Tarun Bharat

काँग्रेस कात टाकणार काय?

कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडावी असेच काहीजण जरूर म्हणोत. जे सारे काही झाले तो फक्त एक ड्रामा होता. प्रत्यक्षात काहीच घडणार नव्हते असेही काही म्हणोत. पण प्रशांत किशोर आणि काँग्रेसचे जमता जमता तुटले हे मात्र खरे. लोक सभा  निवडणुकीला अवघ्या दोन वर्षांचा अवधी असताना आणि तोपर्यंत 10-12 राज्यांच्या निवडणुका देखील होणार असताना काँग्रेसला एक धीराचा हात बरोबर असायला हवा होता. कोठे काय चुकते आहे हे स्पष्टपणे म्हणणारा कोणी हवा होता. प्रशांत किशोर म्हणजे एकेकाळी नरेंद्र मोदींबरोबर देखील काम केलेला. मे, 2014 च्या मोदींच्या विजयात त्याचा किमान खारिंएवढा तरी वाटा. त्यामुळे नंतर त्याचे ’राजकीय सल्ला’ देण्याचे दुकान भन्नाट चालले. एव्हढे की आता किशोरला देखील साथीला घेण्यासाठी काँग्रेसला विचार करावा लागला.

फक्त बसून जहागीरदारी केली की पायाखालची माती कधी सरकती ते कळत नाही. आजच्या काँग्रेसला हाच रोग लागला आहे. लोकांत जाऊन काम फारसे न केल्याने राजकारणातील डावपेचादेखील कळत नाहीत. मग रणनीती बनवणे सोडाच. दरबारी संस्कृतीत फक्त भाटच उत्पन्न झाल्याने कोण आपला?, कोण परका?, कोण कामाचा? कोण भोंदू? हेदेखील कळेनासेच होते. त्यात पक्षांतर्गत निवडणुका खुंटीला टांगून ठेवल्याने गणंगच पुढे यायला वाव मिळाला. युवक काँग्रेसमध्ये अंतर्गत निवडणुका घेतल्या तेव्हा धनाढय़ नेत्यांची मुले अमाप साधनांमुळे अलगद नेता बनली. तळमळीच्या कार्यकर्त्यांची हेळसांड पक्षाला महागात पडते. महाराष्ट्रासारख्या राज्यात काही भागात भाजपमधील नि÷ावंतांची देखील परवड होत आहे. तेथील आणि देशाच्या बऱयाच भागातील काँग्रेस संघटन म्हणजे ’आंधळय़ाच्या गायी देव राखी’ अशाच
प्रकारचे.

 मोदींच्या उदयाने मात्र काँग्रेस घायकुतीला आलेली आहे. याला कारण ‘काँग्रेस मुक्त भारत’ हा त्यांचा नारा लोकशाही देशात अजब मानला  जात आहे. त्यामुळे मोदींचे डावपेच काँग्रेसला समजून येत नाहीत. कारण मोदीच तिला समजलेले नाहीत. मोदींच्या राजकारणाचा आवाकाच समजलेला नाही. मोदी आणि अमित शहा यांचा विचार सत्ता कशी वाढवायची यावर असतो. साधनशुचितेवर नसतो. गेल्या आठ वर्षात मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा वगैरे राज्यात ज्याप्रकारे भाजप सरकारे आणली गेली त्याने एक वेगळा संदेश गेलेला आहे. त्यात उत्तर प्रदेशसह पाच राज्यांचा निकाल म्हणजे काँग्रेसला जमालगोटाच…

गेली काही वर्षे पक्षाचे काम ज्या पद्धतीने चालले होते तो एक पोरखेळच झाला होता. ‘अवघड जागेचे दुखणे’ झाले होते. बोलायचे तर बोलायचे कुणापाशी? आई पक्षाध्यक्ष आणि मुलगा आणि मुलगी पक्ष चालवणार. प्रकृतीचे कारण पुढे करून सोनिया गांधी भेट टाळायच्या, राहुल नेहमी आपल्याच तंद्रीत तर प्रियंकाचे आपले राग-लोभ, तिची आपली माणसे, तिचा आपला संसार. त्यातून वेळ मिळाला तर ती लक्ष घालणार. ‘आई खायला देईना आणि बाप भीक मागू देईना’ अशीच काहीशी परिस्थिती झाल्याने पक्षाला दारिद्रय येणे क्रमप्राप्तच होते. त्यात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासारखे घाग विरोधक काँग्रेसची ‘तेरावी’ करायला  निघालेले अशावेळी किशोर यांच्यासारखा सल्लागार बरोबर असावा असे काँग्रेसला वाटावे यातच सारे आले. गेल्या वषी ममता बॅनर्जींना बंगालमध्ये जेव्हा आक्रमक भाजपला सामोरे जावे लागले होते तेव्हा किशोर यांनी केलेली मदत महत्त्वाची होती. मोदी-शहा यांच्या तुफानी हल्ल्याला दीदींनी इतक्मया त्वेषाने परतवले आणि त्याने पंतप्रधानपदाची त्यांची महत्वाकांक्षा जागृत झाली. ममतादीदींच्या या विजयाने किशोर यांचे दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकारणातील वजन वाढले.

