प्रतिनिधी / कागल
कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना आवारात ट्रकच्या चाकात सापडून कर्मचारी जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या अपघातात साके ता . कागल येथील शंकर गणपती पोवार ( वय ४५ ) यांचा अपघातात मृत्यू झाला. या अपघाताची घटना समजताच साके गावावर शोककळा पसरली.
श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यात साखर नेण्यासाठी ट्रक गेला होता. हा ट्रक पाठीमागे घेत असताना कारखान्यातील कर्मचारी शंकर गणपती पोवार हे ट्रकच्या मागील चाकाखाली सापडले. ट्रकचे डाव्या बाजूचे चाक अंगावरून गेल्याने पोवार यांचा जागीच मृत्यू झाला. कारखान्याच्या स्टोअर इमारतीसमोर ही घटना घडली. ट्रक मागे घेतला जात असताना पोवार ट्रकच्या मागील बाजूने चालत जात होते. ट्रकचा धक्का लागून पोवार जमीनीवर कोसळले.
त्यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोवार गावातील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असत. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे .या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


previous post