Tarun Bharat

काँग्रेसची डुबती नैय्या चिदंबरम सावरणार काय?

Advertisements

राज्यातील विधानसभा निवडणूक सहा महिन्यांवर ठेपली असून सत्ताधारी भाजपा व विरोधी काँग्रेससह इतर सर्व प्रादेशिक पक्षांमध्ये निवडणूकपूर्व धामधूम सुरु झाली आहे.

मतदारसंघाच्या चाचपणीपासून उमेदवार निवडीपर्यंत विविध कामांना वेग आला आहे. मुक्तीनंतर सुरुवातीची काही वर्षे सोडल्यास गेली चाळीस वर्षे गोव्यातील सत्ता काँग्रेस व भाजपा या दोनच राष्ट्रीय पक्षांकडे आलटून पालटून राहिली. प्रादेशिक पक्ष केवळ या सत्तेतले भागीदार म्हणून वावरले. यंदा दिल्लीतील आम आदमी पक्षाने गोव्याच्या राजकारणात उडी घेतली आहे. 2022 च्या या निवडणुकीचे राजकीय विश्लेषण करायचे झाल्यास भाजपासाठी त्यांनी केलेल्या सत्तेच्या प्रयोगांची सत्त्वपरीक्षा तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ निवडणूक निरीक्षक व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम हे दोन दिवसांच्या गोवा भेटीवर दाखल झाले असून काँग्रेसची डुबती नैय्या सावरण्यासाठी ते कोणती रणनिती आखणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचे मतदारसंघ संपर्क दौरे सध्या जोरात सुरु आहेत. गेल्या महिन्यात गोवा भेटीवर आलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याच नेतृत्त्वाखाली ही निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने मुख्यमंत्री सध्या जोमात आहेत. प्रत्येक मतदार संघात त्यांचे जोरदार स्वागत केले जात आहे. भाजपा आमदार व अन्य इच्छुक उमेदवारांची शक्तीप्रदर्शनेही पाहायला मिळतात. भाजपाचा हा जोश पाहून इतर प्रादेशिक पक्षांनीही आता कंबर कसली आहे. सर्वांत जुना प्रादेशिक पक्ष असलेल्या मगोने भाजपा व त्यानंतर आपसोबत युतीची शक्यता संपुष्टात आल्याने 40 पैकी 22 जागा लढण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी 12 उमेदवार पक्षाने जाहीर केले आहेत. आता उरतो प्रश्न गोवा फॉरवर्डचा. काँग्रेससोबत युती करण्यास हा पक्ष इच्छुक आहे. मात्र काँग्रेसमधील सुंदोपसुंदी अद्याप संपुष्टात आलेली नाही. गोवा फॉरवर्डने 12 जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केली असली तरी काँग्रेससोबत युतीचा एक दरवाजा खुला ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई हे चिदंबरम यांची भेट घेणार आहेत.

सन् 2017 च्या निवडणुकीत सर्वांधिक जागा जिंकूनही काँग्रेस सत्तेपासून वंचित राहिला. भाजपाने दहा आमदार फोडून नेल्यानंतर सुरु झालेले त्यांचे शुक्लकाष्ट संपता संपत नाही. एकेकाळचा हा बुलंद पक्ष आज गोव्यात आपल्या अस्तित्वाची लढाई लढताना दिसतो. पक्षातील अंतर्गत भांडणतंटे चव्हाटय़ावर आले असून आता सामान्य कार्यकर्तेही प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांच्या अपयशावर प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीत अवघ्या पाच जागा जिंकून केलेल्या खराब कामगिरीनंतर नगरपालिका निवडणुकीतही काँग्रेसला अपेक्षित यश गाठता आलेले नाही. काँग्रेसकडे सध्या जे पाच आमदार उरले आहेत त्यामध्ये चारजण माजी मुख्यमंत्री व गोव्याच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ नेते आहेत. मात्र या सर्वांची तोंडे चार दिशांनी वळलेली असल्याने पक्षाच्या भवितव्यासाठी त्यांच्यात कुठेच एकमत दिसत नाही. जाहीर व्यासपीठावर ते कधीच दिसत नाहीत. परस्परांवर ते जाहीर टीका करण्याचे टाळत असले तरी त्यांच्यातील अंतर्गत शीतयुद्ध मात्र लपलेले नाही. दिडशे वर्षांचा इतिहास असलेल्या या पक्षाची वर्तमान स्थिती बिकट असून भविष्याचे आडाखे तर कुठेच दिसत नाहीत.

