Tarun Bharat

कसोटी क्रमवारीत केन विल्यम्सनची अग्रस्थानावर झेप

Advertisements

अजिंक्य रहाणे टॉप टेनमध्ये दाखल, कोहलीचे दुसरे स्थान कायम

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी मानांकनात भारतीय कर्णधार विराट कोहलीने (879) आपले दुसरे स्थान कायम राखले आहे तर हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेने (784) पाच स्थानांची झेप घेत टॉप टेनमध्ये स्थान मिळविले आहे. मात्र न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने (890 गुण) पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच अग्रस्थानावर झेप घेतली आहे तर स्मिथची (877) तिसऱया स्थानावर घसरण झाली आहे. गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाच्या कमिन्सने 906 गुणांसह आघाडीचे स्थान कामय राखले आहे.

मेलबर्नमध्ये झालेल्या दुसऱया कसोटीत रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियावर 8 गडय़ांनी विजय मिळविला. त्यात रहाणेने 112 व नाबाद 27 धावा जमवित सामनावीराचा बहुमानही पटकावला. या कामगिरीने मानांकनात त्याला बढती मिळाली असून तो आता सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. 2019 च्या ऑक्टोबरमध्ये त्याने पाचव्या स्थानापर्यंत मजल मारली होती आणि त्याने मिळविलेले तेच सर्वोच्च स्थान होते. गोलंदाजांत ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनलाही बक्षीस मिळाले असून त्याने दोन स्थानांची प्रगती करीत सातव्या स्थानावर तर वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने नवव्या स्थानावर झेप घेतली आहे. रवींद्र जडेजाने दुसऱया कसोटीत 57 धावांची उपयुक्त अर्धशतकी खेळी आणि तीन बळी मिळवित भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या या कामगिरीने अष्टपैलूंच्या क्रमवारीतील त्याच्या तिसऱया स्थानात कोणताही बदल झाला नसला तरी त्याने होल्डरमधील गुणांचे अंतर कमी केले आहे. मात्र फलंदाजी व गोलंदाजीत त्याने अनुक्रमे 11 व 4 गुणांची कमाई करीत 36 व 14 वे स्थान मिळविले आहे.

मेलबर्नवर पदार्पण करणाऱया शुभमन गिल व मोहम्मद सिराज यांनीही फलंदाजी व गोलंदाजीत स्थान मिळविले आहे. फलंदाजीत गिलने 76 व सिराजने गोलंदाजीत 77 वे स्थान मिळविले आहे. गिलने 45 व नाबाद 35 धावा जमविल्या तर सिराजने सामन्यात 5 बळी मिळविले. भारताचा आधारस्तंभ मानल्या जाणाऱया चेतेश्वर पुजाराचा खराब फॉर्म चालू असल्याने त्याची दोन स्थानांनी घसरण झाली असून तो आता 10 व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने मेलबर्न कसोटीत चार बळी मिळवित गोलंदाजांच्या क्रमवारीत पाचवे स्थान मिळविले आहे तर 30 व 40 धावांचे योगदान दिलेल्या मॅथ्यू वेडने 55 वरून 50 व्या स्थानावर मजल मारली आहे. कॅमेरॉन ग्रीनने 36 स्थानांची प्रगती करीत 115 वे स्थान मिळविले आहे.

विल्यम्सन अग्रस्थानी

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने मात्र अग्रस्थानावर झेप घेत वर्षाची अखेर केली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला मागे टाकत अग्रस्थान पटकावले आहे. दुसऱया कसोटीत निष्प्रभ ठरलेल्या स्मिथची आता तिसऱया स्थानावर घसरण झाली आहे. यापूर्वी 2015 च्या अखेरीस विल्यम्सनने अल्पकाळासाठी अग्रस्थान पटकावले होते. पाकविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने सामनावीर पुरस्कार पटकावताना 129 व 21 धावा जमविल्या. याचे त्याला 13 मानांकन गुण मिळाल्याने तो आता कोहलीपेक्षा 11 तर स्मिथपेक्षा 13 गुणांनी पुढे गेला आहे. न्यूझीलंडच्या रॉस टेलरने तीन स्थानांची प्रगती करीत 14 वे तर वेगवान गोलंदाज जेमीसनने केवळ पाच कसोटीतच टॉप 30 मध्ये स्थान मिळविले आहे. त्याने पाकविरुद्ध सामन्यात पाच बळी मिळविले होते. पाकच्या फवाद आलमने शतकी खेळी केल्याने त्याला क्रमवारीत 80 स्थानांची प्रगती करता आली. त्याने 102 वे स्थान मिळाले आहे तर मोहम्मद रिझवानने दोन अर्धशतके झळकावत 27 स्थानांची प्रगती करून 47 वे स्थान मिळवले आहे.

द.आफ्रिकेच्या फॅफ डु प्लेसिसने 14 स्थानांची प्रगती करीत 21 वे, डीन एल्गारने चार स्थानांची प्रगती करीत 20 वे स्थान मिळविले आहे तर गोलंदाजीत एन्गिडीने चार स्थानांची प्रगती करीत 56 वे स्थान मिळविले आहे. लंकेच्या दिनेश चंडिमलने तीन स्थानांची प्रगती करीत 38 वे, धनंजया डिसिल्वाने 9 स्थानांची प्रगती करीत 34, कुसल परेराने चार स्थानांची प्रगती करीत 60 वे स्थान मिळविले आहे. 

सांघिक क्रमवारीत न्यूझीलंड आस्ट्रेलियाला मागे टाकण्याच्या मार्गावर असून ते फक्त काही अंशाच्या फरकाने ऑस्ट्रेलियापेक्षा मागे आहेत. प्रत्येक मालिका संपल्यानंतर ताजी क्रमवारी जाहीर करण्यात येते. त्यामुळे न्यूझीलंडने दुसरा सामना अनिर्णीत राखला तरी ते ऑस्ट्रेलियाला मागे टाकत अग्रस्थानावर पोहोचू शकतात.

Related Stories

सुमित मलिकचे ऑलिम्पिक तिकीट निश्चित

Patil_p

दियागो मारडोनाला रूग्णालयातून लवकरच डिस्चार्ज

Omkar B

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका पाच सामन्यांची हवी : वॉर्न

Patil_p

टोकियो ऑलिंपिकसाठी स्थानिक 10 हजार शौकिनांना परवानगी

Patil_p

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा

Patil_p

अजिंक्यताऱयाच्या रस्त्याकडेच्या गटरचे काम निकृष्ट दर्जाचे

Patil_p
error: Content is protected !!