किशोर यांनी काँग्रेसमध्ये नवचैतन्य आणण्यासाठी ज्या ’क्रांतिकारी सुधारणा’ सांगितल्या होत्या त्या घाईघाईने लागू करणे पक्षाच्या प्रकृतीला मानवल्या नसत्या आणि त्यातून पक्ष बरा व्हायच्या ऐवजी राडा झाला असता  सोविएत संघात ’पेरेस्टोइका” आणि ‘ग्लासनोस्त’ अशा अफलातून सुधारणा मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी अमलात आणल्या त्याला तो खंडप्राय देश त्यावेळी तयारच नव्हता. त्यामुळे झाले काय तर सोविएत संघाचेच तुकडे झाले. किशोर यांचे ’औषध’ ताबडतोब दिले तर रोगी सुधारण्याचा ऐवजी दगावू शकतो असा युक्तिवाद नि÷ावंत मंडळींनी केला. पुढील वर्ष-दोन वर्षात यातील काही सुधारणा लागू केल्या जाणार आहेत असे संकेत मिळत आहेत.

राहुल यांची ’पप्पू’ म्हणून संभावना सत्ताधारी अजूनही करत असले तरी विरोधी पक्षात मोदी सरकारचे वाभाडे काढणारे तेच एकमेव नेते आहेत हे देखील हळूहळू स्पष्ट होत आहे. 2017 च्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 वर बाद करून राहुलनी जणू एक विक्रमच केला होता. मोदी-शाह यांनी जीवाचे रान करून तेव्हा आपले गृहराज्य वाचवले होते. त्यानंतर मात्र राहुल आणि त्यांच्या पक्षाला ओहोटी लागली.

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्ये सत्ता मिळवून आपला दबदबा निर्माण केला असला तरी पंजाबमध्ये त्यांची सत्तेवर मांड अजूनही ठीक बसलेली नाही. भगवंत मान हे मुख्यमंत्री असले तरी एक बुजगावणे आहेत आणि केजरीवाल हे सरकार दिल्लीहून चालवतात अशी भावना वाढीस लागत आहे. ती कितपत बरोबर अथवा चूक ही गोष्ट वेगळी. पण अशी भावना वाढीस लागली तर आम आदमी पक्षाचेच वाढ खुंटू शकते असे जाणकार
सांगतात.

2004 साली सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त प्रगतीशील आघाडी ही अटल बिहारी वाजपेयी यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला हरवून सत्तेत येईल हे भाजपच्या भल्याभल्यांनाही कळले नव्हते. ते ‘फील गुड’ आणि ’इंडिया शायनिंग’च्या तोऱयात होते.  त्यावेळी निवडणुकीच्या अगोदर एक-एक करून सहा-सात लहानमोठे पक्ष भाजपचा साथ सोडून गेले होते. हा एक प्रकारे धोक्मयाचा इशारा होता तो सत्ताधाऱयांना कळलंच नाही. 1977 ला इंदिरा गांधींचा लोकसभा निवडणुकीत पराभव होईल आणि तो देखील राज नारायण यांच्यासारख्या नेत्यांकडून हे कोणीच अपेक्षित केले नव्हते. देशाच्या राजकारणात भल्याभल्यांना असे हिसके बसलेले आहेत. मोदी-शहा यांच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाची तोड विरोधी पक्षांच्या लक्षात आली की मग पुढील राजकारण बदलायला वेळ लागणार नाही. 

आजच्या घडीला मोदी आणि भाजपाला अजिबात धोका नाही हे सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट आहे. उद्याची बात निराळी. कधीकधी राजकारणात एका आठवडय़ात जणू युगच बदलते. काँग्रेसने कात टाकली नाही तर ती शिल्लक राहणार नाही हे देखील तेव्हढेच खरे. ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’, असेच जणू देशातील या सर्वात जुन्या पक्षाला सांगितले जात आहे.

सुनील गाताडे

Related Stories

राज्यपालांची मुक्ताफळे

Patil_p

स्त्रियांमधील वाढती आर्थिक कुशलता

Patil_p

बिहारमधील शोकांतिका

Patil_p

आरोग्यव्यवस्थेचा कडेलोट

Patil_p

काँग्रेसला सूर सापडेल ?

Patil_p

संघम् शरणम् गच्छामी- कै. बाबुराव देसाई

Patil_p