Tarun Bharat

कसाईखाना-शेडच्या लिलावाकडे व्यावसायिकांची पाठ

भाडे जास्त असल्याने लिलाव प्रक्रिया बारगळली

प्रतिनिधी /बेळगाव

महसूल वाढीसाठी महानगरपालिकेने व्यापारी गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव मोहीम सुरू केली आहे. कोनवाळ गल्ली येथील मटन मार्केट व बकरी ठेवण्याचे शेड, कसाई गल्ली येथील कसाईखाना आणि धारवाड रोड येथील गाळा भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. मागीलवेळी प्रतिसाद लाभला नसल्याने सोमवारी तिसऱयांदा लिलाव प्रकिया आयोजित केली होती. मात्र भाडे जास्त असल्याचे सांगून लिलाव प्रक्रियेकडे व्यावसायिकांनी तिसऱयांदा पाठ फिरविली. त्यामुळे लिलाव प्रक्रिया बारगळली.

महापालिकेने कसाई गल्ली येथे बकरी ठेवण्याचे शेड व कत्तलखान्याची उभारणी केली होती. सदर इमारतीचा वापर मागील काही वर्षांपासून मटन मार्केटमधील व्यावसायिक करीत होते. पण या मोबदल्यात महापालिकेला कोणतेच भाडे मिळत नाही. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी बकरी ठेवण्याचे शेड व कत्तलखाना भाडेतत्त्वावर देण्याकरिता लिलाव प्रक्रिया राबविली होती. मात्र भाडे जास्त असल्याचे सांगून लिलाव प्रकियेत सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे लिलाव प्रक्रिया रद्द केली होती.

सोमवारी तिसऱयांदा लिलाव प्रक्रिया आयोजित करून भाडेतत्त्वावर देण्याचा प्रयत्न महसूल खात्याने केला. पण कत्तलखान्यासाठी प्रतिमहिना 35 हजार रुपये भाडे आणि 5 लाख रुपये अनामत रक्कम तसेच बकरी ठेवण्याच्या शेडकरिता प्रतिमहिना 25 हजार रुपये भाडे आणि 5 लाख 50 हजार रुपये अनामत रक्कम महापालिकेने निश्चित केली आहे.

कोणीच भाग घेतला नाही

मागील वेळीप्रमाणेच भाडे ठेवण्यात आल्याने अनामत रक्कम व भाडे जास्त असल्याने कोणीच व्यावसायिक भरण्यास तयार नाहीत. परिणामी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या लिलावप्रसंगी कोणीच भाग घेतला नाही. धारवाड रोड येथील गाळा, कोनवाळ गल्ली येथील कत्तलखाना व बकरी शेड भाडेतत्त्वावर घेण्याकडे व्यावसायिकांनी पाठ फिरविल्याने लिलाव प्रक्रिया बारगळली.

Related Stories

सुरळीत विजेसाठी 750 कर्मचाऱयांची अविरत सेवा

Patil_p

सिद्धी महिला मंडळातर्फे दीपोत्सवाचे आयोजन

Omkar B

आदी जांबव मादिग समाजाच्या विकासासाठी चिंतन सभा

Amit Kulkarni

युवकांनी देशसेवेला वाहून घ्यावे

Amit Kulkarni

खानापूर-जांबोटी क्रॉसजवळील खोकीधारकांना नोटिसा

Patil_p

बेंगळूर पोलीस दलातील २१ पोलिसांना कोरोनाची लागण

Archana Banage