Tarun Bharat

कमी होणारे रुग्ण अन् रिकव्हरी रेटमध्ये वृद्धी

Advertisements

नव्या रुग्णांच्या प्रतिदिन संख्येत होतेय घट : मृत्यूदरातही लक्षणीय घसरण : चाचण्यांचा वेग वाढल्याचा परिणाम

भारतात कोरोनाबाधितांच्या संख्यावृद्धीचा वेग आता कमी होऊ लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात सध्या 7.88 टक्के सक्रीय रुग्ण आहेत. तर बरे झालेल्यांचे प्रमाण 90.62 टक्के आहे. तर 1.50 टक्के रुग्ण दगावले आहेत. देशात जून आणि सप्टेंबरदरम्यान कोरोनाबाधितांमध्ये प्रचंड वृद्धी होत होती. सप्टेंबरच्या तिसऱया आठवडय़ापासून नव्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. युरोपीय देश आणि अमेरिकेच्या उलट भारतात हे संक्रमण अत्युच्च प्रमाणावर विलंबाने पोहोचले होते.

भारतात सध्या 6,55,935 सक्रीय रुग्ण आहेत तर 71,34,769 म्हणजेच 90 टक्के बाधित बरे झाले आहेत.  आरोग्य मंत्रालयानुसार भारतातील कोरोनाचा मृत्यूदर 1.5 टक्के आहे, जो मार्चपासून आतापर्यंतचा सर्वात कमी आहे. तर देशाच्या 14 राज्यांमध्ये ज्यात बिहार, आसाम, केरळ, आंध्रप्रदेश आणि राजस्थानमध्ये मृत्यूदर 1 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

रुग्णसंख्येत उतार-चढाव

अनेक युरोपीय देशांच्या विपरित भारतात नवे बाधित मे आणि सप्टेंबरदरम्यान सुमारे 4 महिन्यांच्या कालावधीत हळूहळू वाढले आहेत. तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये यात वेग दिसून आला होता. 17 ऑगस्ट रोजी भारतात 55,079 रुग्णांची नोंद झाली होती. पुढील 7 दिवसांमधील सरासरी नवे रुग्ण 62,010 इतके होते. एक महिन्यानंतर 16 सप्टेंबर रोजी देशात 97,894 नवे बाधित सापडले होते. हा भारतातील उच्चांकी आकडा ठरला होता. तर 16 सप्टेंबर रोजी 7 दिवसांचा सरासरी आकडा 93,199 होता. 16 सप्टेंबरनंतर नव्या बाधितांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. हा आकडा आता 50 हजारच्या खाली आला आहे.

संख्या कमी होण्याची संभाव्य कारणे

पत्रकार परिषदेत बाधितांचे प्रमाण कमी होण्यामागील कारणे विचारल्यावरही सरकारने आतापर्यंत याबाबत कुठलेच अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. तर विश्लेषकांनी देशात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडय़ाने अत्युच्च प्रमाण गाठल्यासंबंधी स्वतःचे आकल मांडले आहे. काही तज्ञांनुसार अतिसंवेदनशील लोकांच्या एका मोठय़ा लोकसंख्येत कोरोनाचा फैलाव आता कमी होण्याच्या दिशेने आहे.

कंटेनमेंट धोरणात बदल

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्या रुग्णांच्या संख्येत घसरण होऊनही प्रतिबंधक धोरणे, चाचण्या, ट्रकिंग, उपचार आणि नियंत्रण सुरूच ठेवण्यास सांगितले आहे. आरोग्य मंत्रालयाने लोकांना सणासुदीच्या काळात गर्दीयुक्त ठिकाणे टाळण्याची सूचना केली आहे.

तज्ञांचे मत

मोठय़ा प्रमाणावर प्रामुख्याने भारतीय शहरांमध्ये अतिसंवेदनशील लोक बाधित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु भारतात अद्याप ग्रामीण भागात अतिसंवेदनशील लोकांची संख्या मोठी संख्या असून ते कोविड-19 च्या जोखिमीत असल्याचे उद्गार अशोक विद्यापीठातील जीवशास्त्राचे प्राध्यापक गौतम मेनन यांनी काढले आहेत. तर ग्रामीण भागात शहरांच्या तुलनेत मधूमेह किंवा हृदयविकाराच्या कॉमरेडिटी युक्त लोकांचे प्रमाण कमी असते. अशाप्रकारचे सहआजार संक्रमणाची जोखीम वाढवत असतात.

