Tarun Bharat

करमळीतील 75 घरांना पुराचा मोठा धोका

पाच मानस ते गुडीपर्यंतच्या बांधाला भगदाडे

पावसाळय़ात भरतीच्यावेळी येऊ शकते संकट

शेती नामशेष होऊन आता घरांनाही भीती

प्रतिनिधी

तिसवाडी

करमळी येथील पाच मानस ते गुडी पेठेरपर्यंतच्या खाजन शेतीच्या बांधाला अनेक ठिकाणी मोठमोठी भगदाडे पडली आहेत. तसेच बांधाचे दगड, माती वाहून गेल्याने त्याची उंची कमी झाल्यामुळे भरतीच्यावेळी जुवारी नदीचे पाणी आतील भागात शिरत असल्याने घरांनाही धोका निर्माण झालेला आहे. त्यातच सलग पाऊस पडल्यास या ठिकाणी पूर येऊन सावट, परकेभाट येथील 75 हून अधिक घरांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती या परिसरातील लोकांनी व्यक्त केली आहे.

करमळी येथील नांगणजो, धाडो, धोंगजो ही गोव्यातील सर्वांत मोठी खाजन शेतजमीन आहे. हजारो शेतकरी कष्ट करुन भाताचे पिक घेत होते. मात्र या खाजनातील सर्व बांधांना भगदाडे पडल्याने तसेच काही ठिकाणी पूर्ण बांध वाहून गेल्याने तेथे शेती करणे शक्य होत नाही. साऱया परिसराला समुद्राचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. गेल्या सुमारे 25 वर्षांत या भागातील शेतकऱयांना शेती करायला मिळालेली नाही. अनेक सरकारे आली व गेली. कृषी क्रांतिच्या घोषणाही अनेक गाजल्या आणि हवेतच विरल्या. सरकारच्या इच्छाशक्तीच्या अभावी गेली पंचवीस वर्षे शेतकऱयांना शेती करायला मिळत नाही, ही या भागातील शेतकऱयांची शोकांतिका बनली आहे.

मोडलेल्या बांधामुळे भरते जुवारीचे पाणी

शेती नष्ट झालेली असतानाच आता त्या परिसरातील घरांनाही पाण्याचा त्रास होऊ लागला आहे. भरतीच्यावेळी जुवारी नदीचे पाणी पाच मानस ते गुडीपर्यंतच्या बांधावरुन आतील भागात पोहोचते. या बांदाला अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत. बांधाचे दगड व चिखल वाहून गेला आहे. दगडी कडा कोसळून पडल्याने लाटा बांधावर जोराने थडकत असल्याने बांध कमकुवत झाला आहे. परिणामी मोठय़ा प्रमाणात पाणी सावट शेती तसेच परकेभाट रहिवासी वस्तीपर्यंत पोहोचत असल्याने आता पावसाळय़ात मोठ धोका निर्माण झाला आहे, असे गावकऱयांनी सांगितले.

सावट शेतीही रसातळाला पोहोचल्यात जमा

करमळीतील समृद्ध अशी खाजनशेती नष्ट झाल्यानंतर केवळ सावट या भागातीलच शेती बचावली होती. काही शेतकरी मोठय़ा कष्टाने तेथे शेती करत होते. मात्र पाच मानस ते गुडीपर्यंतचा बांध मोडल्याने खारे पाणी सावट शेतजमिनीत घुसू लागल्याने गेल्या काही वर्षांपासून ही शेतीही करणे शेतकऱयांना दुरापास्त झाले आहे. शेतजमिनीच्या कडेच्या बाजूला असलेल्या केळी बागायती, माडही मरुन पडले आहेत. मोडलेल्या बांधावरुन येणाऱया पाण्यामुळे सावट ही शेतीही गेल्या सात-आठ वर्षांपासून रसातळाला गेल्यात जमा बनली आहे.

परकेभाटातील 75 घरांना पुराचा धोका शक्य

सध्या पावसाळा सुरु झाल्याने गावकऱयांची भीती आणखी वाढली असल्याचे दिसून येते. एरव्हीच या भागाला समुद्राचे स्वरुप येते. भरतीच्या वेळेला जुवारीचे पाणी येथील लोकांच्या घरांच्या मागील भागापर्यंत पोहोचत असते. त्यामुळे त्रस्त झालेल्या गावकऱयांना आता पावसाचा नुसता विचार करुनही उरात धडकी भरते. या बांधाच्या आतील भागात करमळीतील परकेभाट हा वाडा असून येथे 75 हून अधिक घरे आहेत. सखल भागात आणि या शेतजमिनीच्या जवळ असलेल्या या वाडय़ाला धोका संभवतो. भरपूर पाऊस पडला आणि अमची घरेदारे वाहून गेल्यास आम्ही उघडय़ावर येणार, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

अधिक माहिती देताना ग्रामस्थांनी सांगितले की परकेभाट येथील पुराचा धोका कमी दूर करायचा असल्यास पाच मानस ते गुडीपर्यंतच्या बांध नव्याने बांधण्याची गरज आहे. वाळापोय येथून मोठय़ा प्रमाण पाणी आत शिरत असून ते ताबडतोब बंद केल्यास पुराचा धोका टळू शकतो. दुसऱया बाजूने डोंगरी धोंगजो बांधाला पडलेली भगदाडेही बुजविण्याची गरज आहे. पेठेर झरीच्या भाटाकडून पूर्वीच्या सावरीपर्यंतच्या जुन्या बांधाला एक मीटरची उंची देणे आवश्यक आहे. स्थानिक आमदार पांडुरंग मडकईकर, तिसवाडी मामलेदार, जलस्रोत खाते तसेच अन्य संबंधित खात्याच्या अधिकाऱयाने याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

प्राप्त माहितीनुसार या बांधाची संपूर्ण दुरुस्ती करण्याचा ठराव करमळी ग्रामपंचायतीने संमत केला होता. त्याचबरोबर बांधाची उभारणी करण्याच्या हालचालीही सुरु झाल्या होत्या, मात्र नंतर त्या थंडावल्या. आता पावसाळय़ात पुराच्या धोक्यापासून या लोकवस्तीचे सरंक्षण करण्यासाठी सरकारने त्वरित याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

सरकारकडून शेतकऱयांची फसवणूक

Amit Kulkarni

कोरोना बळीची संख्या वाढल्याने सर्वत्र चिंता

Omkar B

शशिकला गोवेकर यांचा ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्याहस्ते सत्कार

Amit Kulkarni

गोव्यातील प्रत्येक घराला 31 मार्च पर्यंत शौचालय, वीज व पाणी पुरवठा

Patil_p

राज्यात 62 नवे मोबाईल टॉवर उभारणार

Patil_p

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ’नवे पर्व’ मॅगझिनचे प्रकाशन

Omkar B