बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत असली तरी आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची मागणी कमी झालेली नाही. नव्याने संसर्ग होणाऱ्या अनेक रुग्णांना उपचारासाठी आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता भासत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने व्हेंटिलेटरवरसाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची आवश्यकता असते. हा ऑक्सिजन पुरवठा मागणीपेक्षा कमी झाला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केंद्र आणि कर्नाटक हायकोर्टाला पत्र पाठवून राज्याला मिळणार ऑक्सिजनचा वाटा पुरवण्यासंदर्भात मागणी केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार ३० मे रोजी राज्यात आवश्यक ऑक्सिजनपैकी निम्मा म्हणजे ५४५.८५ टन ऑक्सिजन मिळाला. याशिवाय २९ मे रोजी ७९१.८५ टन, २८ मे रोजी ६८६ टन, २७ मे रोजी ७३० टन, २६ मे रोजी ८७५.०७ टन आणि २४ मे रोजी ७२८ टन इतका ऑक्सिजन पुरवठा झाला आहे. दरम्यान, कर्नाटकमधील ऑक्सिजन उत्पादक आठ युनिट्स, जे राज्याच्या वेगवेगळ्या भागात आहेत, ते वैद्यकीय ऑक्सिजनचा प्रमुख स्रोत आहेत, परंतु तेही मागणी पूर्ण करण्यास असमर्थ आहेत.
दरम्यान राज्य ऑक्सिजन उत्पादक घटकांव्यतिरिक्त, कर्नाटकात टाटा अंगुल, जामनगर आणि रुरकेला स्टील प्रकल्पातून ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. या वर्षाच्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या दुसर्या लहरी दरम्यान राज्यात दररोज ४० हजार ते ५० हजार रुग्ण सापडत होते. तेंव्हापासून राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढली होती.
राज्यात २७ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू आहेत. ही प्रकरणे खाली आली आहेत. सोमवारी राज्यात कोरोनाचे १६,६०४ रुग्ण सापडले. तर ४४,४७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच ४११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.