Tarun Bharat

काँग्रेसकडे दोन-तीन नवे चेहरे उर्वरित रिजेक्टेड माल

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची टीका : आजगांवकर पुन्हा उपमुख्यमंत्री व दामू नाईक मंत्री

प्रतिनिधी /मडगाव

काँग्रेस पक्ष भले ही 80 टक्के नवीन चेहऱयांना संधी दिल्याचे सांगत असले तरी दोन-तीन नवीन चेहरे सोडले तर इतर सर्व रिजेक्टेड माल निवडणुकीच्या रिंगणात आणल्याची टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. सासष्टीत यावेळी भाजपची कमळे फुलणार असून राज्यात भाजपचेच सरकार सत्तेवर येईल व या सरकारात बाबू आजगांवकर हे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री तर दामू नाईक हे मंत्री असतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सासष्टीतील आठ पैकी सात उमेदवारांसोबत काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधी पक्षनेते तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांच्यावर जोरदार टीका केली. मडगाव व फातोडर्य़ात आज ज्या काही समस्या आहेत. त्या समस्यांना कामत व सरदेसाई हेच जबाबदार असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

भाजपला या वेळी सासष्टी मिशन वगैरे काही करायचे नाही. यापूर्वी सासष्टी मिशन करून भाजपने वेगवेगळे अनुभव घेतले आहे. मात्र, यावेळी सासष्टीतील आठ ही मतदारसंघात भाजपचे उमेदवार असून त्यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. मडगाव, फातोर्डा, नावेली व कुंकळळी या मतदारसंघात भाजपला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कुडतरी, नुवे व वेळळी मतदारसंघात सुद्धा भाजपचा जोरदार प्रचार सुरू असून या मतदारसंघातील मतदार भाजपला साथ देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपण स्वता भाजप उमेदवारांच्या प्रचारात भाग घेतला आहे. सासष्टीत यंदा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी आढळून आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सासष्टीतील जनतेने भाजपने गोव्यात केलेली विकासकामे पाहिली आहेत. कोविडच्या काळात वाईट परिस्थिती असताना देखील सरकार जनतेच्यासाठी कार्यरत राहिले याची जाणीव जनतेला झाली असून सासष्टीत मिळत असलेला प्रतिसाद नक्कीच हुरूप देणारा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. स्थिर प्रशासन व विकासाला चालना देण्यासाठी गोव्यातील जनतेने भाजपला स्पष्ट बहुमत द्यावे असे आवाहन केले.

दक्षिण गोवा भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेला मडगावचे उमेदवार बाबू आजगांवकर, फातोर्डाचे दामू नाईक, कुडतरीचे ऍथनी बार्बोझा, नुवेचे दत्ता बोरकर, नावेलीचे उल्हास तुयेकर, बाणावलीचे दामोदर बांदोडकर व वेळळीचे सावियो रॉड्रिगीस हे उमेदवार तर प्रवक्ते उर्फान मुल्ला उपस्थित होते.

मडगावात बाबू आजगांवकर यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याने विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना हादरे बसू लागले आहेत. आज ते आपल्या सांखळी मतदारसंघात येऊन आव्हान देत आहे. त्यांनी अगोदर आपला मतदारसंघ शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मडगावातील सोनसोडो व बसस्थानकाचा प्रश्न का सुटला नाही याचे उत्तर अगोदर दिगंबर कामत व विजय सरदेसाई यांनी मडगाव व फातोडर्य़ातील जनतेला द्यावे. कामत व सरदेसाई यांनी मतदारांची वेळोवळी दिशाभूल केली असून यावेळी जनता जागृत झालेली आहे. त्यामुळे त्याचा पराभव नक्की असून आजगांवकर व दामू नाईक हे भाजप सरकारात मंत्री असतील असे त्यांनी सांगितले. दिगंबर कामत यांचे सरकार हे भ्रष्टाचारी होते. त्यांना आम्हाला भ्रष्टाचारी म्हणण्याचा अधिकार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.

मडगावकरांना बदल हवा आहे. आपला विजय हा नक्की आहे. दिगंबर कामत हे 27 वर्षे आमदार म्हणून कार्यरत होते. मात्र, त्यांना मडगावचा विकास साध्य करता आला नाही. येथील समस्या सुटलेल्या नाही. त्यामुळे जनता बदल घडवून आणणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. आजगांवकर यांनी व्यक्त केला. आपण पेडणे मतदारसंघात जशी विकासकामे केली आहे. तशाच पद्धतीने मडगावचा विकास करणार असल्याची हमी त्यांनी दिली. पेडणेत प्रवीण आर्लेकर हे विजयी होतील असा दावा त्यांनी यावेळी केला.

पुढचे सरकार हे भाजपचेच असेल व भाजपचे 27 आमदार निवडून येतील असा विश्वास दामू नाईक यांनी व्यक्त केला. भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर व त्यातून गोव्याला स्थिर मिळेल. स्थिर सरकार असले की, विकासाला गती मिळते. मनोहर पर्रीकर यांच्या नंतर डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याची धुरा यशस्वीरित्या सांभाळी असून त्यांच्या नेतृत्वाखाली गोव्याने विकासाचे अनेक टप्पे पाहिल्याचे दामू नाईक म्हणाले.

Related Stories

गढुळ पाण्याचा दाबोस शुद्धीकरण प्रकल्पावर परिणाम

Amit Kulkarni

मोपा परिसर धगधगतोय

Amit Kulkarni

फोंडय़ातील नायर यांच्या दुकानात चोरी

Patil_p

उन-पावसातही फोंडय़ात माटोळी बाजार गजबजला

Patil_p

परीक्षा रद्दच करा, अन्यथा शाळेतच त्वरित घ्या

Omkar B

कुंभारजुवे चोरी प्रकरणात तीन संशयित गजाआड

Omkar B