नवे सरकार आणि नवा गोवा साकारण्यासाठी सज्ज व्हा : सरकार स्थापन होताच गरिबांना दरमहा 6 हजार रूपये,काँग्रेसचे जे÷ नेते राहुल गांधी यांची साखळीत घोषणा


प्रतिनिधी /डिचोली
गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी गोव्यातील जनतेने ओपिनियन पोलद्वारे दाखविलेली एकजूट आणि त्यानंतर स्वतंत्र गोवा राज्याचे पूर्ण झालेले स्वप्न यात काँग्रेस पक्षाचाही मोठा भाग आहे. गोव्यातील भाजपची राजवट जवळपास संपुष्टात येण्याची वेळ आली असून या निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाचेच सरकार स्थापन होणार असून हे सरकार काँग्रेस पक्षाचे नव्हे तर गोवेकरांचे सरकार असेल, अशी घोषणा काँग्रेस पक्षाचे ज्ये÷ नेते राहुल गांधी यांनी साखळी येथे केले.
राज्यात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील लोकांना विश्वासात घेतले जाईल. कोणतेही निर्णय केंद्रातून राज्याच्या माथ्यावर थोपविले जाणार नाहीत. तसेच गोव्याला पर्यटन हब बनविलले जाणार असून गोव्याचा कोळसा हब कदापिही केला जाणार नाही, असेही ते म्हणाले.
भाजपकडून केंद्रावर जास्त भर
गोवा सरकार व या राज्यावर पूर्णपणे या राज्यातील जनतेचा हक्क आहे. या राज्यात होणारे निर्णय हे राज्यातील लोकांना विश्वासात घेऊनच झाल्यास खरे लोकोपयोगी आणि लोकाभिमुख सरकार ठरणार आहे. परंतु भाजपने आज तसे न करता केवळ केंद्रावर जास्त भर दिला आहे. त्यामुळे या राज्याची वाताहत होऊ लागली आहे.
गोव्याला उत्कृष्ट पर्यटन केंद्र बनविणार
गोवा हे एक जागतिक पर्यटन केंद्र असून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटक या राज्यात येतात. त्यांना पर्यटन क्षेत्रात चांगल्या सोयी उपलब्ध करून द्यायच्या की कोळशाचे प्रदुषण द्यायचे? जर या राज्यात कोळशाचे प्रदूषण वाढीस लागले तर या राज्यातील पर्यटकांची संख्या कमी होणार आणि राज्याच्या आर्थिक स्थितीला हादरा बसणार. यासाठी गोवा हे एक उत्कृष्ट पर्यटन केंद्र बनविणार, असे आश्वासन राहुल गांधी यांनी यावेळी दिले.
साखळी येथील नगरपालिका मैदानावर काँग्रेस पक्षातर्फे आयोजित निर्धार सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी बोलत होते. कोविड मार्गदर्शक तत्वांचे पालन करून एक हजार लोकांच्या मर्यादित उपस्थितीत ही सभा आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर काँग्रेसचे नेते वेणूगोपाल, माजी केंद्रीय मंत्री पि. चिदंबरम, राज्याचे निवडणूक प्रभारी दिनेश गुंडूराव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रतापसिंह राणे, अलका लांबा, युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, विजय भिके, प्रताप गावस, सुनिता वेरेकर, प्रवीण ब्लेगन, मंगलदास नाईक, उमेदवार धर्मेश सगलानी, अमरनाथ पणजीकर व इतरांची उपस्थिती होती.
गरीबी हटविण्यासाठी ‘न्याय’ योजना
भारत देश हा एक समृद्ध व श्रीमंत देश म्हणून या देशाची 2014 पूर्वी गणना होत होती. मात्र त्यानंतर भाजप सरकारने आणलेली धोरणे सामान्य जनतेला आर्थिक संकटात लोटणारी आहेत. नोटबंदी लागू करून गरीब लोकांना मेटाकुटीला आणले. त्यानंतर चुकीच्या पद्धतीने जिएसटी लागू करून लहानसहान धंदे व्यवसाय करणाऱया व्यवसायिकांना संकटात लोटले. आज देश म्हणजे दोन पध्दतीचा हिंदुस्थान होत चालला आहे. एक गरिबंचा आणि एक श्रीमंतांचा हिंदुस्थान. हे आम्ही व्हायला देणार नाही. या राज्यातील गरिबी हटविण्यासाठी काँग्रेस सरकार सत्तेवर येताच न्याय योजना आणली जाईल. या योजनेद्वारे राज्यातील प्रत्येक गरिब लोकांच्या खात्यावर थेट दरमहिना सहा हजार रूपये येणार. म्हणजेच वर्षाचे 72 हजार रूपये या लोकांना मिळणार आहेत, अशी घोषणा यावेळी नेते राहुल गांधी यांनी केली.
