मध्ये प्रवासीच नसतात. तसेच सायंकाळी 7 नंतर प्रवासी मिळणे मुष्कील झालेले आहे.

बसस्थानके ओस, दुकाने बंद

संजय घाटे म्हणाले की, पणजी बसस्थानकावर गोव्यातली सर्वात मोठी वर्दळ असते. दिवसाकाठी सरासरी 80 हजार प्रवासी ये-जा करीत होते. आज पणजी बसस्थानक ओस पडलेले आहे. प्रवासी नसल्यामुळे बसस्थानकावरील दुकाने देखील बंद होती. आता ती सुरू झाली आहेत. मात्र त्यामुळे कदंबच्या गंगाजळीत जी मासिक मिळकत येऊन पडायची ती बंद झाली. कदंबच्या नुकसानीत आणखी वाढ झाली. सध्या कदंबला रु. 8 कोटींचा निव्वळ तोटा सहन करावा लागत आहे.

डिझेल दरवढीचाही बसला फटका

डिझेलच्या दरात 3 महिन्यात रु. 25 प्रति लिटर वाढ झालेली आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी डिझेलचा दर रु. 60 पेक्षाही कमी होता. कदंबला प्रतिलिटर रु. 50 या दराने डिझेल मिळत होते. आज प्रति लिटर रु. 25 ने वाढ झाली. रु. 75 या दराने डिझेल खरेदी करावे लागते. दिवसाकाठी सध्या मिळणारे उत्पन्न हे तुटपुंजे आहे.

सुमारे 400 बसेस जागच्या जागी

कदंबच्या ताफ्यात 550 बसेस आहेत. 2086 कर्मचारी आहेत. 550 पैकी 150 ते 180 बसेसचा वापर होतोय. इतर बसेस केवळ जागच्या जागी चालू करून बंद ठेवायच्या हाच पर्याय असतो. जर त्या चालू केल्या नाहीत व वापरल्या नाहीत तर खराब होण्याची भीती जास्त आहे.

गेल्या तीन महिन्यात 24 कोटींचे नुकसान

सध्या महिन्याकाठी मिळणारे उत्पन्न हे 1.50 कोटी एवढेच आहे. रु. 8 कोटीचे नुकसान होतेय. गेल्या तीन महिन्यात कदंबला सुमारे 20 ते 24 कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. जनता आपल्या खासगी वाहनातून प्रवास करीत असल्यानेच हा फटका कदंबला बसलेला असल्याचे संजय घाटे म्हणाले.

Related Stories

दोन्ही टोळीतील गुंडांची धरपकड सुरू

Omkar B

तर बांधकाम व्यवसाय कोलमडून पडणार..!

Omkar B

बाणावलीतील मच्छीमारांकडून 5 कासवांना जीवदान

Omkar B

आजपासून श्री दामोदर भजनी सप्ताह

Amit Kulkarni

वाढता कोरोना, वाढती चिंता!

Amit Kulkarni

वास्कोत उद्या भाजपा प्रदेश कार्यकारीणीची बैठक

Amit Kulkarni