पोर्तुगाल : मास्क अनिवार्य

पोर्तुगाल सरकारने निर्बंधांसंबंधी नवा नियम प्रसारित केला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. बुधवारपासून हा नियम लागू झाला आहे. 10 वर्षांवरील सर्व लोकांना इनडोअर तसेच आउटडोअर ठिकाणी मास्क वापरावा लागणार आहे. नियमाचा भंग करणाऱयांवर 590 डॉलर्सचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

इटली : 21 हजार रुग्ण

युरोपीय देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. इटली, स्पेनमध्ये प्रतिदिन 15 हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळत आहेत. इटलीत दिवसभरात 21,994 नवे रुग्ण सापडले आहेत. तेथील बाधितांचे प्रमाण 5.64 लाख झाले आहे. तर 37,770 जणांना जीव गमवावा लागला आहे. इटलीत संसर्गाच्या दुसऱया लाटेमुळे पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.र्ं

चीन : नवे रुग्ण

चीनमध्ये दिवसभरात 42 नवे रुग्ण सापडले आहेत. हे सर्व रुग्ण शिनजियांग प्रांतात आढळले ओत. 22 रुग्ण स्थानिक संसर्गाशी संबंधित असल्याने अधिकाऱयांची चिंता वाढत आहे. देशात स्थानिक संसर्ग नसल्याचा दावा चीन वारंवार करत असतो. चीनमध्ये आतापर्यंत 85,686 रुग्ण सापडले असून 4634 जणांना जीव गमवावा लागला आहे.

जर्मनी : संकटाची चिन्हे

चालू आठवडय़ाच्या अखेरपर्यंत देशात प्रतिदिन 20 हजार नवे रुग्ण मिळू शकता असे विधान जर्मनीचे अर्थमंत्री पीटर अल्टमायर यांनी केले आहे. नाताळापर्यंत प्रतिदिन 19,200 बाधित सापडू शकतात, असे जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी सप्टेंबरच्या अखेरीस म्हटले होते. जर्मनीत दिवसभरात 11,049 नवे रुग्ण सापडले आहेत.

देशात आतापर्यंत 4.51 लाख रुग्ण आढळले आहेत.

अमेरिकेत स्थिती बिघडतीच

अमेरिकेत निवडणूक नजीक आली असतानाही कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. 1 आठवडय़ात 5 लाखांहून अधिक नवे बाधित सापडले आहेत. याचदरम्यान 5,600 रुग्ण दगावले आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फैलाव आता इलिनॉइस प्रांतात दिसून येत आहे. पेन्सिलवेनिया आणि विस्कॉन्सिन प्रांतातही स्थिती वेगाने बिघडू लागली आहे.

निवडणुकीसाठी मतदानादरम्यान कोरोना अडचण ठरू नये याकरता आवश्यक व्यवस्था केली जात असल्याचे विस्कॉन्सिनचे आरोग्य प्रमुख आंद्रे पॉम यांनी म्हटले आहे

फ्रान्समध्ये टाळेबंदीची तयारी

फ्रान्समध्ये संसर्गाची दुसरी लाट पाहता सरकार सतर्क झाले आहे. गुरुवार रात्रीपासून देशात टाळेबंदी लागू केली जाणार असल्याचे समजते. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन देशाला संबोधित करणार आहेत. याच संबोधनात टाळेबंदीची माहिती दिली जाणार असल्याचे मानले जात आहे. याचबरोबर आणखीन काही निर्बंधांचीही घोषणा केली जाऊ शकते. पर्यटकांसंबंधी धोरण सरकार पहिल्यांदाच मांडू शकते.

ब्रिटन : 61 हजार बळी

ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सच्या नव्या डाटानुसार ब्रिटनमध्ये कोरोनामुळे दगावणाऱयांची संख्या 61 हजार झाली आहे. मंगळवारी प्रकाशित आकडेवारीनुसार इंग्लंड आणि वेल्समध्ये ऑक्टोबरपर्यंत 54,609 जणांचा मृत्यू झाला, ज्यांची नोंद 24 ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे. नॅशनल रिकॉर्ड्स फॉर स्कॉटलंडच्या मागील आठवडय़ात नोंद आकडेवारीनुसार 18 ऑक्टोबरपर्यंत तेथे 4,376 जणांचा मृत्यू झाला आहे. नॉदर्न आयर्लंड स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च एजेन्सीच्या आकडेवारीनुसार 16 ऑक्टोबरपर्यंत उत्तर आयर्लंडमध्ये 942 बळी गेले आहेत. इंग्लंडमध्ये 17-25 ऑक्टोबरदरम्यान 1,044 मृत्यू झाले.

Related Stories

मालवाहू जहाजाला आग, श्रीलंकेत आम्लयुक्त पावसाचा इशारा

Patil_p

तालिबान अन् अफगाण सरकारमधील संघर्ष पेटला

Amit Kulkarni

ऑस्ट्रेलियात कोरोना रुग्णांमध्ये झपाटय़ाने वाढ

Patil_p

ट्रम्प डेथ क्लॉक

Patil_p

अँटिबायोटिक्सचा प्रभाव वाढविणारा शोध

Patil_p

असीम मुनीर पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख

Amit Kulkarni
error: Content is protected !!