Tarun Bharat

कराडात रेमडीसिव्हीरसाठी धावाधाव

तुटवडा जाणवत असल्याने रूग्णांचा जीव टांगणीला

प्रतिनिधी/ कराड

कोरोना रूग्णांच्या आकडय़ात फारसा दिलासादायक बदल होत नसतानाच आता रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. रूग्णांच्या कोरोना संसर्गाचा टक्का वेळेत इंजेक्शन मिळत नसल्याने वाढत असून बाहेर नातेवाईकांसह मित्रपरिवाराची इंजेक्शन मिळवण्यासाठी सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, सांगलीपर्यंत अक्षरशः धावाधाव सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने यामधे केवळ कागदोपत्री लक्ष न घालता प्रत्यक्षात लक्ष घालण्याची मागणी वाढत आहे. 

कराड तालुक्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत अजुनही म्हणावी तेवढी घट झालेली नाही. अनेक रूग्ण बेड न मिळाल्याने घरीच उपचार घेत आहेत. मात्र संसर्गाची टक्केवारी वाढल्यावर त्यांना बेडची गरज भासते. अशावेळी रूग्णांच्या नातेवाईकांचा बेड मिळवताना जीव टांगणीला लागतो. एकीकडे बेडसाठी हातापाया पडायची वेळ रूग्णांसह नातेवाईकांवर आली असतानाच दुसरीकडे रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. सोमवार, मंगळवारपासून कराड परिसरात इंजेक्शन मिळत नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड धावपळ सुरू आहे. इंजेक्शन मिळवण्यासाठी मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगलीला हेलपाटे घालावे लागत आहेत. रात्री अपरात्रीही नातेवाईकांची धावाधाव सुरू आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांसह त्यांच्या नातेवाईक, मित्रपरिवाराकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. प्रशासनाने यावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी वाढली आहे. मंगळवारी कराड तालुक्यात रेमडीसिव्हीर न मिळाल्याने अनेक रूग्णांचा जीव टांगणीला लागला होता. रूग्णांच्या नातेवाईकांची अस्वस्थता वाढली होती. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. रेमडीसिव्हीर इंजेक्शन वेगवेगळ्या कंपन्यांचे उत्पादन आहे. त्यांचे दरही वेगवेगळे आहेत.  सिप्ला 4,700, हेट्रो 5 हजार 400, कॅडिला 2 हजार 700, जुबिलेंट 4 हजार 700, मिलान 4 हजार 700 असे दर असून यामधेही काळाबाजार सुरू असल्याचा आरोप होत आहे.

अन्यथा तीव्र आंदोलन करणार

कोरोना रूग्णांना ऑक्सीजन मशिन व  रेमडिसिव्हीर इंजेक्शन मिळवून देण्यासाठी धडपड करणारे मलकापूर भाजपाचे शहरअध्यक्ष सुरज शेवाळे म्हणाले, इंजेक्शन मिळत नसल्याने रूग्णांची अवस्था बिकट होत आहे. प्रशासनाने या व्यवस्थेत लक्ष घालून सुरळीतपणा आणण्याची गरज आहे. इंजेक्शन न मिळाल्याने एखाद्या रूग्णांला जीव गमवावा लागला तर तीव्र आंदोलन करणार आहोत.

Related Stories

दिलासा : महाराष्ट्रात मागील 24 तासात 13,758 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज!

Tousif Mujawar

पारगाव येथे विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू

Archana Banage

आज ‘नीट’ची परीक्षा

datta jadhav

निवडणुकीमुळे लोणंदच्या ढाब्यांवर तळीरामांचा अड्डा

Patil_p

शहरातील मटका, जुगार चालविणारे चारजण तडीपार

Patil_p

बारा डबरेतील स्वच्छता उद्यान हिरवाईने बहरले

Patil_p