Tarun Bharat

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोती देसाई यांचे निधन

प्रतिनिधी/ कुंकळ्ळी

काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मोती रघुनाथ देसाई (वय 74 वर्षे) यांचे सोमवार 21 रोजी सकाळी गोमेकॉत निधन झाले. देसाई हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि आजार बळावल्यामुळे त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांना मृत्यू आला.

मोती देसाई यांचे सामाजिक कार्य मोठे असून काँग्रेस पक्षात त्यांनी गट समितीपासून जिल्हा समिती व गोवा प्रदेश समितीपर्यंत विविध स्तरांवर वेगवेगळी पदे भूषविली होती. प्रदेश काँग्रेस समितीचे खजिनदार व उपाध्यक्ष म्हणून अनेक वर्षे त्यांनी सेवा दिली. त्यांनी 1984 मध्ये विधानसभेची निवडणूक कुंकळ्ळी मतदारसघातून गोवा काँग्रेसच्या तिकिटावर लढविली होती. देसाई हे एक उत्कृष्ट तियात्र कलाकार होते. त्यांनी अनेक तियात्रांत भूमिका केल्या होत्या.

सोमवारी सायंकाळी मुरिडा-कुंकळ्ळी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. थोरले बंधू रोहिदास देसाई यांनी त्यांच्या पार्थिवाला मंत्राग्नी दिला. मोती देसाई हे स्वातंत्र्यसैनिक कै. कुष्टा देसाई आणि स्वातंत्र्यसैनिक व पणजी येथील रिट्झ उपाहारगृहाचे मालक रोहिदास उर्फ दाद देसाई यांचे बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी गोमती देसाई (निवृत्त सरकारी शिक्षिका), भाऊ रोहिदास, पुतणे राजेश व रघुनाथ आणि इतर असा परिवार आहे.

अनेक नेत्यांकडून श्रद्धांजली

मोती देसाई यांच्या निधनाची वार्ता कळताच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यात उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, जलस्रोतमंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स, माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, गिरीश चोडणकर, आग्नेल फर्नांडिस, यतीश नाईक, सरकारी अधिकारी लेविन्सन मार्टिन्स, प्रताप देसाई, पोलीस अधीक्षक सॅमी तावारीस, उपअधीक्षक राजू देसाई व इतर मान्यवरांचा समावेश राहिला.

पक्षनिष्ठ, ध्येयवादी नेते : कामत

विरोधी पक्षनेते कामत यांनी मोती देसाई हे एक पक्षनि÷ व ध्येयवादी नेते होते असे म्हटले आहे. देसाई यांनी पक्षाला मोठे योगदान दिले. राजकीय क्षेत्रातील त्यांचे कार्य पक्षाला नेहमीच प्रेरणादायी राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. मोती देसाई यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असल्याचे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे, तर देसाई यांच्या जाण्याने आपण एक जवळचा मित्र गमावला असल्याची प्रतिक्रिया लुईझिन फालेरो यांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेस पक्षाची भरून न येणारी नुकसानी : चोडणकर

मोती देसाई यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची भरून न येणारी नुकसानी झाल्याचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे. मोती देसाई हे काँग्रेस पक्षाशी निष्ठावंत होते. शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीशी वचनबद्ध राहिले. त्यांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करतो असे चोडणकर यांनी म्हटले आहे.

सच्चा मित्र गमावला : लुईझिन फालेरो

मोती देसाई व आपली खास मैत्री गेली अनेक वर्षे होती. मोती देसाई हे आपल्या कुटुंबातील सदस्यच होते. त्यांच्या जाण्याने आपल्याला धक्काच बसला. आपण एक सच्चा मित्र गमावला अशी प्रतिक्रीया माजी मुख्यमंत्री तथा नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो यांनी व्यक्त केली आहे. मोती देसाई यांनी काँग्रेस पक्षासाठी प्रामाणिकपणे योगदान दिले. पक्ष मजबूत करण्यात त्यांनी आपल्या परिने योगदान दिले. आज पक्ष एका प्रामाणिक नेत्याला मुकल्याचे फालेरो यांनी म्हटले आहे.

प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने मडगाव काँग्रेस कार्यालयात एका विशेष बैठकीत मोती देसाई यांना काँग्रेसच्या नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी आमदार लुईझिन फालेरो, गिरीश चोडणकर, माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा, जोसेफ डायस, सुभाष फळदेसाई, एम. के. शेख व इतरांची उपस्थिती होती.

Related Stories

गोवा राज्यात प्रवेशासाठी मार्ग खुले – मुखमंत्री प्रमोद सावंत

Archana Banage

गुड्डेमळ-सावर्डे अपघातात एक ठार

Amit Kulkarni

राष्ट्रपती कोविंद यांचे आगमन

Amit Kulkarni

कोरोना महामारीमुळे माटोळी बाजारही महागला

Omkar B

केपे पालिका निवडणुकीत 78 टक्के मतदान

Amit Kulkarni

कारवार येथे मृत डॉल्फिन आढळला

Amit Kulkarni