Tarun Bharat

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन; कोरोनाविरुद्धची झुंज ठरली अपयशी

मुंबई/प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत असलेले काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचं निधन झालं. सातव गेल्या काही दिवसापासून कोरोनाशी झुंज देत होते मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात मागील २० दिवसांपासून उपचार सुरू होते. सुरूवातील त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, नंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवल्याचंवृत्त काँग्रेसकडून देण्यात आलं आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

रणदीपसिंग सुरजेवाला यांची ट्विट करत माहिती

राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून अस्वस्थ वाटत होतं. २१ एप्रिल रोजी कोविडची लक्षणं दिसत असल्यानं त्यांनी कोरोना चाचणी केली. २२ एप्रिल रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. २३ एप्रिल रोजी सातव यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरूवातीला त्याची प्रकृती चांगली होती. मात्र, २५ एप्रिलनंतर प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात अर्थात आयसीयू वार्डात हलवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुंबई हलवण्याची चर्चाही सुरू झाली होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीत पुन्हा सुधारणा होऊ लागली होती. काही दिवसांपूर्वीच राजीव सातव यांनी कोरोनावर मात केली होती. त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला होता. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याने त्यांना पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांना वेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे देखील राजीव सातव यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून होते. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेतेही जहांगीर हॉस्पिटलमध्ये येऊन सातव यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांची माहिती घेत होते. दरम्यान, शनिवारी (१५ मे) काँग्रेसचे नेते व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रूग्णालयात जाऊन, सातव यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेत विचारपूस केली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ‘राजीव सातव यांना काल रात्री थोडा त्रास जाणवला, मात्र ते लवकरच बरे होतील,’ असं म्हटलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून राजीव सातव यांचं निधन झाल्याची माहिती दिली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या राजीव सातव यांच्या निधनाबद्दल सुरजेवाला यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सुरजेवाला यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुरजेवाला यांनी “निःशब्द! आज मी असा सहकारी गमावला आहे, ज्याने सार्वजनिक जीवनातील पहिलं पाऊल माझ्यासोबत युवक काँग्रेसमध्ये ठेवलं होतं आणि आजपर्यंत माझ्यासोबत चालत होते…. राजीव सातव यांचा साधेपणा, त्यांचं हास्य, जमिनीशी असलेली नाळ, नेतृत्वाशी आणि पक्षासोबत असलेली निष्ठा व मैत्री नेहमीच आठवत राहिल. माझ्या मित्रा अलविदा, जिथेही राहशील, झळाळत रहा,” अशा शोकभावना सुरजेवाला यांनी व्यक्त केल्या आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत “माझा मित्र राजीव सातव गमावल्याने मला फार वाईट वाटत आहे. ते कॉंग्रेसच्या आदर्शांना मूर्त रूप देणारे नेते होते. हे आपल्या सर्वांचे एक मोठे नुकसान आहे. मला त्यांच्या कुटुंबाबद्दल कळवळा आणि प्रेम आहे.”

Related Stories

ठाणे, कल्याण डोंबिवलीत 2 ते 12 जुलैपर्यंत पुन्हा लॉक डाऊन

Tousif Mujawar

विश्रामबाग पोलिसांचा सत्कार

Archana Banage

विल्सन पॉईंटवरील बुरुज ढासळला

Patil_p

जगभरातील कोरोनाबळींची संख्या 7 लाखांवर

datta jadhav

मुलाच्या खूनाचा बदला खूनाने

Patil_p

बिजलिमल्ल माजी आमदार संभाजी पवार यांचे सांगलीत निधन

Archana Banage