ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या वेदांता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, अखेर मृत्यूशी असलेला त्यांचा लढा अपयशी ठरला असून आज पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्वीट करत सांगितले की, वडील अहमद पटेल यांचे आज पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी निधन झाले आहे. एका महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान एकाच वेळी त्यांच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले, त्यांनंतर त्यांच्या शरीराचे अनेक अवयव निकामी होत गेले आणि त्याची प्रकृती आणखी खालावली. आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, कोरोनाच्या गाइडलाइन्सचे पालन करा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा.


अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त कळताच काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अहमद पटेल पक्षाचा एक स्तंभ होते. ते संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये जगले. जेव्हा काँग्रेस पक्ष खडतर काळातून जात होता, तेव्हाही ते पक्षासोबत उभे राहिले. ते एखाद्या मौल्यवान संपत्तीसारखे होते. आम्हाला सदैव त्यांची उणीव जाणवत राहिल. या दुःखाच्या प्रसंगी फैजल, मुमताज आणि संपूर्ण कुटुंबासोबत माझ्या सहवेदना आहेत, असे राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे.
राहुल गांधी यांच्याबरोबरच काँग्रेसच्या नेत्यांनी अहमद पटेल यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पटेल हे सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार असल्याने त्यांचा पक्षात मोठा दबदबा होता.