एकेकाळी गोव्याच्या जनमानसावर घट्ट पकड असलेल्या मगो व युगोला भुईसपाट करून काँग्रेसचा हात गोव्याच्या तळागाळापर्यंत पोहचला होता. प्रादेशिक पक्षातील  प्रतिष्ठीत नेत्यांनाही काँग्रेसच्या या राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्याचा मोह आवरला नाही. पुढे घराणेशाही व सत्तेच्या साठमारीत अडकलेला हा पक्ष उभारी घेऊ शकलेला नाही. पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडुराव हे गेले वर्षभर निवडणुकीची रणनिती आखण्यापेक्षा अंतर्गत वादविवाद व तंटे बखेडे सोडविण्यातच आपला वेळ व ऊर्जा खर्च करताना दिसतात. येणाऱया निवडणुकीत 80 टक्के तरुणांना उमेदवारी देणार, असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी जाहीर केले खरे, पण त्यांच्या नेतृत्वालाच पक्षातील काही नेत्यांनी आव्हान दिले आहे.

गेली दहा वर्षे राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आहे. सन् 2017 मध्ये मतदारांनी भाजपाच्या विरोधात कौल देऊनही मागील दारातून हा पक्ष सत्तेवर आला. भाजपा विरोधात दंड थोपटण्यासाठी राज्यात अनेक मुद्दे आहेत. कोरोनामुळे  राज्यात उद्भवलेली बिकट आर्थिक परिस्थिती, जनविरोधी धोरणे, वाढती महागाई यामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. या परिस्थितीपुढे हतबल झालेली जनता सक्षम पर्याय शोधत आहे. आपने मोफत वीज, स्वच्छ प्रशासन देण्याची घोषणा करून दिल्ली मॉडेल आणण्याचे आश्वासन गोमंतकीयांना दिले आहे. आपचा गोव्यात प्रभाव वाढत असून तो भाजपापेक्षा काँग्रेसला पर्याय ठरु लागला आहे.

सध्याच्या काळात निवडणुका जिंकण्यासाठी जी रणनिती लागते त्यात भाजपाने सर्वांवर मात केलेली आहे. संघटन कौशल्यापासून, मतदारांपर्यंत पोहचणाऱया विविध माध्यमांचा अगदी शिताफीने वापर त्यांच्याकडून केला जातो. काँगेसची परिस्थिती नेमकी उलटी आहे. पक्षपातळीवर उमेदवारी मिळविण्याचा शेवटचा पर्याय म्हणून काँग्रेसकडे पाहिले जाते. काँग्रेसला योग्य व तुल्यबळ उमेदवार शोधूनही सापडत नाहीत. या उलट भाजपामध्ये एकाहून अधिक उमेदवारांची तिकिटासाठी चढाओढ लागली आहे. अशा परिस्थितीत भाजपाला आव्हान द्यायचे असल्यास राज्यातील सर्व प्रमुख पक्षांसमोर महाआघाडी हा पर्याय होता. मात्र बहुतेक पक्षांनी आपले संभाव्य उमेदवार जाहीर केल्याने ही शक्यता मावळलेली दिसते. त्यामुळे जनमत विरोधात असूनही सध्या भाजपा जोमात तर काँग्रेस कोमात आहे!

सदानंद सतरकर

Related Stories

कोरोनाची लस आता अगदी नजीकच्या टप्प्यात

Patil_p

मोसमी पावसाचा बिगूल

Patil_p

दिवाळीचे दिवे

Amit Kulkarni

नव्या मालवाहतूक धोरणाचे महत्त्व आणि महात्म्य

Patil_p

अनिरुद्ध उषेच्या महालात

Patil_p

नागरिकांना दिलासा काय?

Patil_p
error: Content is protected !!