Tarun Bharat

काँग्रेस-एआययुडीएफ आघाडी संपुष्टात

भाजपचे कौतुक ठरले निमित्त – बोडोलँड पीपल्स प्रंटबाबत लवकरच निर्णय

वृत्तसंस्था  / गुवाहाटी

आसाममध्ये विरोधी पक्षांच्या महाआघाडीला तडे जाण्यास प्रारंभ झाला आहे. खासदार बदरुद्दीन अजमल यांच्या नेतृत्वाखालील एआययुडीएफ आणि बोडोलँड पीपल्स प्रंटसोबतची आघाडी संपुष्टात आणण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांच्या अध्यक्षतेखालील कोअर कमिटीच्या एका बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे.

एआययुडीएफ नेतृत्व आणि वरिष्ठ सदस्यांकडून भाजप तसेच मुख्यमंत्र्यांची सातत्याने प्रशंसा होत आहे. यामुळे काँग्रेस पक्षाबद्दल जनतेच्या धारणेवर प्रभाव पडला आहे. दीर्घ चर्चेनंतर प्रदेश काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या सदस्यांनी सर्वसंमतीने एआययुडीएफ आता ‘महाजोत’मध्ये सामील राहू शकत नसल्याचा निर्णय घेतला असल्याचे काँग्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

बोडोलँड पीपल्स प्रंटसोबतच्या आघाडीवरही चर्चा झाली. बीपीएफचे नेतृत्व देखील महाआघाडीत सामील असण्यावरून नाराजी व्यक्त करत आहे. बीपीएफ प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला आहे. आघाडी संपुष्टात आणण्याच्या निर्णयाची माहिती पक्षश्रेष्ठींना देण्यात येणार असल्याचे प्रवक्त्याकडून सांगितले आहे.

निर्णय दुर्दैवी ः एआययुडीएफ

काँग्रेसच्या या निर्णयाला एआययुडीएफने एकतर्फी तसेच दुर्दैवी ठरविले आहे.  आघाडीतून पक्षाला हटविण्याचा काँग्रेसचा एकतर्फी निर्णय दुर्दैवी आहे, कारण धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी पक्षांनी एकजूट राहणे तसेच आघाडी कायम ठेवयणच्या प्रयत्नांना गतिमान करण्याची गरज असल्याचे विधान एआययुडीएफचे आमदार हाफिज बशीर अहमद यांनी केले आहे. एआययुडीएफने नेहमीच भाजपच्या सांप्रदायिक धोरणांना विरोध केला आहे. काँग्रेसने आघाडीत फूट पाडू नये, उलट आघाडी मजबूत करण्याच्या पद्धतींवर विचार करावा असेही त्यांनी म्हटले आहे.

महाजोत अपयशी

आसाममध्ये चालू वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 10 पक्षांची महाआघाडी किंवा ‘महाजोत’ची स्थापना करण्यात आली होती. काँग्रेस, एआययुडीएफ आणि बीपीएफसोबत यात जिमोचायन (देवरी) पीपल्स पक्ष, आदिवासी नॅशनल पक्ष, माकप, भाकप, भाकप (माले), अंचलिक गण मोर्चा आणि राजदचा समावेश होता. आघाडीने निवडणुकीत 50 जागा जिंकल्या होत्या. यात काँग्रेसला 29, एआययुडीएफने 16, बीपीएफने 4 तर माकपने एका जागेवर यश मिळविले होते.

Related Stories

राजीनाम्याचा प्रश्नच नाही!

Patil_p

दहशतवादी बिलालकडून डॉक्टर गुलची हत्या

Patil_p

राजस्थानातील करौलीत हिंसाचार, 42 जखमी

datta jadhav

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 420 डॉक्टरांचा मृत्यू; IMA ने दिली माहिती

Tousif Mujawar

उच्च न्यायालयावर निवडणूक आयोग नाराज

Patil_p

घाऊक महागाई दरात किरकोळ घट

Patil_p