Tarun Bharat

काजू बीला 115 रुपये दर निश्चित

   हमीभावाचा प्रश्न सोडवण्यासाठी बागायतदार संघ स्थापन करणार

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हय़ात काजू बीचा 115 रुपये दर समन्वय समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आला आहे. फक्त दोडामार्ग व बांदा येथील शेतकऱयांसाठी 125 रुपये दर राहणार आहे. तसेच हमीभावाचा प्रश्न सोडवण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्हा बागायतदार संघ स्थापन करणार, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व समन्वयक संदीप राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हय़ातील काजू बागायतदार शेतकऱयांना काजू बीला चांगला दर मिळवून देण्यासाठी जिल्हय़ातील काजू बागायतदार शेतकरी, काजू प्रोसेसर व शेती संस्था प्रतिनिधी यांची बैठक नुकतीच होऊन समन्वय समिती स्थापन करण्यात आली. या समन्वय समितीची बैठक जिल्हा बँक सभागृहात शुक्रवारी झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व समितीचे समन्वयक संदीप राणे यांनी ही माहिती दिली.

बांदा व दोडामार्ग येथील शेतकऱयांसाठी 125 रुपये एक किलो काजू बी दर, तर इतर ठिकाणी पूर्ण जिल्हय़ात 115 रुपये दर समन्वय समितीच्या बैठकीत निश्चित केला आहे. त्यामुळे शेतकऱयांनी निश्चित केलेल्या दरापेक्षा कमी दरात काजू बी विक्री करू नये. जादा दर मिळत असेल, तर जरूर विक्री करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

समन्वय समितीने निश्चित केलेला काजू बी दर कोण देत नसेल, तर शेतकऱयांनी काजू बी विकू नये. शेती संस्थांजवळ जाऊन बी विक्री करावी. शेती संस्थांना जिल्हा बँक कॅश पेडिट देणार आहे आणि काजू बी दर मिळवून देण्याची जबाबदारी समन्वय समिती घेणार आहे, असेही ते म्हणाले.

काहीजण उशिरा सुचलेले शहाणपण, अशी टीका करीत आहेत. परंतु जेव्हा चांगला दर मिळत होता, तेव्हा हस्तक्षेप करण्याचा प्रश्न नव्हता. आता दर मिळत नसल्याने समन्वय समिती स्थापन करून दर निश्चित करावा लागला आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या प्रश्नांवर कुणी राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

काजू, आंबा व इतर बागायतदार शेतकऱयांना हमीभाव मिळवून देण्यासाठी आणि शेतकऱयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्हा बागायतदार संघ स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी 19 एप्रिलला गोवा दौरा करून माहिती घेतली जाणार आहे. या संघामध्ये जिल्हय़ातील सर्व बागायदार शेतकऱयांनी सभासद व्हावे, असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व संदीप राणे यांनी केले आहे.

Related Stories

कर्नाटकातील दीड हजार मजूर स्वगृही रवाना

NIKHIL_N

ईपीएस 95 पेन्शनमध्ये वाढ करा!

NIKHIL_N

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Anuja Kudatarkar

गादी विक्री दुकानात भीषण आग

Patil_p

ऐन लग्नसराईत ‘मण्णपुरम’चा दणका!

Patil_p

वेंगुर्ले आगारातून लांब पल्यासह अन्य बस सुरू

NIKHIL_N