Tarun Bharat

कराडात जेव्हा रस्त्यावर कचरा पडतो…

प्रतिनिधी/ कराड

स्वच्छतेच्या बाबतीत लहान शहरांमध्ये देशात सलग दोन वर्षे प्रथम आलेल्या कराड शहरामध्ये स्वच्छतेबाबत मोठी जागरूकता आहे. आज घडलेल्या एका छोटय़ा घटनेतून शहरवासियांच्या स्वच्छतेविषयीच्या जागरूकतेची तसेच कर्तव्यतत्पर आरोग्य सभापती व कर्मचाऱयांची प्रचिती आली.

शहरात रस्ते सफाईला नगरपालिकेने प्राधान्य दिले आहे. कचरा संकलन घराघरातून थेट होते. सकाळी व रात्री रस्ते सफाई होते. त्यामुळे स्वच्छ रस्त्यांवर कचरा दिसला तरी नागरिक पालिकेला फोन करतात. बुधवारी कार सर्व्हिसिंगची जाहिरात असलेला पत्रकांचा गठ्ठा घेऊन एक तरूण दत्त चौकातून निघाला होता. त्यावेळी दत्त चौकात त्याच्या दुचाकीवरून हा गठ्ठय़ातील पत्रके रस्त्यावर पडली. रहदारीच्या रस्त्यावर पत्रके पडल्याने ती न उचलता तो तरूण निघून गेला. दत्त चौकात वाहनांच्या वर्दळीमुळे ही पत्रके सर्वत्र पसरली. स्वच्छ रस्ता अस्वच्छ दिसू लागला. काही तरूणांनी या कचऱयाचे फोटो व्हायरल केले. काही ग्रुपवर हे फोटो आल्यानंतर अनेकांनी पालिकेत आरोग्य विभाग, मुख्याधिकारी, आरोग्य सभापती, नगरसेवक यांना कळवले. काहींनी या जाहिरातीतील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून कचरा उचलण्यास सांगितले. चौकशी केली असता सदरची पत्रके प्रिंटींग प्रेसमध्ये छापायला दिली होती. तेथून घेऊन जाणाऱया तरूणाकडून यातील काही कागद रस्त्यावर पडले होते. जाहिरातदारास ही पत्रके पोहोच झालेली नव्हती. त्यानंतर प्रिंटींग प्रेसला फोन करण्यात आला. तोपर्यंत पालिकेत बरेच फोन गेल्याने स्वतः आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, राहुल खराडे, वरिष्ठ मुकादम मारूती चव्हाण, सुरेश शिंदे, गब्बर गुपचे राहुल चव्हाण व इतर सदस्य व आरोग्य कर्मचारी दत्त चौकात आले. संबंधित प्रिंटींग पेसचे कर्मचारीही आले. सर्वांनी रस्त्यावर पडलेली पत्रके उचलण्यास सुरूवात केली. पंधरा मिनिटांत दत्त चौकातील तीन बाजूच्या रस्त्यांवर पडलेली पत्रके उचलून रस्ता स्वच्छ करण्यात आला. अनेक नागरिकांनी कचरा टाकणाऱयावर कारवाईची मागणी केली होती. पालिकेने संबंधित पिंटींग प्रेस चालकास 500 रूपये दंड केला.

शहरात स्वच्छतेबाबत मोठी जागरूकता आहे. याचा प्रत्यय बुधवारी आला. या स्वच्छतेला गालबोट लावण्याचे काम करणारांवर पालिकेने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

जाहिरात पत्रके रस्त्यावर पडल्यास दंड करणार

शहरातील अनेक व्यावसायिक आपल्या व्यवसायाची जाहिरात पत्रके छापून करत असतात. ही पत्रके रस्त्यावर उभे राहून वाटली जातात. यापुढे अशी पत्रके रस्त्यावर पडलेली आढळल्यास संबंधित वितरक व जाहिरात करणाऱयावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी दिला आहे.

Related Stories

अजयकुमार बन्सल सातारचे नवे एसपी

Omkar B

शहरात पाणी गळती काढण्याच्या कामाला वेग

Patil_p

पोटनिवडणूक २०२१: देशात २ लोकसभा आणि १४ विधानसभा जागांसाठी मतमोजणी

Archana Banage

शासनाचे धान्य प्रत्येक कुटुंबाला मिळाले पाहिजे

Patil_p

गडकिल्ले तटबंदीचे होणार अचूक मोजमाप

Archana Banage

सत्ता येत नाही म्हणून दंगलींचा घाट!

datta jadhav