कोल्हापूर/प्रतिनिधी
महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने कर्नाटकात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे बळ्ळारी इथून कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यांना होणारा ऑक्सिजन पुरवठा बुधवारी रात्री पासून थांबविण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करा अशी मागणी केंद्राकडे केली जाणार असल्याचे म्हंटले आहे
दरम्यान, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यांना होणारा ऑक्सिजन पुरवठा थांबवणार असाल तर गोव्याला होणारा दहा टन ऑक्सिजनचा पुरवठा करता येणार नाही, त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करा, अशी मागणी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे करत असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. यावेळी बोलताना त्यांनी, कोल्हापूरातून दिवसाला दहा टन ऑक्सिजन गोव्याकडे जातो, त्यामुळे हा ऑक्सिजन पुरवठा थांबवून केंद्राने थेट बळ्ळारी इथूनच गोव्याला ऑक्सिजन पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आल्याचं सांगितलं.
त्याचबरोबर ऑक्सिजन पुरवठा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्या बाबत केंद्र सरकार निर्णय घेत असल्याने, कोल्हापूरसह महाराष्ट्रासाठी केंद्राने आवश्यक पुरवठा करावा, अशी देखील मागणी केंद्राकडे केली असल्याची माहिती ना. सतेज पाटील यांनी दिली. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सरकार आज सायंकाळ पर्यंत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.