Tarun Bharat

कला अकादमी वास्तूची वैभवसंपन्नता टिकवावी

चार्लस् कुर्रैया फाऊंडेशनची मागणी, नूतनाकरण कामावर व्यक्त केली नाराजी

प्रतिनिधी/ पणजी

गोव्याच्या कला क्षेत्राला जागतिक ओळख करून देणारी प्रतिभावंत वास्तू असलेल्या कला अकादमी इमारतीच्या दुरुस्तीच्या नावाखाली चाललेल्या कामामुळे पूर्वीची वैभवसंपन्न इमारत भविष्यात पहायला मिळेल की नाही, असा संशय चार्लस् कुर्रेया फाऊंडेशनकडून व्यक्त करण्यात आला आहे.

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेस ताहीर नोरोन्हा, नंदिता मेहरोत्रा आणि आर्मेन्यू रिबेरो यांची उपस्थिती होती. दोन वर्षांपासून चाललेल्या या कामाबद्दल एवढी गुप्तता पाळण्यात येत आहे की, सुरक्षेच्या नावाखाली तेथे कुणालाच प्रवेशही देण्यात येत नाही. त्यावरून सरकारचा हेतू स्पष्ट नसल्याचे दिसून येते. तसेच हा एक मोठा घोटाळा असल्याचा आरोप फाऊंडेशनने केला आहे. मात्र नंतर साबांखाकडून अधिकृत मान्यता मिळवून आम्ही या इमारतीच्या दुरुस्तीकामाची पाहणी केली. खरे तर या दुरुस्ती आणि नूतनीकरण कामासंबंधी या प्रकल्पाचे मूळ वास्तुविशारद कुर्रैया यांचा सल्ला घेणे आवश्यक होते, असे यावेळी सांगण्यात आले.

40 वर्षांआधी कला अकादमीचे बांधकाम करण्यात आले होते, तेव्हापासून  आतापर्यंत अनेकदा या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली. सध्या गेल्या दोन वर्षापूर्वी तिचे दुरुस्ती व नूतनीकरण काम हाती घेण्यात आले आहे. मात्र सदर कामादरम्यान तेथील अनेक कलाकृती, पेंटिंग्ज, चित्रे ज्यांचा दुरुस्तीकामाशी कोणताही संबंध नव्हता, त्यांचीही अत्यंत वाईट अवस्था करून सोडण्यात आली आहे.

कला अकादमीतील वातानुकूलित यंत्रणा एकदमच खराब झाली होती. तिची दुरुस्ती करण्यात येत असेल तर ती चांगली गोष्ट आहे, परंतु जेथे कोणतेही काम, दुरुस्ती करण्याची आवश्यकता नव्हती तेथेही विनाकारण हस्तक्षेप करण्यात आला आहे. दिनानाथ मंगेशकर कला मंदिरातील मारियो मिरांडा यांच्या त्रिमित्री चित्रकृतींचीही वाईट स्थिती करून सोडण्यात आली आहे.

ही वास्तू म्हणजे केवळ एक इमारत नव्हे. तिच्याशी तमाम कलाप्रेमींचे आत्मियतेचे संबंध जुळलेले आहेत. त्यामुळे इमारतीसंदर्भात काय चालले आहे याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे, असे नंदिता यांनी सांगितले.

Related Stories

गोमंतकीयांपेक्षा बिगरगोमंतकीयांकडे सरकारचा कौल जास्त

Patil_p

देवाबाग येथे पार्क केलेल्या बुलेटला आग दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

Amit Kulkarni

अंगणवाडी सेविकांचे आता 23 पासून बेमुदत आंदोलन

Amit Kulkarni

‘म्हादईची आम्हांकडून बलिदानाची अपेक्षा’

Amit Kulkarni

मिनानाथ जल्मी यांना कृषी उद्योजक पुरस्कार

Amit Kulkarni

पर्वरीतील सर्व्हिस रोडची साफसफाई मोहीम

Patil_p