Tarun Bharat

करारी अंकिता

अनेकांना आयुष्यात खूप मोठं व्हायचं असतं. स्वप्नंही पूर्ण करायची असतात. या स्वप्नांना पंखही लागतात. पण हे यश सहजासहजी मिळालेलं नसतं. त्यामागे असतो प्रचंड मोठा संघर्ष आणि तडजोडी. अशा पद्धतीने तडजोडी करून यश मिळवणार्या लोकांना इतरांचा त्रास, धडपड कळत असते. म्हणूनच ही माणसं वंचित, गरीबांच्या हक्कांसाठी धावून येतात. अंकिता शर्मा ही सुद्धा अशांपैकीच एक…

रायपूरमधल्या आझाद चौक परिसरातल्या पोलीस स्थानकात आयपीएस अंकिता शर्मा कार्यरत आहे. अंकिताचा जन्म छत्तीसगढ- मधल्या दुर्ग जिल्ह्यातल्या छोटय़ाशा गावात झाला. गाव छोटं असलं तरी अंकिताची स्वप्नं मात्र खूप मोठी होती. तिने गावातच सरकारी शाळेत शिक्षण घेतलं. त्यानंतर उच्च शिक्षण घेऊन ती प्रशासकीय परीक्षेला बसली आणि तिसर्या प्रयत्नात यशस्वी झाली. 203 वी रँक मिळवत तिने अभिमानास्पद कामगिरी केली. अंकिताला स्वतःच्या परिश्रमांची, अडथळ्यांची, अडचणींची जाण आहे. म्हणूनच गरीब, वंचित मुलांना आयएएस अधिकारी बनवण्यासाठी ती प्रयत्न करत आहे. अंकिता आठवडय़ातले सहा दिवस कामात व्यस्त असते. रविवारी मात्र ती आवर्जून वेळ काढते. हा दिवस तिचा असतो. तो तिला वंचित मुलांसोबत घालवायचा असतो. यावेळी ती मुलांना प्रशासकीय परीक्षेचे धडे देत असते.

शाळेत जावं, खूप शिकावं, प्रशासकीय अधिकारी बनावं अशी अनेकांची इच्छा असते. पण परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेणं शक्य नसतं. सामान्य ज्ञानाशी त्यांचा संबंध येत नाही. अंकिता अशाच मुलांची शिक्षिका झाली आहे. रविवारी ती अशा वंचित मुलांना प्रशासकीय परीक्षेसाठी तयार करते. आयुष्यात काही तरी करण्याची इच्छा असूनही या मुलांना गरीबीमुळे फी भरून क्लासला जाता येत नाही. नोट्स मिळत नाहीत. मग ही मुलं मागे पडतात. म्हणूनच अंकिताने या मुलांना शिकवण्याचा वसा घेतला आहे. अंकिता आपल्या कार्यालयात शाळा थाटते. रविवारी इथे मुलांचा किलबिलाट आणि गजबजाट असतो.

आयपीएस अधिकारी बनण्याचा अंकिताचा प्रवास सोपा नव्हता. दुर्गसारख्या छोटय़ाशा गावात राहणार्या अंकिताला मार्गदर्शन करणारं कोणी मिळालं नाही. पण इतर मुलांच्या आयुष्यात अशी परिस्थिती येऊ नये म्हणून ती झटत आहे. अंकिताने अजिबात हार मानली नाही. पहिले दोन प्रयत्न अपयशी ठरले तरी ती अभ्यास करत राहिली आणि अखेर तिसर्या प्रयत्नात प्रशासकीय परीक्षा उत्तीर्ण झाली. अंकिताने इन्स्टाग्राम पेज तयार केलं असून या पेजच्या माध्यमातून ती गरीब मुलांशी जोडली जाते. तिच्या या पेजवर लोक अशा मुलांची माहिती देतात. मग काय, अंकिता या मुलांच्या आयुष्याला आकार द्यायला सरसावते. अंकिताला सामाजिक जाण आहे. तसंच रायपूरमधल्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठीही ती प्रयत्नशील आहे.

Related Stories

तापसि आशि राहते फिट

Amit Kulkarni

अनोखी मूर्तीकार

Omkar B

बायओपोलार डिसॉर्डरविषयी

Amit Kulkarni

अशी फिट राहते ईशा

Amit Kulkarni

लागवड टामॅटोची

Omkar B

बहुपयोगी बी-बी क्रीम

Omkar B