बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस येडियुरपा पक्षातील प्रमुख नेत्यांच्या भेटीसाठी आणि राज्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले आहे. यावेळी मुख्यमंत्री येडियुरपा आणि माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची भेट झाली होती. या भेटी विषयी दिल्लीत पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी विकास कामांसंबंधित जेडी-एसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांची भेट घेतली असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी कुमारस्वामी हे विरोधी पक्षाच्या नेत्यांपैकी एक असून त्यांच्यासोबत विकासकामांबाबत चर्चा झाली. त्या सभेदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. कर्नाटकात बहुमत असल्याने भाजपाला जद-एस च्या कोणत्याही प्रकारच्या समर्थनाची गरज नाही, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा मुलगा आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष बी वाय. विजयेंद्र हे ‘सुपर सीएम’ सारखे वर्तन करीत असल्याचा विरोधकांचा आरोप येडियुरप्पा यांनी फेटाळून लावला.त्यांनी विजयेंद्र पक्षाच्या कामांवर लक्ष केंद्रित करीत आहेत, त्यांचा सरकारी कामात कोणताही हस्तक्षेप नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.