Tarun Bharat

कविता हाच कवी जिवंत असल्याचा पुरावा

Advertisements

कवी वरवरा राव यांच्यावर योग्य ते उपचार चालू केले जावेत म्हणून ज्येष्ठ लेखक जयंत पवार यांच्या आवाहनानंतर मराठी कवींनी लोकवाङ्मय गृहाच्या पेजवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी मागणी लावून धरली आणि त्या निमित्ताने ज्या अभिव्यक्तीच्या कविता सादर झाल्या त्यात कवी पाटील यांची ‘लोक बोलत नाहीत’ ही कविता लक्षवेधी होती.

कवीकडे भूमिका असायला हवी आणि ती कृतीतूनही दिसायला हवी. अर्थात या बदलत्या काळात असा विचार करायला कवींकडेही वेळ नाही, याची कारणे अनेक असली तरी प्रामुख्याने कवीला समष्टी विचार कमी आणि व्यक्तीकेंद्री विचार जास्त महत्त्वाचा वाटला की तो समाजापासूनही दूर जातो आणि मग आपल्या भूमिके पासूनही. मात्र अशाही काळात अनेक कवी आपापल्या पातळीवर काम करत समाजाशी जोडून असतात. आपल्या काव्य लेखनातून आणि प्रत्यक्ष कामातूनही. यातीलच एक प्रसिद्ध नाव म्हणजे कवी प्रा. एकनाथ पाटील. कवी वरवरा राव यांच्यावर योग्य ते उपचार चालू केले जावेत म्हणून ज्येष्ठ लेखक जयंत पवार यांच्या आवाहनानंतर मराठी कवींनी लोकवाङ्मय गृहाच्या पेजवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी मागणी लावून धरली आणि त्या निमित्ताने ज्या अभिव्यक्तीच्या कविता सादर झाल्या त्यात कवी पाटील यांची ‘लोक बोलत नाहीत’ ही कविता लक्षवेधी होती. ते आपल्या कवितेत म्हणतात,

‘कवितेतून बोलू दिलं नाही

तर गाण्यातून, नाटकातून, चित्रातून, छायाचित्रातून

ज्याच्या ज्याच्यातून आहे शक्मय

त्याच्या त्याच्यातून बोलायचा 

आटोकाट प्रयत्न करीन मी

बोलायला, ऐकायला कुणीही नसलं

तर अशा वेळी स्वतःशीच बोलेन मी’

या कवितेतील स्वतःशीच सतत बोलत राहण्याची क्रिया ही समाजाशी जोडलेली आहे. हे जरी आपण लक्षात घेतले तरी एक गोष्ट स्पष्ट होते की कोणत्याही दमनाच्या विरोधातला आपला आवाज सार्वत्रिक व्हायला हवा. तो अधिक सामूहिक झाला की दमन करणाऱयांचाच आवाज बंद होण्याची शक्यता असते. यासाठी कवीची भावना व्यक्तीकडून समाजाकडे जायला हवी. या संदर्भात प्रा. पाटील म्हणतात, ‘इतिहासाचा, तत्त्वज्ञानाचा आणि माणुसकीचा अंत करणारा काळ म्हणून आजचा काळ खूप कठीण आहे. लेखक कलावंतांसाठी तर तो अधिक कठीण आहे. ‘धर्म’ आणि संस्कृती’ हे घटक आज वर्चस्वाचे रणक्षेत्र बनवले जात आहेत. माणसाला निश्चित वाटणारे तत्त्वज्ञान आणि वैचारिक श्रद्धा उखडून टाकल्या जात आहेत. अनैतिक गोष्टी अभिमानाने मिरवल्या जात आहेत. नैतिक जगणाऱया माणसांची कोंडी केली जाते आहे. नैतिक कल्पना उराशी कवटाळून प्र्रामाणिक जगणाऱयांना या काळाने चहुबाजूंनी घेरले आहे. बेदखल केले आहे. त्यांचे ‘माणूस’ असणे व्यवस्थेच्या दृष्टीने गैरसोयीचे असल्याने त्याचे माणूसपण संपुष्टात आणणाऱया यंत्रणा पद्धतशीरपणे राबवल्या जात आहेत. जिथून बदलाची अपेक्षा करावी त्या राजकारणाच्या क्षेत्रात विध्वंसक शक्तींचा शिरकाव झाला आहे. सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणिवेतून समाजाच्या भल्यासाठी आपणाला काही चांगले करता येईल, या प्र्रामाणिक भावनेपोटी कधीकाळी सेवाभावीवृत्तीने राजकारणात आलेली पिढी राजकारणाबाहेर फेकली गेली आहे आणि त्यामुळे सामान्य माणसाचा लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला आहे. राजकारण ही लोकविकासाची दीर्घ काळाची प्रक्रिया आहे, ही कल्पना मागे पडून तो औटघटकेचा खेळ बनत चालला आहे. त्यामुळे राजकर्त्यांना लोकांमध्ये असण्याची, त्यांच्या प्रश्नांना जोडून राहण्याची आवश्यकता वाटेनाशी झाली आहे. परिणामी विचार, भूमिका यापेक्षा अर्थकेंद्री राजकारणाने इथली लोकशाही पोखरायला सुरुवात केली आहे. अशावेळी लेखक-कलावंतांनी व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजेत.

