Tarun Bharat

कर्मचारी भरती आयोग फक्त ‘फार्स’

सरकार थेट नोकरभरतीच्या तयारीत,अनेक उमेदवार नियुक्तीच्या प्रतिक्षेत

प्रतिनिधी / पणजी

राज्य सरकारने स्थापन केलेल्या कर्मचारी भरती आयोगास डावलून आता थेट नोकरभरती करण्याचा निर्णय झाल्याचे वृत्त हाती आले असून तो आयोग म्हणजे एक ‘फार्स’ असल्याचे दिसून येत आहे. सध्या सावंत सरकारला निवडणुकीचे आणि नोकरभरतीचे वेध लागले असून त्यासाठी येत्या काही दिवसात, महिन्यात जाहिराती सुरु होणार असल्याचे ते वारंवार सांगत आहेत. त्यामुळे आयोगाला बाजूला ठेवून नोकरभरती करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काही विशिष्ट वर्गातील पदांची भरती करण्यासाठी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करुन कर्मचारी भरती निवड आयोगाची स्थापना केली पण अजून त्या आयोगातर्फे एकाही पदाची भरती झालेली नाही. गेली जवळ जवळ 4 वर्षे नवीन नोकरभरती बंदच आहे. गरजेपुरती काही खात्यांमध्ये किरकोळ भरती करण्यात आली परंतु अनेक वर्षे भरती नसल्याने आणि त्या काळात अनेक कर्मचारी मोठय़ा संख्येने निवृत्त झाल्याने अनेक जागा, पदे रिक्त आहेत. ती भरण्यात न आल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमारे 10 हजार पदे भरण्याचे उद्दिष्ट सरकारने आखले आहे.

ती पदे वृत्तपत्रात जाहिराती देऊन थेट भरण्याचा बेत सरकारने आखला आहे. त्यातील कोणतीही पदे भरती आयोगामार्फत न घेता थेट घ्यावीत असा सरकारचा इरादा आहे. त्यामुळे आयोगाला बाजूला ठेवून भरती करण्याचे ठरविण्यात आले आहे. परिणामी आयोगाचा वापर करायचा नाही तर त्याची स्थापना कशाला केली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आयोगाची स्थापना हे एक प्रकारे ‘नाटक’च असल्याचे व ते तोंडाला पाने पुसण्यासाठीच केल्याचे दिसून येत आहे.

त्या लेखी परीक्षांचे काय? उमेदवार प्रतिक्षेत..

गेली काही वर्षे नोकरभरती बंद असली तरी मध्यंतरीच्या काळात काही सरकारी खात्यांनी नोकरभरतीसाठी जाहिराती दिल्या होत्या आणि त्याद्वारे हजारो अर्ज सरकार दरबारी आले होते. काही उमेदवारांच्या लेखी परीक्षा घेण्यात आल्या तर काही उमेदवारांच्या मुलाखतीही झाल्या. त्यांचे निकालच अजून देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ते उमेदवार त्या निकालांच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांचे निकाल लागणार की नाही? असा प्रश्न त्यांना पडला आहे. सरकार आता नोकरभरती करण्याच्या तयारीत असून त्या लेखी परीक्षांचा विचार होणार की नाही? अशी शंका त्यांना सतावत आहे.

Related Stories

अडीच किलो गांजा प्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी

Patil_p

‘त्या’ बालिकेला दत्तक घेण्यासाठी अनेकजण उत्सुक

Amit Kulkarni

दुध उत्पादकानो सावधान!!! फोंडय़ात फोफावतोय लम्पी वायरस!!

Amit Kulkarni

येत्या 20 रोजी राज्यात उच्चस्तरीय बैठक

Amit Kulkarni

रवी शिरोडकर खुनी हल्ला प्रकरणी आणखी चार जणांना अटक

Amit Kulkarni

गोव्याच्या भविष्याशी चालविलेला खेळ थांबवा

Amit Kulkarni