पश्चीम भागातील २५ गावांचा संपर्क तुटला, आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथके बोटी सह दाखल
प्रतिनिधी/करवीर
दिवस रात्र कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे करवीर तालुक्यातील दहा बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. जिल्हा मार्ग राज्यमार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील वाहतुकीसाठी महत्वाचा दुवा असणारे बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे तब्बल 25 गावांचा संपर्क तुटलेला आहे.
सोसाट्याचा वारा आणि मुसळधार स्वरूपात पडणाऱ्या पावसामुळे तालुक्याच्या सर्वच गावात पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तालुक्यातील पंचगंगा दुधगंगा भोगावती कुंभी नद्यांना महापूर आल्यामुळे नदीपात्र परिसरातील गावांमध्ये पाणी शिरले आहे. पावसाचे प्रमाण सकाळपासून वाढत गेल्यामुळे नदी-नाल्यांना पुराचे स्वरूप आले आहे .
पश्चिम भागातील महे बीड कोगे कुडित्रे वडकशिवाले बाचणी या बंधारा मार्गावरील वाहतूक सकाळपासूनच बंद झालेली आहे. बंधारा परिसरात महापुराची परिस्थिती हळूहळू वाढत गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी धोक्याच्या दिशेने वाटचाल करू लागल्याने चिखली आंबेवाडी येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने व्यवस्थापन विभागाचे २२ जवानांचे पथक दाखल झालेले आहे. करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर तहसीलदार शितल मुळे भामरे यांनी चिखली आंबेवाडी परिसरात भेट घेऊन महापुराच्या परिस्थितीची पाहणी करून संबंधित विभागाला सूचना केल्या आहेत.
तालुक्याच्या पूर्व भागातील वडकशिवाले – बाचणी बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील कागल तालुका कडे जाणारी वाहतुक पूर्णपणे बंद झाली आहे .
ऊसपिके झाली आडवी …
करवीर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस पीक घेतले जाते. आडसाली हंगामामध्ये केलेल्या ऊस लागणीची उंची वाढलेली आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्या चा फटका या ऊस पिकांना बसल्यामुळे जोमदार वाढलेली ऊस पिके कोसळलेली आहेत .
136 मि.मि. पाऊस
करवीर तालुक्यातगुरुवारी तब्बल 136 मिलिमीटर पाऊस कोसळलेला आहे. गेल्यावर्षी याच दिवसापर्यंत 604 मिलिमीटर पाऊस तालुक्यात झाला होता. मात्र यंदाच्या खरीप हंगामात22 जुलै पर्यंत 840 मिलिमीटर इतका पाऊस पडलेला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत 236 मिलिमीटर इतका पाऊस ज्यादा झालेला आहे.
सकाळपासून मुसळधार स्वरूपात कोसळलेल्या पावसामुळे नदी पात्रातून बाहेर पडलेल्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत गेलेली आहे त्यामुळे तालुक्यातील नदीपात्र नजीकच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे काही गावातील शेतकऱ्यांनी पुरेशी जवळील गोठ्यातील जनावरे सुरक्षित स्थळी हलवली आहेत .


previous post