कवी पाटील यांचे म्हणणे बरोबरच आहे. एक प्रकारचे सपाटीकरण आणि बकालीकरण सुरू आहे. या काळाचे सत्य कोणा एका माणसाला कळेनासे झाले आहे आणि वेगवेगळय़ा माणसांनी शोधलेल्या सत्याचा परस्पराशी संबंध जोडणे कठीण बनत चालले आहे. सत्यासाठी किंमत मोजायचे धाडस लोकांमध्ये उरलेले नाही आणि सत्य सांगणाऱया लोकांच्या वाटय़ाला बंदुकीच्या गोळय़ा आलेल्या आहेत.

लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. लोक अस्वस्थ आणि सैरभैर आहेत. या काळाचे वास्तव गुंतागुंतीचे, अनाकलनीय आणि विखंडित आहे. संभ्रम, संशय आणि अस्वस्थता ही या काळाची प्रमुख वैशिष्टय़े आहेत, अशावेळी लेखक-कवींनी जबाबदारीने बोलले पाहिजे. लिहिले पाहिजे. थेट व्यवस्थेत हस्तक्षेपाची भूमिका घेतली पाहिजे. लेखक-कवीचे लेखन हे सुद्धा एक प्र्रकारचे मानवी हितसंबंधांचे व्यापक पातळीवरचे रचनात्मक राजकारण असते. साऱया लेखक-कलावंतांनी मिळून व्यापक विधायक राजकारणाची उभारणी आपल्या लेखनातून केली पाहिजे, असे आता हा काळच आपणाला सांगतो आहे. एकीकडे वैश्विकतेची पोकळ भाषा बोलली जात आहे आणि दुसरीकडे माणसा-माणसात भेद करणाऱया संकुचित अस्मिता कुरवाळल्या जात आहेत. धर्माच्या नावावर हैदोस मांडून लोकांचे लक्ष विचलित केले जात आहे, दहशत निर्माण केली जात आहे. मानवतावाद वगैरे मूल्ये नगण्य ठरवली जात आहेत. धर्मसत्तेत हितसंबंध गुंतलेली आणि त्यामुळे तिची चिकित्सा नको असलेली ‘फॅसिस्ट’ व्यवस्था आज उजळमाथ्याने सक्रिय झाल्याचे दिसते आहे. या व्यवस्थेला प्रश्न विचारणारे लोक नको आहेत. अशावेळी आज लिहिल्या जाणाऱया कवितेने स्वतःच्या आवाजात बोलले पाहिजे’, कारण कविता हाच कवी जिवंत असल्याचा पुरावा असतो. याच संदर्भाने कवी पाटील आपल्या कवितेत म्हणतात,

माणूस म्हणून स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी

कुठलीही किंमत मोजून बोलावेच लागेल मला

बोलण्याचा कुणा विसर पडू नये

विस्मरणाचा कुणी गैरफायदा घेऊ नये

विस्मरणाचा रोग सर्वत्र पसरु नये

म्हणून बोलावेच लागेल मला

अजय कांडर

Related Stories

जगह सूनी सूनी रे…

Amit Kulkarni

रशियाची कोरोना प्रतिबंधक लस आणि त्यावरील विवाद

Patil_p

परंपरा आणि नाग्या

Patil_p

सुखान्त-भाग-3

Patil_p

पावसाच्या तडाख्याने शेतकरी हैराण

Patil_p

भक्ताने आशा आणि अपेक्षा सोडून द्याव्यात

Patil_p
error: Content is protected !!