Tarun Bharat

काँग्रेसचे योगदान समजण्यासाठी भारताचा इतिहास नीट शिकावा

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

प्रतिनिधी /कुडचडे

काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेची सांगता होताच भाजपची ‘अंतिम यात्रा’ सुरू होणार आहे. घाबरलेले गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढय़ातील आणि गोवा मुक्तीलढय़ातील काँग्रेस पक्षाचे योगदान समजून घेण्यासाठी भारताचा इतिहास नीट शिकला पाहिजे. कारण मुख्यमंत्री सावंत यांनी कर्नाटकातील उडुपी येथील एका कार्यक्रमात ‘काँग्रेसने 1947 मध्ये भारत जोडो यात्रा काढायला हवी होती, ज्यामुळे गोवा लवकर मुक्त होण्यास मदत झाली असती’, असे विधान केलेले आहे, असे प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले. इतिहासाचे कमी ज्ञान असलेला मुख्यमंत्री  असाही टोला त्यांनी हाणला.

1973 मध्ये जन्मलेल्या आणि द्वेष, जातीय संघर्ष व फुटीरतावादी राजकारणाचे धडे घेत शाखांवर आपला वेळ घालवलेल्या व्यक्तीकडून तुम्ही दुसरी काय अपेक्षा करू शकता. डॉ. प्रमोद सावंत यांना ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्वयंपूर्ण गोवा’चे वेड लागले आहे. या सर्वांचा पाया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘जुमलाराज’वर आधारलेला आहे, अशी टीकाही पाटकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

मी मुख्यमंत्र्यांना महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग, पंडित जवाहरलाल नेहरूंचे डिस्कव्हरी ऑफ इंडिया आणि भारतीय स्वातंत्र्यलढा तसेच गोवा मुक्तीलढय़ावरील इतर पुस्तके वाचण्याचा सल्ला देतो. यामुळे त्यांना इतिहासाचे खरे ज्ञान प्राप्त होण्यास मदत होईल आणि अज्ञान दाखविल्याने जाणारी लाज वाचवता येईल, असे पाटकर यांनी म्हटले आहे. आमचे नेते राहुल गांधी हे भारत एकसंध राखण्यासाठी यात्रा करत आहेत आणि धार्मिक सद्भावना, शांतता व एकतेचा संदेश देत आहेत. ऐतिहासिक भारत जोडो यात्रेत दररोज लाखो लोक सामील होत आहेत. ही यात्रा भारतीय राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

‘पोस्टल बॅलेट’साठी पक्षांमध्ये चढाओढ

Amit Kulkarni

काँग्रेसच्या गट, जिल्हा समित्या बरखास्त

Amit Kulkarni

दुचाकी चोरी प्रकरणी दोघा संशयितांना अटक

Omkar B

महामार्ग रुंदीकरणाला विरोध करू नका

Amit Kulkarni

खनिजमालप्रकरणी निवाडय़ाचे श्रेय घेण्याचा भाजपकडून प्रयत्न

Patil_p

कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत

Amit Kulkarni