पक्षघातकींना बाहेरचा रस्ता
गोव्याच्या निवडणुकीत प्रथमच 70 टक्के नवीन चेहरे पक्षाने उमेदवार म्हणून दिले आहेत. पक्षघातकीपणा करणाऱया सर्व आमदार उमेदवारांना पक्षापासून दूरच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यावेळी राज्यात काँग्रेस पक्षातर्फे दिलेल्या नवीन चेहऱयांना चांगली संधी आहे. काँग्रेस पक्षाचेच सरकार स्थापन होणार.
मुख्यमंत्री हरणार आणि इतिहासाची पुनरावृत्ती होणार : कामत
प्रतापसिंह राणे यांनी साखळीचा विकास केला मुख्यमंत्र्यांनी साखळीत कोणता विकास केला ते दाखवावे. काहीही केलेले असून केवळ नाटके केली. गेल्या दहा वर्षात सामान्य लोकांना आर्थिक संकटात लोटले. सरकारने केवळ घोटाळे आणि भानगडी केल्या. नोकऱया विकल्या. कोविडचे गैरव्यवस्थापन करताना सरकारने अनेक जीव घेतले. आणि वरून भिवपाची गरज नाही, असे म्हणतात. मांदेत लोकांनी इतिहास घडविला होता, मुख्यमंत्र्यांना सात हजार मतांनी पाडले. याही निवडणुकीत इतिहास नोंदवताना या मुख्यमंत्र्यांचा पाडाव करा. गोव्यात आप, तृणमूल हे पक्ष केवळ मते फोडण्यासाठी आलेले आहेत. खाणी भाजप सरकारने बंद केल्या व त्या सुरू करण्यास डबल इंजिन सरकार फोल ठरले आहे. दहा वर्षे खाणी सुरू करण्याची केवळ आश्वासनेच मिळाली. त्यासाठीच भाजप सरकारला गोमंतकीय जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केले.
भाजपला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही
फ्रान्सिस सार्दिन यांनी आपल्या भाषणात राज्याची वाटचाल अधोगतीकडे या भाजप सरकारने नेली आहे. या राज्यात भाजप सरकारला आज सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाही. लोकांना आर्थिक संकटात, तसेच कोवीड महामारीत ऑक्सजिन अभावी लोकांचे जीव घेत या सरकारने पावलोपावली आपली लोकांप्रती असंवेदनशीलता सिध्द केली आहे, या सरकारला आज घरी पाठविण्याची वेळ आली आहे आणि ही संधी गोवेकरांनी सोडू नये, असे आवाहन केले.
गोव्याची प्रतिमा सुधारण्यासाठी काँग्रेसला मत द्या : चोडणकर
स्वागत राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी करताना गोवेकरांच्या हातात गोवेकरांचे भविष्य असून यावेळी मतदान करताना भविशाचा विचार करूनच मतदान करा. आतापर्यंत गेल्या दहा वर्षांत गोव्याची प्रतिमा भाजप सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी डागाळलेली आहे. ती पुन्हा स्वच्छ करण्यासाठी काँग्रेस पक्षाला मतदान करा, असे आवाहन केले.
यावेळी काँग्रेस पक्षाचा गोवा राज्य निवडणूक जाहिरनामा नेते राहुल गांधी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. सूत्रसंचालन एम. के. शेख यांनी केले तर आभार अमरनाथ पणजीकर यांनी मानले.
जाहीरनाम्यात 2035 पर्यतचा आराखडा सादर
जाहीरनाम्यात पुढील 2035 वर्षापर्यंतचा आराखडा (रोडमॅप) सादर केला आहे. एकूण 7 कलमी असा हा आराखडा असून त्यात सुरम्य गोवा, सुस्पृंत गोवा, संतुलित गोवा, सुविद्य गोवा, समृध्द गोवा, सुशासित गोवा, स्वानंदी गोवा अशी आश्वासने देण्यात आली आहेत. महिला सशक्तिकरण, आदिवासींचे सामाजिक कल्याण, नोकऱया, व्यावसाय वृध्दी, महागाई नियंत्रण, राहणीमान सुधारणे, शिक्षण प्रसार, आरोग्य सुविधा, क्रीडा व युवा व्यवहार, वीज, पाणी, रस्ते सुधारणा, सार्वजनिक वाहतूक, कला-संस्कृती, पर्यटन, कृषी, मासेमारी, डेअरी, खाण उद्योग, पर्यावरण, पंचायती राज, जिल्हापंचायत, नगरनियोजन, वारसा, खलाशी, वित्त-अर्थपुरवठा, सहकार, कायदा सुधारणा, लोकायुक्त, कॅसिनो गॅम्बलिंग, कचरा व्यवस्थापन, तातडीची प्रतिसाद योजना इत्यादी सर्व क्षेत्रात बदल घडवून आणण्याचा तसेच त्यात लक्षणीय सुधारणा करण्याचे वचन जाहीरनाम्यातून देण्यात आले आहे.