Tarun Bharat

काँग्रेस आता शिवसेनेशी युतीच्या तयारीत

प्राथमिक बोलणी फलदायी : जानेवारीत घोषणा होण्याची शक्यता.राष्ट्रवादीकडूनही युतीचा प्रस्ताव

प्रतिनिधी /पणजी

काही दिवसांपूर्वीसुद्धा स्वबळावरच निवडणूक लढण्याचा ठाम निर्धार बोलून दाखवणारे काँग्रेस नेत आता जमेल तेवढय़ा पक्षांशी युती करण्यापर्यंतच्या मानसिकतेत आले आहेत. त्यातून नुकतीच गोवा फॉरवर्डशी गाठ बांधल्यानंतर आणखी दोन पक्षांसोबत काँग्रेसची युती होणार असल्याचे वृत्त आहे.

हे दोन पक्ष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी असून दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची नुकतीच केंद्रीय पातळीवर प्राथमिक बोलणीही पूर्ण झाली आहेत. त्यापैकी शिवसेनेसोबतची बोलणी अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याने जानेवारी महिन्यात युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेतील एका वरिष्ठ पदाधिकाऱयानेच ही माहिती दिली आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि काँग्रेसतर्फे सोनिया व राहूल गांधी यांच्यात सदर बोलणी झाली. त्यातून दोन्ही नेते सकारात्मक निर्णयापर्यंत पोहोचले आहेत. अंतिम पुढील बोलणी करण्यासाठी जानेवारी महिन्यात शिवसेना नेते संजय राऊत गोव्यात येत असून काँग्रेस नेते दिनेश गुंडूराव, दिगंबर कामत, गिरीश चोडणकर यांच्याशी बोलणी झाल्यानंतर युतीची घोषणा होणार आहे.

पुढील टप्प्यात राष्ट्रवादीनेही काँग्रेससोबत युतीची बोलणी सुरू केली आहेत. त्यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात प्राथमिक बोलणी होऊन युतीवर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे. केवळ घोषणा बाकी आहे, अशीही माहिती मिळाली आहे.

प्राप्त माहितीनुसार शिवसेनेचे उत्तर गोव्यातील मोजक्या मतदारसंघातच प्राबल्य आहे. दक्षिण गोव्यात अस्तित्व नगण्य असेच आहे. अशावेळी कितीही मोठी मागणी केली तरीही जास्तीत जास्त तीन मतदारसंघ त्यांच्या पदरात पडू शकतात. त्यात प्रामुख्याने काँग्रेससाठी फारच दुर्बल असलेल्या म्हापसा, शिवोली, पेडणे या किंवा अन्य एक दोन मतदारसंघांचा समावेश असू शकतो, असे सदर पदाधिकाऱयाने सांगितले.

बाणावलीचे राष्ट्रवादीचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती डळमळीत झाली आहे. एका बाजूने आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, रिव्होल्युशनरी गोवन्स (गोवा सुराज) यासारखे पक्ष निदान विधानसभेत प्रवेश तरी व्हावा यासाठी धडपडत आहेत तर दुसऱया बाजूने राष्ट्रवादी विधानसभेतील स्वतःचे अस्तित्व गमावून बसतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेसपुढे युतीची झोळी पसरविण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहिलेला नाही. ही युती किती यशस्वी होते ते लवकरच स्पष्ट होणार आहे.

गोवा फॉरवर्डने काँग्रेससोबत युतीची घोषणा होताच आपल्या पदरी कोणता मतदारसंघ पडेल याची सुद्धा वाट न पाहता स्वतःचे प्राबल्य असलेल्या सांत आंद्रे सारख्या मतदारसंघात घरोघरी प्रचारकार्य आरंभही केले आहे. पहिल्याच प्रयत्नात तीन आमदारांसह विधानसभेत दमदार प्रवेश केलेला व नंतर तिनही आमदारांना मंत्रीपदे मिळावून इतिहास रचलेला गोवा फॉरवर्ड पक्ष सध्या दोन आमदारांनी साथ सोडल्यामुळे एकाकी पडला आहे. भरीस मध्यंतरी या पक्षात दाखल झालेले हवसे गवसेही अर्ध्यावरच काडीमोड घेऊन दूर गेल्यामुळे पक्षाची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. अशावेळी काँग्रेसने पुढे केलेल्या ’हाता’त त्यांचा ’नारळ’ सुरक्षित राहतो की पडून फुटतो, ते निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

आम्ही अनभिज्ञ : पणजीकर

दरम्यान, यासंदर्भात काँग्रेसचे प्रसार माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांच्याशी संपर्क साधला असता, सध्यातरी हा विषय आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणे उचित होणार नाही, एवढेच त्यांनी सांगितले.

Related Stories

युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे ठाणे येथील पदभ्रमण मोहिमेमध्ये सहभागी

Omkar B

पोलीस व सर्व सरकारी यंत्रणांनी कठोर व्हावे.

Patil_p

क्लिफर्ड मिरांडा एफसी गोवाचे आता अंतरिम प्रशिक्षक

Amit Kulkarni

ओलेन्सियो सिमोईस व वसंत नाईक यांचा काँग्रेस प्रवेश

Amit Kulkarni

सरकारने नोकऱयांसाठी पैसे घेतल्याचे सिध्द करून दाखवा

Patil_p

काणकोणात आढळले 11 कोविड रुग्ण

Amit Kulkarni